धनकुबेर मंदिर

खामगाव-शेगाव रोड, ता. खामगाव, जि. बुलडाणा

विदर्भाची पावन भूमी संतांच्या वास्तव्याने आणि विविध देवदेवतांच्या अधिष्ठानाने पुनीत झाली आहे. याच भूमीत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव-शेगाव मार्गावर वसलेले श्री धनकुबेर मंदिर भाविकांसाठी आस्थेचे प्रमुख केंद्र ठरले आहे. धनदेवता आणि अष्टदिक्पालांपैकी उत्तर दिशेचा स्वामी मानल्या जाणाऱ्या कुबेराची मंदिरे देशभरात अत्यंत दुर्मिळ आहेत. अशा मोजक्या स्थानांपैकी एक असलेले हे मंदिर ‘१३ भाई खालसा नागा आखाडा’ (हरिद्वार) येथील महामंडलेश्वर सुरेश नागेश्वर ऊर्फ इंद्रदेव महाराज यांच्या प्रेरणेतून १९९९ मध्ये उभारले गेले. अय्याजीधाम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर परिसरात कुबेरदेवाच्या मूर्तीसोबतच भगवान बालाजी आणि माता महालक्ष्मीचेही दर्शन घडते.

भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीला समृद्धीची जननी मानले जाते, तर कुबेराला त्या संपत्तीचा रक्षक आणि व्यवस्थापक म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मातील अष्टदिक्पालांपैकी एक असलेला कुबेर हा केवळ धनाची देवता असण्यासोबतच यक्ष, राक्षस आणि गुह्यकांचा राजा मानला जातो. कुबेराच्या उत्पत्तीचा संदर्भ विष्णुपुराण आणि श्रीमद्भागवत पुराणात आढळतो. तो ब्रह्मदेवाचा नातू आणि विश्रवा ऋषींचा पुत्र आहे. ऋषी विश्रवा आणि इडविडा यांचा पुत्र असल्यामुळे त्याला ऐडविड असेही संबोधले जाते. नात्याने तो लंकेचा राजा रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण यांचा सावत्र भाऊ लागतो. कुबेराने आपल्या पित्याप्रमाणेच ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या या अलौकिक भक्तीवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला ‘लोकपाल’ हे पद दिले आणि जगातील संपूर्ण धनसंपत्तीचे अधिपत्य त्याच्याकडे सोपवले. याच वेळी त्याला ब्रह्मदेवाने पुष्पक विमान भेट दिले होते. वाल्मीकि रामायणानुसार, रावणाने नंतर हे विमान कुबेराकडून बळजबरीने हिरावून घेतले.

कुबेराचा आणि भगवान शंकराचा संबंधही अत्यंत घनिष्ठ आहे. शिवपुराणानुसार कुबेराने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काशीमध्ये दीर्घकाळ तप केले. त्याच्या अनन्य भक्तीमुळे महादेव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी कुबेराला आपला जिवलग मित्र मानून धनपती होण्याचा आशीर्वाद दिला. कुबेराचे वास्तव्य हिमालयातील कैलास पर्वताजवळ असलेल्या अलकापुरी या नगरीत असल्याचे मानले जाते. मूर्तीविज्ञानात कुबेराचे रूप काहीसे वेगळे वर्णन केले आहे. तो ठेंगणा आणि मोठ्या पोटाचा दाखवला जातो. त्याच्या एका डोळ्याचा रंग पिंगट असल्याने त्याला पिंगाक्ष असेही म्हणतात. जेव्हा श्रीराम रावणावध करून अयोध्येला परतले, तेव्हा त्यांनीही धर्मानुसार संपत्तीचे नियोजन करण्यावर भर दिला होता, ज्याचे मूळ कुबेराच्या तत्त्वज्ञानात आढळते.

खामगाव शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर, शेगाव रोडला लागून असलेली या मंदिराची भव्य कमान लक्ष वेधून घेते. सुमारे सात एकर परिसरात पसरलेल्या या अय्याजीधाम मंदिर परिसरात प्रवेश करताना एका छोट्या तलावाचे दर्शन होते. मंदिराच्या प्रांगणात सुरुवातीला वीर महाबली हनुमानाचे छोटे मंदिर लागते. त्यापुढे शिवशंकराच्या मूर्तीची भव्य प्रतिकृती आणि समोरील कुंडात शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. पायऱ्या चढून वर जाताना दोन्ही बाजूंना भाविकांसाठी आसनव्यवस्था केलेली आहे. पायऱ्यांच्या मध्यभागी वरच्या बाजूला असलेल्या मोठ्या कुंभातून धनवर्षाव होत असलेला देखावा पर्यटकांचे आकर्षण ठरतो.

मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी पारंपरिक पद्धतीची आहे. गर्भगृहात एका मोठ्या पीठासनावर कुबेराची बैठी मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीचा उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे, तर डाव्या हातात धनकलश आहे. कुबेराच्या डाव्या बाजूला भगवान बालाजी आणि उजव्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती आहे. या तिन्ही मूर्ती कमलपुष्पावर विराजमान आहेत. मंदिराच्या शिखरावर मेष आणि गजराजांची शिल्पे आहेत, तसेच त्याखाली श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

अमावस्येच्या दिवशी कुबेराचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात, या श्रद्धेमुळे या तिथीला येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. या दिवशी काही भाविक अन्नदानही करतात. प्रत्येक अमावस्येला या मंदिरात महाआरती झाल्यावर महाप्रसादाचे वाटप केले जाते. येथे शनिअमावस्या आणि सोमवती अमावस्येलाही विविध धार्मिक कार्यक्रम होतात. दीपावलीदरम्यान येथे धनकुबेर कलशपूजन, शिवपूजन, कुबेरयज्ञ, यमदीपदान, वामनपूजन, चंद्रपूजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी १ मार्च रोजी होणाऱ्या मंदिराच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त येथे हवन, प्रवचन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे गणेशोत्सवानंतर दरवर्षी पाच ते पंधरा फूट उंचीच्या गणेशमूर्तींचे संकलन केले जाते. या मूर्ती परिसरात वर्षभर जतन केल्या जातात आणि दुसऱ्या वर्षी इच्छुक मंडळांना या मूर्ती निःशुल्क दिल्या जातात. विश्वस्त मंडळातर्फे परिसरात वेळोवेळी वधू-वर परिचय मेळाव्यांचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव येथून ७ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५५ किमी अंतरावर
  • खामगाव व शेगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९१५८५५९६८५

धनकुबेर मंदिर

खामगांव-शेगांव रोड, खामगांव, जिला बुलढाणा

Back To Home