
शिवपुराणात वर्णन केलेल्या कथेनुसार दाक्षायणी देवी (सती) ही दक्ष राजाची कन्या होय. या देवीचे देशातील एकमेव मंदिर लासूरगावी शिवना नदीतीरी आहे. अन्यत्र कोठेही या देवीचे पीठ नसल्याने देशभरातून या देवीच्या दर्शनासाठी लासूर येथे भाविक येत असतात. ही देवी लासूरसह संपूर्ण वैजापूर तालुक्याची ग्रामदेवता मानली जाते. डोक्यावर चांदीचा मुकुट आणि अंगभर दागिने परिधान केलेल्या या देवीचे दर्शन घेऊन नववधूने आपल्या संसारास सुरुवात करण्याचा येथे रिवाज आहे.
पौराणिक कथेनुसार, लासूर ही दक्षनगरी होती. या ठिकाणी दक्ष राजाने एकदा पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. दाक्षायणी ही दक्षाची कन्या असूनही तिला त्याने आमंत्रित केले नव्हते.
तिने शंकराशी विवाह केल्यामुळे तिच्यावर त्याचा राग होता. मात्र आपल्या पित्याने यज्ञाचा घाट घातला असल्याचे समजल्यानंतर दाक्षायणीने विचार केला की हा आपल्या माहेरचाच सोहळा आहे. तेथे आमंत्रण येण्याची काय वाट पाहायची? ती यज्ञसोहळ्यास गेली. आपल्या पित्याला विचारले की येथे एवढा मोठा सोहळा आयोजित केला, सर्व देवादिकांना बोलावले; परंतु माझ्या पतीला का आमंत्रण दिले नाही? त्यावरून दक्ष राजाने तिला अवमानित केले. तिच्या पतीची चेष्टा केली. त्यामुळे दाक्षायणी संतापली व तिने तेथील यज्ञकुंडात उडी घेतली.
दक्ष राजाने दाक्षायणीचा अपमान करून मृत्यूस भाग पाडले, हे समजताच शंकर क्रोधित झाला. त्याने तांडव आरंभले. लासूर येथे येऊन त्याने दक्ष राजाशी युद्ध केले. त्यात त्याने दक्षाचे शीर उडवले. ते ज्या ठिकाणी पडले, ते ठिकाण आता शिरेगाव देवळी म्हणून ओळखले जाते. हे गाव लासूरनजीक आहे. त्यावेळी शंकराच्या नंदीने यज्ञस्थळी येऊन ते पालथे केले. लासूरमधील एका टेकडीचा भाग पालथे लासूर म्हणून आजही ओळखला जातो.
नंतर ही देवी पुन्हा लासूर क्षेत्री प्रकटली. ही कथा सांगणारी देवीची गाणी आणि गोंधळ येथे प्रसिद्ध आहेत.
लासूरमध्ये पूर्वी दाक्षायणी देवीचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील प्राचीन मंदिर होते. आता येथे आधुनिक पद्धतीने भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरास दाक्षिणात्य पद्धतीचे प्रशस्त असे दुमजली प्रवेशद्वार आहे. वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम असलेल्या या प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या वरील बाजूस तीन कळस आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोरच दाक्षायणी देवीचे भव्य मंदिर आहे. जमिनीपासून सात ते आठ फूट उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वारापासून १२ ते १४ पायऱ्या आहेत. दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपात मोठे यज्ञकुंड असून देवीने पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली, अशी आख्यायिका असल्यामुळे तेथील यज्ञकुंड कायम धगधगत असतो. या यज्ञकुंडातील अंगारा कपाळी लावल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दर्शनमंडपापासून आणखी चार पायऱ्या वर गेल्यावर सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा असून येथील प्रत्येक दोन खांब कमानीसदृश्य कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. उत्सवकाळात येथे प्रचंड गर्दी होत असल्याने सभामंडपात दर्शनरांग तयार करून भाविकांची सोय करण्यात आली आहे. सभामंडपात देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. ही मूर्ती अखंड दगडी शिळेमध्ये कोरलेली आहे. या सिंहमूर्तीच्या शेजारीच कासवाचे दर्शन होते. गर्भगृहात चांदीच्या मखरात देवीची पाषाणमूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. गजमुखे तसेच पानाफुलांच्या नक्षीने हा मखर सजवण्यात आला आहे. देवीच्या एका बाजूस चांदीचा मोठा त्रिशूळ असून दुसऱ्या बाजूस मोरपिसांचा गुच्छ आहे. गर्भगृहाबाहेर प्रदक्षिणा मार्ग आहे. या गर्भगृहावर एक मुख्य व चार दिशांना चार शिखरे आहेत. या सर्व शिखरांवर अनेक उपशिखरे कोरलेली आहेत.
मंदिरासमोरील प्रांगणात एक वैशिष्ट्यपूर्ण उंच दीपमाळ असून त्यावर खालपासून वरपर्यंत सिंहमूर्ती कोरलेल्या आहेत. याच्या बाजूलाच मंदिराच्या आवारात घाटेश्वर महादेवाचे सुबक मंदिर आहे. या मंदिरासमोर नंदीची पाषाणमूर्ती आहे. याच प्रमाणे येथे गणपतीचेही छोटे मंदिर आहे.
चैत्र वद्य पंचमीला सुरू होणारा यात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजेच सुमारे १२ दिवस चालणारी ही यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक समजली जाते. या कालावधीत लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. नऊरात्रीतही येथे मोठा उत्सव साजरा होतो. नऊही दिवस येथे राज्यभरातून आलेल्या भक्तांची गर्दी असते. या काळात श्री देवी दाक्षायणी मंदिर संस्थानतर्फे येथे दररोज सप्तशती पाठ, होमहवन व पूर्णाहुती, अभिषेक आदी धार्मिक विधी, दिवसातून तीनदा देवीची पूजा, आरती, नैवेद्य, चौघडा वादन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. त्यानंतर देवीचा वस्त्रालंकार परिधान विधी केला जातो. विजयादशमीच्या दिवशी पानसुपारी, सीमोल्लंघन व शमीपूजन असे विविध कार्यक्रमही केले जातात. मंदिर संस्थानतर्फे येथे गोशाळा चालवण्यात येते.
दाक्षायणी देवीच्या वास्तव्यामुळे लासूरगाव हे प्रसिद्ध आहेच पण याशिवाय यादवांच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडलेले ठिकाण म्हणूनही या गावची इतिहासात नोंद आहे. याबाबतची ऐतिहासिक कथा अशी की १३ व्या शतकात देवगिरी येथे यादवनृपती रामदेवराय राज्य करीत असताना दिल्लीच्या बादशहाचा सुभेदार असलेल्या अल्लाऊद्दीन खिलजी याने देवगिरीवर धनलोभाने हल्ला केला होता. त्यावेळी रामदेवराय यांच्या कान्हा या मांडलिक सरदाराने, तसेच त्याच्या पदरी असलेल्या दोन मराठा स्त्री योद्ध्यांनी त्याला लासूर येथे अडवले होते. त्यावेळी झालेल्या घनघोर युद्धात अल्लाऊद्दीनच्या फौजेला काही काळ माघार घ्यावी लागली होती. या युद्धात कान्हाचा पराजय झाल्यामुळे देवगिरी किल्ला अल्लाउद्दीनच्या हाती लागला.