सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली म्हणजे प्राचीन कनकवल्ली. या शब्दाचा अर्थ सुवर्णभूमी असा होतो. आध्यात्मिक सत्पुरुष प. पू. भालचंद्र महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या सुवर्णभूमीमध्ये जानवली नदीच्या किनारी चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. ही देवी चामुंडेश्वरी या नावानेही काही भागांत ओळखली जाते. देशभरात अनेक ठिकाणी चौंडेश्वरी मातेची ठाणी आहेत. कर्नाटकातील शिवमोग्गा येथील सिंगदूर चौंडेश्वरीचे ठाणे प्रसिद्ध आहे. कोकणात गिर्ये (विजयदुर्ग), तसेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडा, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, इचलकरंजी येथेही चौंडेश्वरीची मंदिरे आहेत.
नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला ओ देणारी देवी म्हणून चौंडेश्वरी ओळखली जाते. चौंडेश्वरी ही शैव परिवारातील देवता आहे. ‘श्री रुद्रयामल’ ग्रंथाच्या उत्तरखंडातील योगेश्वरीसहस्त्रनाम स्तोत्रात देवीच्या सहस्रनामांपैकी एक नाव चौंडा असल्याचे म्हटले आहे. ‘रुद्रयामल तंत्र’ ग्रंथानुसार यामल हे तंत्रशास्त्राचे एक रूप आहे. तंत्रशास्त्राचे आगम, यामल आणि तंत्र अशी तीन रूपे आहेत. त्यातील यामल ग्रंथ हे शिव आणि शक्तीची एकता अधोरेखित करीत असतात. अशा प्रकारे चौंडेश्वरी ही योगेश्वरी स्वरूप असल्याचे मानले जाते. ‘ओम श्री श्री श्री विराटरुपाया महामर्दिनी तन्नो चौंडेश्वरी प्रचोदयात’ हा या देवीचा मंत्र आहे. कणकवलीतील चौंडेश्वरी देवी ही देवांग कोष्टी समाजाचे आराध्य दैवत आहे.
कोष्टी हे जातीनाम कोसा अथवा कोष यांपासून वस्त्रे बनविणाऱ्यांना लाभले आहे. देवांग कोष्टी हे देव व उच्चभ्रू लोकांसाठी वस्रे बनवत असत. देवांग पुराणानुसार विश्वनिर्मितीनंतर मानव प्राण्यांसाठी वस्त्रे निर्माण करणाऱ्यांची निर्मिती करण्यात आली नव्हती. त्यामुळे मानवांना वल्कले व चर्म पांघरून राहावे लागत होते. त्रासलेल्या लोकांनी अखेर शिवाची याचना केली. त्यामुळे शिवाने देवांग (देवल) ऋषींना निर्माण केले. त्यांनी प्रथम विष्णूकडून धाग्यांची प्राप्ती करून घेऊन देवांसाठी वस्त्रे विणली. मग त्यांनी मयासुराकडून मानवांसाठी वस्त्रे विणायला चरखा व हातमाग मिळवला. याबाबत आणखी एक आख्यायिका अशी की एकदा ते विष्णूला वस्त्र पुरवून शंकराच्या भेटीस निघाले असता, विष्णूने त्यांना सांगितले की वाटेत तुम्हाला राक्षस भेटतील. ते तुमच्याकडे वस्त्रे मागतील, एवढेच नव्हे तर मारूनही टाकतील. म्हणून विष्णूने त्यांना सुरक्षेसाठी सुदर्शन चक्र दिले. वाटेत तसेच झाले. देवांग मुनींना राक्षस भेटला. त्यांच्यात युद्ध झाले. त्या राक्षसास अमरत्वाचा वर असल्यामुळे त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून परत अनेक राक्षस निर्माण होत असत. त्यामुळे देवांग मुनी भयभीत झाले. त्यावेळी चौंडेश्वरी देवी अवतरली व जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबाचे प्राशन करून तिने राक्षसांचा नाश केला. वस्त्राकरिता झालेल्या या युद्धाच्या वेळी चौंडेश्वरी देवी धावून आल्याने ती कोष्टी समाजाची कुलदेवता समजली जाते. चौंडेश्वरी मातेच्या आरतीतही ही कथा येते. ‘जय देवी जय देवी जय चौंडेश्वरी, देवांग ब्राह्मण कुळी वर दे सुंदरी’ असे या आरतीचे ध्रुपद आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार भारतीय वस्त्रे इ.स. पूर्व ३२०० पासून निर्यात होत होती. सिंधू संस्कृतीच्या काळानंतर कोकणातील चौल, सोपारा आदी बंदरांतून वस्त्रांचे तागे निर्यात होत होते. शैव देवता या विणकर समाजाच्या आराध्य देवता आहेत. चौंडेश्वरी माता ही त्यांतीलच एक आहे.
देवांग कोष्टी समाजातर्फे कणकवलीतील गणपती सानानजीक कांबळे लेन येथे चौंडेश्वरीचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. २००३ मध्ये ६ ते ८ मे या कालावधीत मंदिराचे उद्घाटन तसेच चौंडेश्वरी देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला होता.
शहरातील रहदारीच्या रस्त्यालगतच मंदिराच्या प्रांगणाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोर प्रांगणात वैशिष्ट्यपूर्ण असे तुळशी वृंदावन आहे. एका चौथऱ्यावर कमळपुष्पावर चार गजमुखे बसविलेली आहेत. त्यांनी आपल्या सोंडेनी हे तुळशी वृंदावन पेलले आहे, अशी रचना आहे. मंदिराचे प्रांगण मोठे आहे. येथे बगिचा आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठीची साधनेही बसवण्यात आली आहेत. तसेच भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाके आहेत. प्रवेशद्वारातून मंदिराकडे जाण्यासाठी फरसबंदी वाट करण्यात आलेली आहे. या वाटेवर मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर अर्धगोल उथळ पदप्रक्षालन कुंड आहे. त्यातून मंदिरात जाताना आपसूक पाय धुतले जातात. हे मंदिर उंच जगतीवर बांधण्यात आलेले आहे. आठ पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या बाजूला चौथऱ्यावर गजराजाच्या छोटेखानी मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
मंदिराचा मुखमंडप व सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचे आहेत व त्यात बाजूने कक्षासने आहेत. येथील सभामंडप हा तुलनेने मोठा आहे, त्यात सर्वत्र संगमरवरी फरसबंदी आहे. कक्षासनांवरील स्तंभ हे एकमेकांना कमानीसारख्या कलाकुसरीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या पुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून मध्यभागी गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर डाव्या बाजूच्या देवकोष्ठकात बन्सीधर श्रीकृष्ण व उजव्या बाजूला सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात उंच नक्षीदार स्तंभ आणि महिरपीने सुशोभित अशा संगमरवरी वज्रपीठावर चौंडेश्वरी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. कपाळावर उठावदार कुंकू, नाकात मोत्याची नथ, अंगावर विविध दागिने व साडी नेसलेले देवीचे हे रूप खुलून दिसते. ही मूर्ती पूर्वाभिमुख व अष्टभुजांकृत आहे. ती खास पंढरपूरवरून आणण्यात आलेली आहे. या मंदिराला संपूर्ण शुभ्र रंग दिल्यामुळे ते खुलून दिसते. गर्भगृहावर मध्यम आकाराचे शिखर, त्यावर तीन आमलक व त्याच्यावर पितळी कळस आहे.