
भारतातील संत आणि सुफी परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जनसामान्यांचे जीवन उन्नत व्हावे म्हणून आयुष्य वेचणारे साधू संत इथे देवपदास पोहोचले. अनेक ठिकाणी त्यांची देवालये निर्माण झाली. त्यांची समाधी स्थळे श्रद्धा आणि शक्तीचे स्रोत ठरले. यापैकीच एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेले धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील चांगदेव महाराज मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या देवस्थानाचे वैशिष्ट्य असे की येथील चांगदेव महाराजांना मुस्लिम बांधवांकडून चांग सुलतान नावाने पुजले जाते.
चांगदेव महाराजांबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की महाभारतातील पाच पांडवांनी कलियुगात अवतार घेतला. त्यातील अर्जुनाने चांगदेव महाराजांच्या रुपात अवतार घेऊन जनसामान्यांना गीतेचा बोध केला. श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चांगदेवांनी पाषाण फोडून स्वयंभू अवतार घेतला. त्यांच्याबाबत अशीही कथा आहे की चांगदेवांनी हस्तिनापूर येथे साखळी सुलतान असे नाव धारण करून वास्तव्य केले होते. तेथे त्यांनी आसू आणि कासू या दोन भावांचा उद्धार केला होता. गवळी-धनगर यांचे दैवत असलेल्या चांगदेवांची पूजा येथील मुस्लिम समाजातही केली जाते. वेल्हाणे गावचे निंबाबा भगत, महादूबा भगत, तातोबा भगत, राजबा भगत व दशरथबा भगत या चांगदेवशिष्यांनी त्यांचे जनकल्याणाचे कार्य पुढे सुरू ठेवले व आपल्या गुरूच्या मंदिरातच त्यांनी संजीवन समाधी घेतली.
चांगदेव महाराज देवस्थान हे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील नोंदींनुसार सध्याचे मोठे मंदिर इ.स. १९०२ मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर २००६ साली त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या मैदानात उजव्या बाजूस यज्ञकुंड,
संगमरवरी नक्षीदार तुलसी वृंदावन व डाव्या बाजूला वज्रपिठावर स्थानिक देवतेची शेंदूर लावलेली पाषाण मूर्तीं आहे. या मंदिराभोवती भक्कम आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभांत दीपकोष्टके व कमळ फुलांची नक्षी आहे. हे दोन्ही स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्याच्या छतावर चार घोड्यांचा रथ आहे. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस सुरक्षा कठडा आहे. त्यावरील छताखाली पांढऱ्या घोड्यांची शिल्पे आहेत. या प्रवेशद्वाराच्या आतून आवारभिंतीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
प्रांगणात उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी संरचना आहे. मुखमंडपाच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस चौकोनी पायावर गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभास पायावर व शिर्षभागी कमळ आहेत. मधल्या भागात उभ्या धारेची नक्षी आहे. हे दोन्ही स्तंभ नक्षीदार महिरपी कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर पर्णलता व पुष्पलता नक्षी आहे.
येथून पुढे सभामंडप व त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ व त्यावर कमान आहे. कमानीवर मध्यभागी मंगल कलश आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. स्तंभांच्या दोन्ही बाजूस गदाधारी द्वारपाल व त्यांच्यावरील बाजूस दीपकोष्टके आहेत. दोन्ही द्वारपालांच्या बाजूला असलेल्या देवकोष्टकांत स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. उजव्या बाजूस देवकोष्टकाजवळ शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर नक्षीकाम आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा खेळती राहण्यासाठी गवाक्ष आणि उजव्या व डाव्या बाजूला गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी द्वार आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर पाच पांडवांच्या प्रतीक असलेल्या पाच पाषाणमूर्ती आहेत. त्यात चांगदेव महाराजांची उंच पाषाणमूर्ती आहे. मूर्तीस असलेली बिंदी, नाक, भुवया, ओठ व गळ्यातील आभुषणे चांदीची आहेत. या वज्रपिठाजवळ शिवपिंडी आहे.
मुखमंडपाच्या छतावर लहुजी साधू यांची मूर्तीं आहे. मंदिरांच्या छतावर असलेल्या कठड्यावर उजव्या बाजूस श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान आणि डाव्या बाजूस श्रीदत्तात्रेय यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. त्यातील पहिल्या चार थरात प्रत्येकी बारा देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. पाचव्या थरात आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मुख्य शिखराच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन थरांची लघू शिखरे आहेत. या शिखरांवर एकूण १५१ कळस आहेत.
मंदिरात श्रावण शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा असा तीन दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. त्रयोदशीच्या दिवशी येथे पाच पांडवांच्या नावाने पाच काठ्या बसवल्या जातात. श्रावण शुद्ध चतुर्थी या चांगदेवांच्या अवतारदिनी त्या काठ्यांची गावात वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते व नंतर गावाबाहेरील मंदिराजवळ त्या काठ्यांची स्थापना केली जाते. यावेळी संपूर्ण खानदेशातील हजारो हिंदू-मुस्लिम भाविक, देवऋषी व भगत देवाच्या दर्शनाला येतात. देवाचे वारे खेळवणे, देवाच्या कथा सांगणाऱ्या ओव्या गावून रात्र जागवणे, भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे यावेळी आयोजन केले जाते.