देवभैरी मंदिर

रत्नागिरी, ता. व जि. रत्नागिरी

सुमारे ३०० वर्षें प्राचीन असलेले रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेवभैरीचे मंदिर हे शहरातील जागृत देवस्थान मानले जाते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला देवभैरी येथील १२ वाड्या २२ जातीजमातींचा देव असून प्रत्येकाच्या हाकेला तो धावून जातो, असा भाविकांचा विश्वास आहे. . . १७३१ मध्ये कान्होजी आंग्रे यांचा पुत्र सखोजी आंग्रे हा आरमारासह रत्नागिरीमध्ये आला होता. तेव्हा त्याच्यासोबत पाच गुजर समाजाची कुटुंबे होती, त्यांनी येथे श्रीदेवभैरीचे मोठे मंदिर बांधले होते. असे सांगितले जाते की देवभैरीचे हे स्थान १२ व्या शतकापासून येथे आहे. येथील शिमगोत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो.

रत्नागिरी बस स्थानकापासून काही अंतरावर असलेले ग्रामदैवत देवभैरी मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे. तटबंदीयुक्त असलेल्या या मंदिराच्या कमानीयुक्त प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर परिसर अनेकविध सुशोभित झाडांनी, तसेच जुन्या डेरेदार वृक्षांनी वेढलेला आहे. प्रांगणात दक्षिणमुखी हनुमान श्रीदत्त यांची मंदिरे आहेत. मंदिराच्या समोरील बाजूला पाण्याचे दोन तलाव असून, त्यांची विशेष रचनात्मक बांधणी असलेल्या पायऱ्या मंदिराचे प्राचिनत्व सिद्ध करतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चार उंच दीपमाळा आहेत. त्यापैकी उजव्या बाजूला तीन, तर डाव्या बाजूला एक आहे. हे मंदिर दुमजली असून ते साधारणतः चार ते पाच फूट उंचीच्या जोत्यावर आहे. कोकणातील अन्य मंदिरांप्रमाणे लाकडी खांब, वासे, त्यावरील कौले उतरते छप्पर अशी याही मंदिराची रचना आहे.

मुख्य मंदिरात तीन भाग आहेत. प्रवेश केल्यानंतर डावीकडून प्रथम तृणबिंदुकेश्वर मंदिरात जाता येते. सभामंडप, अंतराळ गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून त्याच्या भिंतींजवळ साधारणतः दोन फूट उंचीची कक्षासने (आसने) आहेत. अंतराळाच्या द्वारशाखेवरील विविध आकृत्यांमध्ये पक्षी, प्राणी, फुले द्वारपाल कोरलेले आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. येथील अंतराळही मोठे असून गर्भगृहाच्या समोरील बाजूस अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेच्या डाव्या बाजूला संगमरवरी गणेशाची सुंदर मूर्ती गर्भगृहात काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. तृणबिंदुकेश्वराच्या गर्भगृहाजवळून जंबुकेश्वर मंदिरात जाता येते. जंबुकेश्वराच्या गर्भगृहातही शिवपिंडी असून या गर्भगृहाच्या बाजूला श्रीगणपती, देवी हरितालिका, श्रीविष्णू सूर्यनारायण यांच्या मूर्ती आहेत. हे जंबुकेश्वर पंचायतन म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवी हरतालिकेची दुर्मिळ वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील मूर्तीला दोन हात असून तिने घागरा घातलेला आहे.

या सर्व देवतांच्या दर्शनानंतर श्रीदेवभैरीचे दर्शन घेण्याची येथे प्रथा आहे. जंबुकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाजवळ असलेल्या द्वारातून श्रीदेवभैरीच्या मुख्य गर्भगृहाजवळ जाता येते. या गर्भगृहासमोर असलेल्या सभामंडपात सुंदर लाकडी कलाकुसर असून त्यात नऊ ते दहा मोठ्या पितळी घंटा लटकविलेल्या आहेत. या सभामंडपातील १२ खांब हे १२ मानकऱ्यांचे प्रतीक समजले जातात. मुख्य गाभाऱ्यात संगमरवरी मखरात श्रीदेवभैरी त्याच्या शेजारी त्रिमुखी देवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर अनेक प्राचीन दगडी मूर्ती वीरगळी आहेत.

कोकण आणि शिमगा यांचे वेगळेच नाते आहे. येथील शिमगोत्सव हा फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संपूर्ण रत्नागिरीसह १२ वाड्यांतील २२ जातीजमातीतील भाविक भैरीबुवाच्या पालखीसाठी एकत्र येतात. रंगपंचमीच्या दिवशी श्रीदेवभैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात सहाणेवरून उठते. परंपरेनुसार या पालखीला प्रथम पोलिसांकडून सलामी देण्यात येते त्यानंतरहुरा रे हुराआणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरारे होलियो…’, ‘करवत करवत रे करवतआणि आमचा भैरीबुवा चालला मिरवतरे होलियो…’ असा जयघोष सुरू होतो. या वेळी आसपासच्या गावांतूनही ग्रामदेवतेच्या पालख्या देवभैरीच्या भेटीसाठी येतात. यामध्ये मिऱ्या गावातून देवभैरीच्या बहिणी श्रीदेवी नवलाईपावणाई भावाच्या भेटीसाठी येतात. बहीणभावाच्या भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे हजारो भाविक उपस्थित असतात.

जागृत देवस्थान असल्यामुळे देवभैरीच्या दर्शनासाठी दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत शेकडो भाविक येतात. कोणतेही शुभकार्य किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी भाविक येथे येऊन देवभैरीचे दर्शन घेतात योजिलेल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करतात. दररोज सकाळी .३० ते रात्री १० पर्यंत भाविकांना या मंदिरात श्रीदेवभैरीचे दर्शन घेता येते.

 

उपयुक्त माहिती:

  • रत्नागिरी बस स्थानकापासून . किमी अंतरावर
  • रत्नागिरी रेल्वेस्थानकापासून १२ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांतून रत्नागिरीसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home