देवालीमाडी मंदिर

देवलपाडा, ता. सोनगड, जि. तापी

देवालीमाडी माता ही गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी समाजाची, विशेषतः गामीत समाजाची कुलदेवी आहे. तिची धान्याची देवी ‘कणी-कंसारी’ म्हणूनही पूजा केली जाते. देवलपाडा येथील देवालीमाडी मंदिर हे असंख्य स्थानिक आदिवासी भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. शेतातील पहिले पीक/धान्य देवीला अर्पण करण्याची येथे परंपरा आहे. देवालीमाडी ही संतती देणारी देवी मानली जाते आणि अनेक लोक अपत्यप्राप्तीच्या नवसासाठी तिला प्रार्थना करतात. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.

देवलपाडा हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा सोनगड तालुक्यात वसलेले आहे. बडोदा संस्थानाचे संस्थापक पिलाजीराव गायकवाड यांनी या भागात स्थापन केलेली सोनगड किल्ला ही पहिली चौकी होती. १७१९ मध्ये त्यांनी स्थानिक भिल्ल जमातींचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर १७२१ मध्ये त्यांच्याच मदतीने किल्ल्याची दुरुस्ती करून त्यात एक भव्य वाडा उभारला. सोनगडपासून सुमारे १६ किमी अंतरावर, देवलपाडा येथील टेकडीवर देवालीमाडी मातेचे मूळ पवित्र स्थान आहे. देवमोगरा आणि देवालीमाडी या दोन्ही आदिवासी देवींमध्ये समान वैशिष्ट्ये असून भिल्ल जमातींमध्ये त्यांची पूजा केली जाते, असे अभ्यासकांचे मानणे आहे. या भागातील कथा आणि लोकगीतांमध्ये या देवीच्या अनेक लोककथा सांगण्यात येतात.

अशाच एका लोककथेनुसार, देवालीमाडी ही तिच्या बहिणीचे पती सोनार्या देव यांची मेहुणी होती. त्यांची देवालीमाडीशी विवाह करून तिला आपली राणी बनवण्याची इच्छा होती, परंतु तिने त्यांचा हा प्रस्ताव नाकारला. त्यांच्यापासून वाचण्यासाठी ती देवलपाडा आणि दुसवाडाजवळील जंगलातील टेकड्यांमध्ये लपून राहिली. मात्र, सोनार्या देव यांनी तिला तिथेही पाहिले. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी ती पश्चिमेकडे गेली आणि एका मोठ्या खडकाजवळ लपली, जिथे ती शेवटी स्थिरावली. हा खडक म्हणजे देवलपाडा येथील टेकडीचा माथा मानला जातो, जिथे देवी मूळची वास्तव्यास होती. काळाच्या ओघात, ती खाली देवलपाडा गावात आली आणि तिच्या सन्मानार्थ एक मोठे मंदिर बांधण्यात आले.

हे मंदिर देवलपाडा गावाच्या प्रवेशद्वारावर एका मोठ्या उघड्या प्रांगणात स्थित आहे. एका सिमेंटच्या कमानीतून मंदिरात प्रवेश होतो, ज्याच्या पुढे मंदिराची वास्तू आहे. मंदिरात मुखमंडप (प्रवेशद्वार), सभामंडप आणि एक उघडे गर्भगृह आहे. घुमटाकार मुखमंडपातून सहा पायऱ्या चढून भव्य, अर्ध-उघड्या सभामंडपात जाता येते, ज्याच्या चारही बाजूंना सिमेंटचे बाक आहेत. आतील चौकोनी खांबांवर वारली शैलीतील आदिवासी कलाचित्रे रंगवण्यात आली असून दर्शनासाठी स्टीलचे रेलिंग लावून रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

सभामंडपात प्रवेश करताच सुमारे दीड माणसाच्या उंचीच्या दोन मोठ्या पाषाण-शिळा लगेचच लक्ष वेधून घेतात. या पाषाण-शिळा मूळच्या असून त्यांच्याभोवती एक छोटा चबुतरा बांधण्यात आला आहे. त्यावर आदिवासी देवतांच्या चार मूर्ती आहेत. घोड्यावर बसलेल्या या देवमूर्ती मातीच्या बनवलेल्या आहेत. नवस फेडण्यासाठी देवीला अशाच प्रकारच्या मूर्ती अर्पण केल्या जातात. सभामंडपाच्या भिंतींवर अशा अनेक मूर्ती पाहायला मिळतात. एका कोपऱ्यात, भक्तांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावलेली लहान मुलांची छायाचित्रेही आहेत.

देवीचे गर्भगृह या पाषाण-शिळांच्या अगदी समोर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गर्भगृह जमिनीच्या पातळीपेक्षा खालील भागात आहे. याच्या तीन बाजूंना सिमेंटचे उंच रेलिंग बांधले असून पुढची बाजू स्टीलच्या गजांनी बंद केली आहे. येथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. खाली, तीन मोठ्या पाषाण-शिळांच्या मध्ये देवालीमाडी देवीची पाषाणमूर्ती आहे. ही मूर्ती रंगीबेरंगी चुनरीने झाकलेली आहे. या पाषाण-शिळेवर देवीची एक तसबीर ठेवण्यात आली आहे. या गर्भगृहाच्या अगदी वर मंदिराचे उंच शिखर बांधलेले आहे.

या मंदिरातील देवीच्या दर्शनानंतर अनेक भक्त मूळ टेकडीवरील स्थानाकडेही मार्गक्रमण करतात. गावातील रस्त्यापासून या टेकडीच्या पायथ्यापर्यंत सिमेंटचा छोटा रस्ता बांधण्यात आला आहे. पुढे प्रवेश कमान आहे. तिच्याजवळ, उजव्या बाजूला जिने/पायऱ्यांच्या आकाराचा एक मोठा चबुतरा बांधला आहे. त्यावर आदिवासी देवी-देवता आणि संतांची चित्रे लावलेली आहेत. मध्यभागी देवीचा पाषाणी तांदळा आहे. त्याच्यासमोर काही लहान-मोठे पितळी त्रिशूळ आहेत. वरील भागात लहान मुलांची अनेक छायाचित्रे लावलेली आहेत.

या ठिकाणाहून टेकडीवर काही अंतरापर्यंत पायऱ्या आहेत, त्यानंतर जंगलातून जाणारा नैसर्गिक कच्चा पायमार्ग सुरू होतो. वाटेत, एका झाडाखाली ‘देवीची चौकी’ म्हणून ओळखला जाणारा एक छोटा चबुतरा आहे. थोडे पुढे गेल्यावर, एका छोट्या गुहेसारख्या दगडांच्या कपारीत देवालीमाडी मातेचे मूळ पवित्र स्थान आहे.

देवलपाडा गावातील मंदिराप्रमाणेच येथेही भक्त आपल्या शेतातील पहिले पीक देवीला अर्पण करतात. मातीचे घोडे आणि तत्सम मूर्ती अर्पण केल्या जातात. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला या मंदिरात देवीची मोठी यात्रा भरते. गुजराजमधील सुरत, तापी, डांग आणि नर्मदा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसोबतच मध्य प्रदेशसारख्या राज्यांतूनही भक्त या काळात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. या यात्रेदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

ठळक वैशिष्ट्ये

  • सोनगडपासून सुमारे १६ किमी अंतरावर स्थित
  • सोनगडवरून राज्य परिवहन (एसटी) बस उपलब्ध
  • खाजगी वाहने मंदिराच्या पार्किंग क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतात
  • मंदिर परिसरात नाश्ता आणि अल्पोपहाराची सोय उपलब्ध आहे
Back To Home