देशभरात राधा-कृष्ण वा यशोदा-कृष्णाची असंख्य मंदिरे आहेत. परंतु माता देवकी आणि कृष्ण या मायलेकाची मंदिरे मात्र दुर्लभ आहेत. माशेल गावात सारस्वत समाजाने स्थापन केलेले देवकी-कृष्ण लक्ष्मी रवळनाथ संस्थान हे मंदिर त्यातीलच एक आहे. देवकीच्या वात्सल्याची गाथा सांगणारे हे माशेलस्थित मंदिर किमान ४६५ वर्षे प्राचीन आहे. पर्रिकर घराण्याची कुलदेवता असलेल्या या देवकी-कृष्णाची मूर्ती त्याहून जुनी आहे. येथे देवकी-कृष्णाप्रमाणेच लक्ष्मी रवळनाथ, चोडणेश्वर, भूमिका देवी आदी देवतांचीही मंदिरे वसलेली आहेत. येथील देवकी-कृष्णाची तसेच लक्ष्मी-रवळनाथाची यात्रा सुप्रसिद्ध आहे.
देवकी-कृष्णाचे हे देवालय मूळचे तिसवाडी तालुक्यातील चोडण या गावचे. त्याची पौराणिक आख्यायिका कृष्ण-जरासंध युद्धाशी निगडित आहे. ती अशी की जरासंध हा मगध सम्राट होता. तो कृष्णाचा मामा कंस याचा सासरा होता. तो अत्यंत पराक्रमी व तेवढाच क्रूर होता. महाभारताच्या सभापर्वातील राजसूयारंभपर्वात स्वतः श्रीकृष्ण सांगतात की ‘षडशीतिः समानीताः शेषा राजंश्चतुर्दश। जरासंधेन राजानस्ततः क्रूरं प्रवर्त्स्यते।।’ म्हणजे जरासंधाने शंभरातील ८६ राजांना आपल्या कैदेत टाकले आहे. केवळ १४ (टक्के) राजे बाकी आहेत. त्यांनाही बंदी केल्यानंतर तो अधिक क्रूरकर्मे करू लागेल. श्रीकृष्णाने त्याच्या जावयाचा म्हणजेच कंसाचा वध केल्यामुळे तो चिडला होता. त्याने मथुरेवर अठरा वेळा हल्ले चढवले. त्या युद्धांत कोणालाच निर्णायक विजय मिळाला नव्हता.
अशाच एका भीषण युद्धात कृष्ण आणि बलराम यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. त्यावेळी कृष्ण सैन्यासह गोमांचल पर्वताच्या आश्रयास आला होता. कृष्णाच्या वियोगाने व काळजीने माता देवकी अत्यंत व्यथित झाली होती. काही करून कृष्णाला भेटून त्याला डोळे भरून पाहायचे या निर्धाराने माता देवकी गोमांचल पर्वताकडे येण्यास निघाली.
आपल्या मातेला पाहताच कृष्णास जाणीव झाली की आपले बालपण वृंदावनात व्यतीत झाल्यामुळे देवकीस त्याचे ते रुप पाहता आले नव्हते. तेव्हा त्याने छोट्या बालकाचे रूप धारण केले. देवकीमातेने त्याला कडेवर उचलून घेतले. मायलेकांची ही भेट चूडामणी द्वीप (आजचे चोडण) येथे झाल्याची आख्यायिका आहे. कालांतराने त्या ठिकाणी देवकी-कृष्णाचे मंदिर स्थापन करण्यात आले.
सोळाव्या शतकारंभी गोव्यात आलेल्या पोर्तुगीजांनी प्रारंभी तिसवाडी, बार्देश, साष्टी या प्रांतात आपली सत्ता स्थापन केली. अल्पावधीतच त्यांनी येथे त्यांच्या धर्मांधतेतून क्रूर अत्याचारांचे पर्व सुरू झाले. त्या धर्मांधांनी येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यामुळे येथील हिंदूंमध्ये मोठी घबराट पसरली. अनेकांनी आपल्या देव-देवतांसह नजीकच्या आदिलशाही प्रदेशात स्थलांतर केले. इ.स. १५९५ मध्ये फ्रान्सिस्को पाइस या पोर्तुगीज अधिकाऱ्याने लिहिलेल्या ‘टोंबोडा जेहा दा गोवा अँड दास टेरासेलेक्टे अँड बार्देश’ या पुस्तकात हे नमूद केले आहे. या पुस्तकानुसार इ.स. १५४० च्या सुमारास चोडण येथे गणपती, रवळनाथ, मल्लिनाथ, भगवती, देवकीकृष्ण, नारायण, महादेव, चोंडेश्वर आदी देवतांची मंदिरे अस्तित्वात होती. ही सर्व मंदिरे कालांतराने चोडणहून मयेवाडा येथे स्थलांतरित झाली.
चोडणमधील भाविकांनीही इन्क्विझिशन काळात मंदिरातील देवकी-कृष्णाची मूर्ती पोर्तुगीज सैनिकांची नजर चुकवून मये गावात नेऊन लपवली. काही काळाने ती मूर्ती माशेल येथे आणून एका ब्राह्मण कुटुंबाच्या घरात स्थापित करण्यात आली. तद्नंतर १५६७च्या सुमारास येथे एक छोटे देवालय उभारण्यात आले व तेथे या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर सुमारे पावणे तीनशे वर्षांनी, १८४२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
गावणवाडा, माशेलमधील अत्यंत विस्तिर्ण अशा भूखंडावर हे मंदिर वसले आहे. नारळी-पोफळीची झाडे, बागा, हिरवळ अशा या परिसरात, उंच जगतीवर हे खास गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीतील भव्य असे मंदिर स्थित आहे. उंचच उंच गोलाकार स्तंभ असलेला मुखमंडप, त्यावर दोन्ही बाजूंस उतरते कौलारू छप्पर, त्यासमोर दोन्ही बाजूंस श्रीकृष्णास प्रिय असलेली तुलसी वृंदावने, असे या मंदिराचे दर्शनी रुप आहे. मुखमंडपातून आत प्रवेशताच गोमंतकीय मंदिर परिभाषेत ज्यास चौक म्हणतात, असा प्रशस्त सभामंडप लागतो. त्याभोवती ओवऱ्यांची रचना केलेली आहे. यात बैठक व्यवस्था केलेली आहे. पुढे मंदिराची मुख्य दुमजली इमारत उभी आहे.
चौकातून सात पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. येथे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना उंच देवळ्यामध्ये जय-विजय या वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. वरच्या सज्जासारख्या लाकडी भागामध्ये देवकीकृष्णाची मोठी प्रतिमा लावलेली आहे. येथून कमानदार प्रवेशद्वारातून मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो.
हा सभामंडप प्रशस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या बाह्य भिंतीत अनेक खिडक्या आहेत. या भिंतींपासून आत काही फूट अंतर सोडून मोठा व्यास असलेल्या गोलाकार स्तंभांची रांग आहे. सभामंडपात मध्यभागी समई ठेवलेली आहे. छतास अत्यंत सुंदर असे बिलोरी काचांचे झुंबर आहे. कुरूक्षेत्रावर अर्जुनास गीता उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भव्य उठावशिल्प या सभामंडपात छताकडील भागावर लावण्यात आलेले आहे.
मंदिराच्या अंतराळास चांदीचा पत्रा चढवलेले कमानदार प्रवेशद्वार आहे. त्याच्या कमानीवर दशावतरांची चित्रे कोरलेली आहेत. द्वारस्तंभाच्या तळभागी वैष्णव द्वारपाल व त्यांवर हंसाची चित्रे कोरलेली आहेत. ललाटबिंबस्थानी पंचमुखी नागदेवतेचे मोठे शिल्प आहे.
याच्यावर सज्जामधील देवकोष्टकात देवकी-कृष्णाची मूर्ती, त्याच्या एका बाजूस गरूड तर दुसऱ्या बाजूस हनुमानाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारचौकटीसही चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवलेले आहे. त्यावर ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख व द्वारस्तंभांवर खालच्या भागात गरुड आणि हनुमंताची प्रतिमा कोरलेली आहे. आत चांदीच्या उंच सुशोभित देव्हाऱ्यामध्ये देवकी-कृष्णाची वस्त्रालंकारांनी शृंगारलेली मोठी मूर्ती विराजमान आहे. येथे देवकीमातेच्या कुशीमध्ये बालकृष्ण बसलेले आहेत. या मूर्तीसमोर देवकी-कृष्णाची काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्ती ठेवलेली आहे. देवकी-कृष्णाची मूळ मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे देवकीमातेने घोळदार घागरा परिधान केला आहे व ती समचरण उभी आहे. तिच्या गळ्यात विविध अलंकार आहेत. तिने खांद्यावरून मागून वस्त्र घेतलेले आहे. मस्तकी किरीट धारण केलेला आहे. तिच्या कटेवर बालकृष्ण बसलेला आहे. बालकृष्णाच्या उजव्या हातामध्ये लोण्याचा गोळा आहे. इतिहास अभ्यासक डॉ. रोहित आर. फालगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पाषाणाची मूर्ती १५व्या-१६व्या शतकातील, विजयनगर साम्राज्याच्या काळातील आहे. मंदिराच्या गर्भगृहावर अष्टभुजाकार बसक्या मनोऱ्यासारखे शिखर, त्यावर घुमट व कलश आहे.
देवकीकृष्ण मंदिराच्या डाव्या बाजूस भूमिका देवीचे अलीकडे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. भूमिकेस कृष्णाची बहिण मानली जाते. स्थानदेवी या स्वरूपात ती येथे पूजली जाते. या शिवाय येथे लक्ष्मीदेवी व कोकणचा क्षेत्रपाळ रवळनाथ, लक्ष्मीनारायण, कात्यायनी देवी, महादेव, दाडसाखळ, रामपुरूष म्हाळे, पंचिष्ट देवता यांचीही मंदिरे आहेत. या प्रांगणात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यांसाठी बांधलेले भव्य देवकीकृष्ण सभागृह, त्याच प्रमाणे भक्तांसाठी अग्रशाळा आहे.
या मंदिरात वर्षभर विविध उत्सवांची रेलचेल असते. यात कृष्ण जन्माष्टमी, गोवर्धन प्रतिपदा, दीपावली, रथसप्तमी, रामनवमी, शिवरात्र, नवरात्री, चिखलकाला आदी उत्सवांचा समावेश आहे. मार्गशीर्ष शुद्ध दशमी ते त्रयोदशी या दरम्यान येथे भव्य जत्रोत्सव भरतो. मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी हा जत्रेचा मुख्य दिवस असतो. जन्माष्टमीचा उत्सव येथे अत्यंत धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. येथील चिखलकाला हा उत्सव संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध आहे. आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी मंदिरासमोरील मैदानात केलेल्या चिखलात आबालवृद्ध पुरूष लोळण घेतात. हा खेळ पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी जमते.