दासोपंत समाधी मंदिर

अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड

गीतारंभ, गीतार्थचंद्रिका, प्रबोधोदय, पदार्णव, ग्रंथराज, उपनिषद भाष्य (संस्कृत), पसोदी, पंचीकरण आदी ग्रंथांचे रचयिते दासोपंत यांनी एकूण पाच लाखाहून अधिक ओव्या रचल्या आहेत. सन १५५१ साली भाद्रपद शुद्ध अष्टमी या दिवशी दासोपंतांचा जन्म नारायणपेठ (बिदर) येथे वडील दिगंबरपंत देशपांडे व आई पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. दिगंबरपंत राजाच्या दरबारी महसुलाचे मुख्य अधिकारी असल्यामुळे घरी अफाट श्रीमंती होती. वयाच्या सोळाव्या वर्षी दासोपंतांनी गृहस्थ जीवनाचा त्याग करून संन्यस्त जीवन स्वीकारत जनकल्याणाचा ध्यास धरला. वयाच्या ३५व्या वर्षी त्यांनी अंबाजोगाईला येऊन मठाची स्थापना केली व वयाच्या ६४व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली. त्यांचे समाधी मंदिर चैतन्याचा स्रोत आहे. आजही येथे त्यांचे अस्तित्व जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे समाधी मंदिर सतराव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात बांधले गेले असले, तरी येथील नृसिंह मंदिर त्याहून अधिक प्राचीन आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. दासोपंतांबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार, दासोपंतांचा अंतकाळ जवळ आल्यानंतर त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले व स्वतःच्या हाताने बनवलेली दत्तात्रेयांची मातीची मूर्ती दिली. मूर्ती धान्याच्या रांजणात पुरून ठेवण्यास सांगितले. ही मूर्ती एक महिन्यात पितळेची, दोन महिन्यांत पंचधातूची, तीन महिन्यांत चांदीची, चार महिन्यांत सोन्याची व पाच महिन्यांत हिऱ्याची होईल, असे त्यांनी सांगितले. परंतु, मूर्ती धान्याच्या भांड्यातून पाच महिन्यांच्या आधी बाहेर काढू नये, अशी अट घातली. दासोपंतांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या एका शिष्याने दोन महिन्यांतच मूर्ती गुपचुप बाहेर काढून पाहिली. तेव्हा ती पंचधातूची झालेली पाहून त्याने मूर्ती पुन्हा पुरून ठेवली. पाच महिन्यांनी सर्व शिष्यांनी एकत्र येऊन मूर्ती बाहेर काढून पाहिली, तेव्हा ती पंचधातूची होती. त्यावेळी कोणीतरी ही मूर्ती दोन महिन्यांतच बाहेर काढली होती, हे सर्वांच्या लक्षात आले.

एकांत ठिकाणी असलेल्या या समाधी मंदिरास तटबंदी आहे. या तटबंदीत प्रवेशद्वार आहे. दासोपंतांचे समाधी मंदिर अतिशय साधे आहे. मंदिराच्या समोर तसेच डाव्या व उजव्या बाजूला दरवाजे आहेत. समाधी मंदिरात मध्यभागी दासोपंतांच्या समाधीचा कोरीव पाषाणात बांधलेला चौथरा आहे. समाधी मंदिरात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. भिंतींवर दासोपंतांच्या रचना असलेले फलक लावले आहेत.

मंदिरासमोर प्रांगणात पिंपळाच्या झाडाखाली लहान देवळी आहे. त्यात स्थानिक देवतेची पाषाण मूर्ती आहे. मंदिराच्या मागे प्रांगणाच्या उंच भागात नृसिंह मंदिर आहे. येथे जाण्यासाठी पाषाण बांधणीच्या चार पायऱ्या चढून जावे लागते. प्रांगणाच्या या भागात साधू व सत्पुरुषांच्या अनेक समाध्या आहेत. पुढे हेमाडपंती शैलीतील दगडी बांधकाम असलेले प्राचीन नृसिंह मंदिर आहे. मंदिर उंच चौथऱ्यावर उभे आहे. सभामंडपात जाण्यासाठी दोन पायऱ्या आहेत. सभामंडपाची समोरील बाजू पूर्णतः खुली आहे आणि दोन्ही बाजूला चौथरे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारात चार नक्षीदार स्तंभ आहेत. बाजूचे दोन स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारशाखांच्या खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका, गंगा, यमुना आदी शिल्पे आहेत, तर वरील बाजूस पर्णशाखा, पुष्पशाखा, स्तंभशाखा, वेलबुट्टीशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. तोरणात स्तंभनक्षी आहे. गर्भगृह डोंगराच्या नैसर्गिक गुहेत असल्यामुळे सभामंडपातून वज्रपीठापर्यंत डाव्या, उजव्या बाजूला वळणे घेत जावे लागते. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नृसिंह देवाची चतुर्भुज कोरीव मूर्ती आहे. नृसिंह देवाच्या उजव्या व डाव्या बाजूला महालक्ष्मी व पद्मावती देवीच्या मूर्ती आहेत.

नृसिंह मंदिराच्या बाजूला कोरीव पाषाणात बांधलेले कुंड आहे. या कुंडातील पाणीसाठा अक्षय असल्याचे सांगितले जाते. कुंडाच्या बाजूला प्राचीन काळात बांधल्या गेलेल्या दगडी बांधकाम असलेल्या ओवऱ्या आहेत. प्राचीन काळात या ओवऱ्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून केला जात असे. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा व चौथऱ्यावर दीपमाळ आहे. दीपमाळेच्या शेजारी शिवमंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. या मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक शिवमंदिर आहे.

मंदिरात नृसिंह जयंती, दत्त जयंती व भाद्रपद शुद्ध अष्टमी हा दासोपंतांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील शेकडो भाविक दासोपंतांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात महाशिवरात्री, नागपंचमी, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात सोमवार व गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती:

  • अंबाजोगाई बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • बीड येथून ९६ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून अंबाजोगाईसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

दासोपंत समाधि मंदिर

अम्बाजोगाई, ताल. अम्बाजोगाई, जिला. बीड

Back To Home