
अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या कोकणात गणेशाची अनेक जागृत स्थाने आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे गुहागर तालुक्यातील हेदवी येथील दशभूज लक्ष्मीगणेश मंदिर. दहा हातांची म्हणजेच दशभूज लक्ष्मीगणेशाची मूर्ती असलेले कोकणातील हे एकमेव मंदिर समजले जाते. निसर्गाच्या कोंदणात वसलेले व एका छोट्या डोंगराच्या पठारावर असलेले हे स्थान पेशवेकाळापासून प्रसिद्ध आहे. सिद्धिबुद्धीसोबतच लक्ष्मीचेही वरदान देणारा हा गणेश सर्वांची मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. हेदवी येथील मंदिरात उपासना करावी व तीर्थाटन करावे, अशी त्यांची कालक्रमणा सुरू होती. एकदा पुण्यात त्यांची भेट थोरल्या माधवराव पेशव्यांबरोबर झाली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या दिव्य संदेशाची प्रचिती आल्याने पेशव्यांनी त्यांना एक लाख रुपये दिले. या पैशांमधून स्वामींनी हेदवी येथील हे गणेश मंदिर बांधले; परंतु कालौघात हे मंदिर जीर्ण झाले होते.
याच गावातील शिवराम गोविंद ऊर्फ काकासाहेब जोगळेकर हे दररोज मंदिरात दर्शनासाठी येत असत. दिवसेंदिवस ढासळत असलेले मंदिर पाहून त्यांना वाईट वाटत होते; परंतु आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे ते हतबल होते. मात्र एके दिवशी त्यांनी ‘जोपर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही, तोपर्यंत माझ्या घराचे छप्पर दुरुस्त करणार नाही,’ असा मनोमन निश्चय केला व पैसे कमाविण्यासाठी हेदवी सोडून ते मुंबईला आले.
मुंबईत आल्यावर काकासाहेबांनी अत्यंत परिश्रम घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. चिकाटीने व्यवसाय करून गाठीशी पैसा जमा झाल्यावर त्यांनी आपले मित्र व उद्योगपती संभू हेदवकर यांच्याजवळ गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराची कल्पना मांडली. या दोघांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपल्याजवळील धन दिलेच, पण याशिवाय मुंबईतील अनेकांनी या कामासाठी साह्य केले. १९५४–५५ मध्ये जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर १९५६ पासून माघ महिन्यातील गणेश जन्मोत्सव सुरू करण्यात आला. त्यासाठी
दरवर्षी येथे प्रसिद्ध कीर्तनकार बोलावण्यात येऊ लागले. दिवसेंदिवस मंदिराची ख्याती वाढू लागल्याने परिसरातील अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान बनले.
गुहागरकडून हेदवीकडे येताना, डाव्या बाजूला दिसणाऱ्या डोंगर पठारावरील, किल्लेवजा दगडी तटबंदीत हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत चढून जाण्यासाठी जुना पायरी मार्ग असून आता नव्याने डांबरी रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरापर्यंत वाहने जाऊ शकतात. मंदिरासमोर एक पेशवेकालीन दीपमाळ आहे. मुख्य मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. दीपमाळ ते मंदिराचे प्रवेशद्वार या मोकळ्या जागेवर भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीतर्फे पत्र्याची शेड उभारण्यात आलेली आहे. सभामंडपात गर्भगृहाजवळील उजव्या कोनाड्यात गरुडावर आरूढ विष्णूची मूर्ती आहे. त्याच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली असून बाजूस जयविजय आहेत. भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती, अशी कथा पुराणात आढळते. त्या पदकमलांचे चिन्हही या मूर्तीच्या छातीवर स्पष्टपणे दिसते.
मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गर्भगृहात असलेली दशभुजा लक्ष्मीगणेशाची मूर्ती. सुमारे एक मीटर उंचीची ही वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती गर्भगृहातील एका चौथऱ्यावर आसनस्थ आहे. असे सांगितले जाते की ही मूर्ती काश्मीर येथे घडवली गेली आहे. या गणेशाला दहा हात असून उजवीकडील वरच्या पहिल्या हातात चक्र, दुसऱ्यात त्रिशूळ, तिसऱ्यात धनुष्य, चौथ्यात गदा तर पाचव्या हातात म्हावळुंग हे प्रजोत्पादन दर्शक फळ हातातील दोन बोटांत पकडून बाकी आशीर्वादात्मक स्थिती आहे. डावीकडील वरच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्यात पाश, तिसऱ्यात नीलकमल, चौथ्या हातात रदन (दात) व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या सोंडेमध्ये अमृतकलश असून गळ्यात नागयज्ञोपवीत (जानवे) धारण केलेले आहे. श्रीगणेशाचा डावा पाय गुडघ्यात दुमडून जमिनीवर आडवा ठेवलेला आहे. त्या मांडीवर
सिद्धलक्ष्मी आहे. उजवा पाय गुडघ्यात दुमडून तो जमिनीवर टेकवलेला आहे. उजव्या पायापाशी मूषकराज आहे. मूर्तीला दररोज विविध वस्त्रालंकारांनी सजविले जाते. या मूळ मूर्तीच्या समोर एक गणेशाची तांब्याची मूर्ती व त्यापुढे पादुका आहेत.
माघी चतुर्थीला दुपारी १२ वाजता गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर सजविलेल्या एका रथातून गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक सायंकाळपर्यंत गावात फिरते. तीन दिवस हा उत्सव चालतो. प्रत्येक संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी व अंगारकी चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. या काळात गणेशाच्या मूर्तीवर विविध अलंकार चढविले जातात. दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना या गणेशाचे दर्शन घेता येते.
गणेश मंदिराशिवाय हेदवी हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील बामणघळीसाठी. हेदवी गणेश मंदिरापासून साधारणतः तीन किमी अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर उमामहेश्वराचे लहानसे मंदिर आहे. या मंदिरापासून जवळच किनाऱ्यावरील कातळामध्ये पूर्ण भरतीच्या वेळी निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. येथील कातळाला दहा मीटर रुंदीची व पाच मीटर खोलीची बामणघळ (खाच) आहे. या घळीतून भरतीचे पाणी जोरात आत घुसते आणि शेवटपर्यंत गेल्यावर तेथील खडकावर आदळून वेगाने वरच्या बाजूला उडते व १५ ते २० मीटर उंचीचा जलस्तंभ तयार होतो. हा जलस्तंभ पाहण्यासाठी व तो खाली येत असताना त्यातून उडणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी येथे पर्यटक येत असतात. पूर्ण भरतीच्या वेळीच हा जलस्तंभ तयार होतो. त्यामुळे तेथे जाताना पूर्ण भरतीची वेळ पाहूनच जायला हवे. अशी अख्यायिका आहे की एकदा रात्रीच्या वेळी एक ब्राह्मण येथील पायवाटेने चालत असताना तो या घळीत पडला. इतक्यात जोराची लाट आतमध्ये आली आणि तिच्या जोरदार माऱ्यामुळे तो गतप्राण झाला. तेव्हापासून ही घळ बामणघळ म्हणून परिचित आहे.