ठाणे रेल्वे स्थानकाजवळ व गजबजलेल्या एसटी डेपोच्या शेजारील रस्त्याने सिडको बस थांब्याकडे जाताना जुने ठाणे म्हणून ओळखला जाणारा चेंदणी कोळीवाडा लागतो. रेल्वे स्थानक, एसटी डेपो, रिक्षा थांबा आणि जवळच असलेला फुलांचा बाजार यामुळे या परिसरात कायमच मोठी गर्दी असते. या गर्दीत, गजबजाटात ठाण्यातील इतिहासकालीन दत्त मंदिर वसलेले आहे. चेंदणी कोळीवाड्यातील असंख्य कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या दत्तात्रेयांच्या या मंदिर परिसरात अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचे शिष्य आनंद भारती महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वामींच्या पवित्र पादुकाही प्रतिष्ठापित आहेत. यामुळे या मंदिरास स्वामीभक्तांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
चेंदणी हा ठाण्यातील एक सर्वांत जुना कोळीवाडा होय. येथे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिश वसाहतकाळात स्थापन झालेल्या या दत्त मंदिरामागे आनंद भारती महाराज यांची प्रेरणा होती. आनंद भारती यांचे पूर्वायुष्यातील नाव पांडुरंग नाखवा असे होते. गुलाम नाखवा घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या कोळी कुटुंबामध्ये इ.स. १८३१ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ यांचे शिष्यत्व पत्करले होते. त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारीचा होता. त्यामुळे त्यांना नियमितपणे समुद्रात मासेमारीसाठी जावे लागत असे. अशाच एका प्रवासात त्यांना स्वामी समर्थांच्या चमत्काराची प्रत्यक्ष प्रचिती आल्याचे सांगितले जाते. या संदर्भातील आख्यायिका अशी की एकदा पांडुरंग नाखवा मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते.
त्यावेळी अचानक समुद्राला मोठे उधाण आले आणि त्यांच्या जहाजात पाणी शिरू लागले.
जहाजाचे तांडेल असलेल्या पांडुरंग नाखवा यांनी अशा बिकट प्रसंगी जीवाच्या आकांताने स्वामी समर्थांचे स्मरण केले. त्यांनी स्वामींना हाक मारताच, प्रचंड लाटांवर भरकटत असलेली त्यांची होडी काही क्षणांतच पूर्णपणे स्थिर झाली. स्वामींच्या कृपेमुळेच आपण आणि आपले खलाशी वाचले या श्रद्धेने पांडुरंग नाखवा यांनी पुढील आयुष्य स्वामींच्याच चरणी समर्पित करण्याचा निश्चय केला. यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला गेले. तेथे स्वामी आपल्या भक्तांसह नामकीर्तनात दंग होते. त्यांना पाहताच पांडुरंग नाखवा यांनी धावत जाऊन त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्यावेळी स्वामी समर्थांनी त्यांनी मायेने उठवून पोटाशी धरले. ते म्हणाले, “अरे कोळ्याच्या पोरा, या साध्या सागराला एवढा काय घाबरतोस? तुला तर हा भवसागर तरून जायचे आहे. ये आनंद लेव और भारती हो जाव.” स्वामी समर्थांच्या अवतारसमाप्तीपूर्वी म्हणजेच इ.स. १८७८ च्या आधी ही घटना घडली, असे सांगण्यात येते.
स्वामी समर्थांच्या आदेशानंतर पांडुरंग नाखवा यांनी संन्यास स्वीकारला. ब्रिटिशांनी १८५३ मध्ये येथे रेल्वे सेवा सुरू केली होती. ठाण्यातील रेल्वे मार्गाच्या एका बाजूस चेंदणी कोळीवाडा होता, तर दुसऱ्या बाजूस ठाणे शहर विस्तारले होते. पांडुरंग नाखवा यांनी या चेंदणीतील एका औदुंबर वृक्षाखाली साधी झोपडी बांधली व तेथे ते अखंड भजन आणि नामस्मरण करीत राहू लागले. सुरुवातीला स्थानिक रहिवासी त्यांना ‘पांडुबाबा’ म्हणत असत. कालांतराने त्यांना ‘आनंद भारती महाराज’ म्हणून ओळख लाभली. ते आपल्या मोठ्या शिष्यपरिवारासह नियमितपणे अक्कलकोटची वारी करत असत. पुढे वयोमानानुसार त्यांना प्रवास करणे त्रासदायक ठरू लागले. त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी स्वामींच्या पादुका ठाण्यातच स्थापित करण्याचा आग्रह धरला. हा आग्रह फलद्रूप झाला आणि आनंद भारती महाराज राहत असलेल्या औदुंबर वृक्षाखालीच स्वामींच्या पवित्र पादुकांची इ.स. १८६६ मध्ये स्थापना करण्यात आली. ही स्थापना स्वामी समर्थांच्या महासमाधीच्या १२ वर्षे आधी झाली होती. त्यानंतर या वृक्षाशेजारीच एक सुंदर मंदिर उभारण्यात आले. तेथे इ.स. १८८० मध्ये भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कालौघात या मंदिरात अनेक सुधारणा होत गेल्या.
मंदिराचा शेवटचा मोठा जीर्णोद्धार इ.स. १९२१ मध्ये झाला होता. हे मंदिर ऐतिहासिक वारसा जपणारे ठाण्यातील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र मानले जाते.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वड आणि पिंपळाचे जुने एकत्र वृक्ष आहेत. या वृक्षांभोवती सुंदर पार बांधलेला आहे. या पाराच्या शेजारीच एक स्वच्छ तुळशीवृंदावन पाहायला मिळते. या परिसरात आनंद भारती महाराजांचे परमशिष्य काशिनाथ महाराज यांचे समाधी मंदिर बांधलेले आहे. काशिनाथ महाराजांच्या या समाधी मंदिराच्या पाठीमागे सतोबा या लोकदेवतेचे मंदिर आहे. पूर्वीच्या काळी या सतोबा मंदिरात सर्पदंशावर पारंपरिक उपचार केले जात असत.
येथील मूळ दत्त मंदिराची मुख्य बांधणी लाकडी व दुमजली स्वरूपाची आहे. मंदिराच्या तळमजल्यावर प्रशस्त सभागृह आणि गर्भगृह आहे. सभामंडपाच्या वरच्या भागात गॅलरीसारखा दुसरा मजला आहे. पूर्वीच्या काळात येथे बसून महिला कीर्तन आणि प्रवचनांचा लाभ घेत असत. या सभामंडपाचे छप्पर लाकडी बांधणीचे आहे. हे छप्पर चांगलेच उंच आहे. सभामंडपामध्ये असलेल्या गर्भगृहाचे उंच शिखर या छपरामध्ये सहजपणे सामावून गेले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे शिखर असलेले गर्भगृह अभावानेच पाहायला मिळते.
मंदिराला प्रवेशासाठी दोन दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा गर्भगृहातील दत्तमूर्तीच्या डाव्या बाजूला उघडतो. दुसरा मुख्य दरवाजा दत्तमूर्तीच्या अगदी समोर आहे. या समोरील मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना दोन उंच दगडी दीपमाळा उभारलेल्या आहेत.
डाव्या बाजूच्या दरवाजातून मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच विठ्ठल आणि रखुमाईची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना इ.स. १९७७ मध्ये करण्यात आली. गर्भगृहाच्या एका बाजूला मारुतीची आणि दुसऱ्या बाजूला शीतळादेवीची मूर्ती स्थापित आहे. याशिवाय येथे शंकर आणि गणपती यांच्याही पाषाणमूर्ती विराजमान आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर एका बाजूला अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बाजूला आनंद भारती महाराज यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहात मुख्य स्थानावर दत्त महाराजांची प्रसन्नवदन मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीसमोरच स्वामी समर्थांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. दरवर्षी दत्त जयंतीच्या मुख्य दिवशी भक्तांना या चांदीच्या पादुकांचे अगदी जवळून दर्शन घेता येते.
या मंदिरात आषाढी एकादशी, दत्त जयंती, नागपंचमी, रामनवमी, गोकुळाष्टमी आणि हनुमान जयंती हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सर्व उत्सवांमध्ये चेंदणी परिसरातील शेकडो कोळी बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी १२:३० व सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.