वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांवर जरब बसवण्यासाठी पेशव्यांनी बांधलेल्या वजिरगडावर म्हणजेच आताच्या हिराडोंगरी टेकडीवर दत्तगुरूंचे प्रसिद्ध मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण असलेल्या या ठिकाणी प्राचीन व पवित्र स्थानी दत्त सूक्ष्मरूपाने वास करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. दत्त जयंतीला येथे होणाऱ्या मोठ्या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात.
वसई किल्ला ते अर्नाळा किल्ला या दरम्यानचा वजिरगड हा मूळचा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला. इ.स. १५३४ मध्ये गुजरातचा सुलतान बहादूरशाह याने पोर्तुगीजांचा गोव्यातील गव्हर्नर नुनु द कुन्य (नुनो डिकुन्हा) यास वसई देऊन टाकली होती. यानंतर लगेचच, २३ डिसेंबर १५३४ रोजी त्याने वसईत बहादूरशाहने बांधलेल्या मातीच्या किल्ल्याच्या ठिकाणी दगडाचा किल्ला बांधला. पुढे वसईच्या किल्ल्यास पूरक म्हणून त्याने माणिकपूरनजीकच्या एका टेकडीवर वजिरगड हा किल्ला उभारला. या नावाचे पुढे वज्रगड असे संस्कृतीकरण झाले. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या वसई मोहिमेदरम्यान इ.स. १७३८ मध्ये मराठ्यांच्या फौजेने वजिरगड काबिज केला. वसईला शह देण्यासाठी मोक्याची जागा असल्यामुळे मराठ्यांनी नंतर हा किल्ला पक्का बांधून काढला. ८ डिसेंबर १७३८ च्या पेशव्यांचे सरदार वासुदेव जोशी मुरूडकर यांच्या एका पत्रामध्ये ‘डोंगरीच्या घेरीयास पाया अवघा जाहला’ असे म्हटलेले आहे.
कालौघात हा किल्ला नामशेष झाला असून तो आता ‘हिराडोंगरी टेकडी’ म्हणून ओळखला जातो. येथे जमिनीत खोदकाम केल्यास काचेसारखे दगड सापडतात. त्यामुळे या टेकडीला ‘हिरा डोंगरी’ हे नाव पडल्याचे बोलले जाते. पेशवेकाळात या ठिकाणाचा बुरूज म्हणून वापर केल्याने त्याला ‘बुरूजगड’ असेही म्हणतात. दक्षिण आणि उत्तर वसईला जोडणारा दुवा असलेली सुमारे दीडशे फूट उंचीची ही टेकडी वसई तालुक्यातील गिरीज आणि भुईगाव या गावांदरम्यान आहे. येथील दत्त मंदिरामुळे या टेकडीला ‘दत्त डोंगरी’ किंवा ‘गिरीज डोंगरी’ म्हणूनही ओळखले जाते.
शांत व निसर्गरम्य परिसर लाभलेली ही टेकडी वसई रेल्वे स्थानकापासून गिरीजकडे जाताना रस्त्याच्या उजवीकडे आहे. खासगी मालमत्ता असलेल्या या मंदिराच्या लोखंडी प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा आहे. दोन्ही बाजूंना असलेल्या वनराईच्या मधोमध बांधलेल्या पक्क्या रस्त्याने चालत मंदिर असलेल्या टेकडीवर येता येते. पायऱ्या असलेल्या अन्य मार्गानेही मंदिरापर्यंत येता येते. जैविक विविधतेने नटलेल्या या परिसरातून जाताना विविध पक्ष्यांचे कुजन कानावर पडत असते. आठ ते दहा मिनिटांच्या चढाईनंतर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे पिंपळ, औदुंबर, कडुलिंब व करूचसारखे वृक्ष, तशीच विविध रानफुले आढळतात. या टेकडीवरून वसईचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराच्या डाव्या बाजूला मोठी विहीर आहे. परिसरातील कडुलिंबाच्या मोठ्या झाडाजवळ शिवशंकराची पिंडी तसेच हनुमानाची मूर्ती आहे. हनुमानाचे येथील स्थान जुने असून, १८८२ च्या ठाणे गॅझेटियरमध्ये येथील हनुमानाच्या छोट्या मंदिराचा उल्लेख आहे.
दत्त मंदिरासमोर आकर्षक दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. मंदिराची रचना साधी पण सुंदर आहे. मंदिराच्या वास्तूच्या खालील बाजूस सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. त्यामुळे सर्व मंदिरांचा भार या हत्तींनी तोलून धरल्याचा भास होतो. मंदिरावर आकर्षक शिखर असून मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला असलेल्या मेघडंबरीत गजानन महाराजांची मूर्ती आहे. मंदिरावर आकर्षक नक्षीकाम आहे.
दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराला एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांवर आकर्षक कलाकुसर व मंगलकलश आहेत. येथील सभामंडपात प्राचीन औदुंबर वृक्ष आहे. तो सभामंडपाच्या छताबाहेर वरच्या दिशेने गेला आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान हा वृक्ष तसाच ठेवून बांधकाम करण्यात आले. गर्भगृहात एका चौथऱ्यावर दत्तात्रयांची मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे गाय तसेच पुढील बाजूस श्वान आहेत. मूर्तीच्या बाजूला मोठा त्रिशूल आहे. मूर्तीसमोर दत्तमूर्ती असलेली शिळा आहे. समोरच दर्शनासाठी पादुका ठेवण्यात आल्या आहेत. येथील खिडक्यांच्या काचेवर कोरलेल्या चित्रांतून गुरुचरित्रातील अध्याय प्रतित होतात.
दररोज सकाळी ७ ते ८ आणि संध्याकाळी ४.१५ ते ७ वाजेपर्यंत व गुरुवारी सकाळी ६ ते दुपारी १२.३० तसेच संध्याकाळी ४.१५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन श्रीदत्तांचे दर्शन घेता येते. दत्त जयंतीला येथे मोठा उत्सव असतो. त्या दिवशी येथे जत्रा असते. परिसरात विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने लागतात. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. या दिवशी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या दिवशी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते.