प्रभू श्रीराम हे निस्सीम शिवभक्त होते, याचे दाखले देणाऱ्या अनेक आख्यायिका जनमानसात प्रचलित आहेत. या आख्यायिकांशी संबंधित अनेक प्राचीन मंदिरे देशभरात पाहायला मिळतात. श्रीराम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना त्यांनी अयोध्येपासून महाराष्ट्रात नाशिक येथील पंचवटीपर्यंत एकत्र प्रवास केला. पंचवटी येथून रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण तिच्या शोधार्थ लंकेपर्यंत गेले. त्या प्रवासात श्रीरामांनी अनेक ठिकाणी शिवपिंडी स्थापन करून मंदिरे बांधली. गेवराई शहरातील चिंतामणेश्वर मंदिर हे त्यापैकीच एक आहे. येथील जागृत महादेवाच्या दर्शनाने भाविक चिंतामुक्त होतात, अशी श्रद्धा आहे.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर तिच्या शोधार्थ फिरत असताना श्रीराम येथे आले. त्या वेळी त्यांची भेट पार्वती म्हणजेच गौराईशी झाली. गौराईने सीतेचे अपहरण रावणाने केले असल्याचे रामाला सांगितले. सीतेचा ठावठिकाणा व ती सुखरूप आहे हे गौराईकडून समजल्यावर श्रीराम काहीसे चिंतामुक्त झाले व त्यांनी येथे शिवपिंडीची स्थापना केली. त्यामुळे या महादेवाला चिंतामणेश्वर नाव मिळाले, तर गौराईची भेट झाली म्हणून शहराला गौराई नाव पडले, ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन गेवराई हे नाव रूढ झाले.
हेमाडपंती शैलीचे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील पुजारी सांगतात. मात्र, मंदिराची स्थापत्यशैली व दगडी स्तंभांवरील कोरीव काम पाहता मंदिर याहून अधिक प्राचीन असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मंदिरातील दर्शनमंडप व इतर वास्तू कालांतराने नव्याने उभारण्यात आल्या आहेत, असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. हे मंदिर गेवराई शहरात विद्रूपा नदीच्या तीरावर वसलेले आहे. मंदिरास भक्कम तटबंदी आहे आणि या तटबंदीत प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या फरशी आच्छादित प्रांगणात लोखंडी स्तंभांवर गजपृष्ठ आकारातील छत आहे. त्याखाली दिवंगत केशिनाथ महाराज आणि शंकर महाराज या पुजाऱ्यांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या प्रांगणातच वाहनतळाची व्यवस्था आहे.
प्रांगणात दर्शनमंडपाच्या बाजूला चौथरा व त्यावर निमुळती होत गेलेली दीपमाळ आहे. चौथऱ्यावर दीपमाळेच्या बाजूला नंदी शिल्प आहे. येथेच एक लहान मंदिर आहे, ज्यात स्थानिक देवतेची मूर्ती आहे. प्रांगणात मंदिरासमोर कोरीव पाषाणात बांधलेली प्राचीन बारव आहे. विशेष म्हणजे, या बारवेतील पाणी कधीही आटत नाही, असे सांगितले जाते.
मंदिरासमोर अर्धखुल्या स्वरूपाचा दर्शनमंडप आहे. तो प्रांगणापेक्षा काहीसा उंचावर असल्यामुळे या मंडपास समोर व उजव्या बाजूला प्रत्येकी दोन अर्धचंद्राकार पायऱ्या आहेत. दर्शनमंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. हा दर्शनमंडप सुमारे शंभर वर्षांपूर्वी येथील दिवंगत पुजारी केशिनाथ महाराज यांनी बांधला होता.
पुढे मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले दगडी बांधणीचे मूळ प्राचीन मंदिर आहे. मुखमंडपात स्तंभपादावर उभे असलेले दोन नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांचा खालील सुमारे दोन फूट भाग चौकोनी आहे, तर त्यावरील भागात षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. येथे वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीला लागून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन चौथरे आहेत. त्यातील उजव्या बाजूच्या चौथऱ्यावर गणपतीची व डावीकडे मारूतीची मूर्ती आहे.
सभामंडपाच्या नक्षीदार द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे.
प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. त्यांच्या स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर कासव शिल्प आहे. सभामंडपात दोन्ही भिंतींना लागून स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन केलेले आहे.
पुढे अरुंद अंतराळ व त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी आहे, तर ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी उंच व चौकोनी शाळुंका असलेली मोठी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे आणि जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूला, मागे गोमुख प्रणाल आहे आणि त्यासमोर निर्माल्य कुंड आहे. मंदिराच्या मुखमंडप, सभामंडप व गर्भगृहाच्या छतावर शिखरे आहेत. मुखमंडपावरील गोलाकार शिखर लहान आहे. सभामंडपावर मध्यम आकाराचे घुमटाकार शिखर आहे, ज्यावर चारही दिशांना पशू शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या छतावर सर्वात उंच शिखर आहे. त्यात चारही दिशांना देवकोष्ठके व त्यात देवमूर्ती आहेत. देवकोष्ठकांच्या छतावर देखील पशू शिल्पे आहेत. या शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत, तर इतर दोन शिखरांच्या शीर्षभागी प्रत्येकी एक आमलक आहे. सर्व शिखरांवरील आमलकांवर कळस व ध्वजपताका आहेत.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. यावेळी सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सलग सात दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी आदी सण-उत्सव साजरे केले जातात.