कोकण आणि गोव्यावर निसर्गाने सौंदर्यांची मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. नारळी पोफळीच्या बागा, आमराई, देवराई, डोंगर, दऱ्या, जंगल, नद्या, समुद्र असे सारे काही उदंड दिले आणि या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी स्वतः देव राखणदार होऊन जागोजागी बसले. कोकणातील प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर राखणदार देवतांची मंदिरे आहेत. या राखणदारांची स्थळपरत्वे वेगवेगळी नावे प्रचलीत आहेत. दाड्यादेव किंवा दाडेश्वर हे त्यातील एक नाव आहे. या देवाची कोकण किनारपट्टीवर अनेक मंदिरे आहेत. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध दाडेश्वर मंदिर पेडणे तालुक्यातील धारगळ गावात आहे.
हे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत अनेक अख्यायिका प्रचलीत आहेत. या परिसराचे नाव दाडाची वाडी असून दाडेश्वर हा या परिसराचा राखणदार असल्याचे सांगितले जाते. कोकणातील इतर राखणदार देवतांप्रमाणेच तो परिसरातील माणूस, गुरे-ढोरे, शेत, पिके, बाग-बगीचे आदींचे रक्षण करतो, रात्री-अपरात्री संकटात सापडलेल्या माणसांना विविध रूपात येऊन मदत करतो,
असा अनुभव वर्षानुवर्षे पिढी दरपिढी घेतल्यानंतर सुमारे चारशे वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी या देवाचे मंदिर बांधले. देव ज्या रूपात अनेकांना दिसला त्याच रूपात येथील देवाची मूर्ती घडवली असल्याचे सांगितले जाते.
मुख्य रस्त्यालगत निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर उभे आहे. रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गावर स्वागतकमान आहे. मंदिरासमोर वाहनतळ आहे. मंदिराचे प्रांगण वाहनतळापेक्षा खाली असल्यामुळे काही पायऱ्या उतरून खाली यावे लागते. मंदिराच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. मंदिराच्या मागील बाजुला गर्द झाडी, उजवीकडे शेती व डाव्या बाजूला गोड्या पाण्याचा तलाव आहे. प्रांगणात मंदिराच्या समोर षटकोनी चौथऱ्यावर पाच थरांची षटकोनी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या प्रत्येक थरात सहा दीपकोष्टके आणि शीर्षभागी आमलक व शिखर आहे.
मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. मुखमंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे तिन्ही बाजूला पायऱ्या आहेत. मुखमंडपात समोरील बाजूला दोन चौकोनी स्तंभ असून स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. छताची मागील बाजू सभामंडपाच्या भिंतीवर आहे.
छतावर वरील मजल्याचा सज्जा आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व अर्धचंद्राकार तोरण आहे. सभामंडपात चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर वरील मजल्याच्या सज्जा आहे. सभामंडपात पितळी घंटा टांगलेल्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात उत्सव काळात वापरली जाणारी लाकडी पालखी आहे.
पुढे स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. येथे मेजावर पद्मपादुका व पूजेचे साहित्य ठेवलेले आहेत. उत्सवकाळात भाविकांना येथूनच दर्शन घ्यावे लागते. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व वरील बाजुस अर्धचंद्राकार तोरण आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख आणि दोन्ही बाजूला पानफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर दाडेश्वर देवाची काळ्या पाषाणातील अश्वारुढ द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या हातात ढाल व तलवार आहे. मूर्तीत पुढील बाजूला देवाच्या अश्वाची लगाम पकडलेल्या सेवेकऱ्याचे शिल्प कोरलेले आहे.
मागील बाजूला निशाण धरलेल्या सेवेकऱ्याचे शिल्प आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीत पानाफुलांची नक्षी आहे. देवाच्या नित्य अभिषेकाचे चांदीचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात दुसऱ्या वज्रपिठावर इतर स्थानिक देवतांची पाषाणे आहेत. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मुखमंडपाच्या छतावर घुमटाकार बाशिंग आहेत. बाशिंगावर मध्यभागी आमलक व कळस आहेत. बाशिंगाच्या उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी तीन लघू शिखरे आणि त्यांवर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आणि चारही कोनांवर स्तंभिका आहेत. छतावर मध्यभागी दोन थरांचे शिखर आहे. शिखराचा खालील पहिला थर अष्टकोनी आणि वरील थर गोल घुमटाकार आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे.
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी हा देवाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देव पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणेला निघतात. होळी पौर्णिमा व दसरा हे पालखी उत्सवाचे इतर दिवस आहेत. उत्सवप्रसंगी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथे उपस्थित राहतात. चैत्र पाडवा, महाशिवरात्री, नवरात्रोत्सव, श्रावण मास, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, दसरा, दिवाळी आदी वर्षभरातील सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. रविवार, सोमवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.