
कोकणातील निसर्गसमृद्ध परिसरात दापोली तालुक्यातील दाभोळ येथे पार्वतीचे रौद्र रूप असलेल्या दुर्गेचे म्हणजेच श्री चंडिका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. दालभ्य ऋषींच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या गावातील टेकडीवर, एकसंध दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेले हे पांडवकालीन जागृत मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, अशी देवीची ख्याती आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटमधील नोंदीनुसार, देवीचे हे स्थान इ.स. ५५०–५७८ मधील बदामी गुहांच्या समकालीन आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की जमनापुरी नावाच्या गोरखपंथीय उपासकाला देवीने दृष्टांत दिला की जंगलात एक पाण्याचा झरा आहे. या झऱ्याच्या वरच्या भागात असलेल्या गुहेत मी आहे. देवीने त्याला तेथे जाण्याच्या काही खाणाखुणाही सांगितल्या. त्याप्रमाणे गुहेजवळ आलेल्या जमनापुरी यांनी एक शिळा हटवल्यावर देवीची पाषाणातील मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी देवीची स्थापना करत पूजा करण्यास सुरुवात केली. काही काळाने त्यांचे वंशज बाळ पुरी येथे आले. त्यांच्यावर पूजाअर्चेची जबाबदारी सोपवून जमनापुरी यांनी मंदिरासमोर जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून देवीच्या पूजेचे हक्क पुरी घराण्याकडे आहेत. मंदिर असलेली ही गुहा पांडवकालीन आहे. दुसऱ्या अख्यायिकेनुसार, पांडवांनी आपल्याकडील दैवी शक्तीने गुहेची निर्मिती केली होती. दालभ्य ऋषींनीही या गुहेत तपसाधना केली होती.
दापोली–दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडे डाव्या बाजूच्या पठारावर हे मंदिर आहे. येथील किल्ल्याच्या जुन्या अवशेषांच्या परिसरात, एकसंध काळ्या कातळाच्या भुयारवजा गुहेत असलेल्या मंदिराची वास्तू कोकणातील एका टुमदार घराप्रमाणे भासते. बाहेरील रचनेवरून या मंदिराच्या आत गुहा असेल याची किंचितही कल्पना येत नाही. मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या कातळात एक नैसर्गिक झरा असून तेथील पाणी मंदिराच्या पूजाविधीसाठी वापरले जाते. मंदिराचा सभामंडप फारसा मोठा नाही. मातीची विशेष ठेवण करून हा सभामंडप बांधलेला आहे.
त्यात भाविकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. देवीची मूर्ती असलेल्या गुहेचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिबावर गणेशाची मूर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूस देवीच्या मूर्तीची प्रतिकृती आहे.
गर्भगृहात म्हणजेच गुहेमध्ये प्रवेश करताना एका लहानशा दरवाजातून वाकून जावे लागते. पूर्वी या गुहेत जाण्यासाठी घसरणीची वाट होती. आता येथे पायऱ्या करण्यात आल्या आहेत. गुहेत ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे जास्त भाविकांना एकाचवेळी आत सोडले जात नाही. या गुहेत केवळ पणत्या व नंदादीप तेवत असतात. त्यांच्या मंद प्रकाशातून, एका वेळी दोन माणसे जाऊ शकतील अशा चिंचोळ्या मार्गातून, भिंतींचा आधार घेत, आत जावे लागते.
गर्भगृहात नंदादीप व समयांच्या प्रकाशात शेंदूरचर्चित चंडिका देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. सुशोभित आरास असलेल्या मंडपात देवी विराजमान असून तिचे मुख हे नैऋत्य दिशेला आहे. मोठ्या भुवया, चेहऱ्यावर सौम्य हास्य आणि काहीसे रौद्र रूप आहे. चतुर्भुज मूर्तीच्या उजव्या हातात तलवार, डाव्या हातात ढाल व अन्य हातांमध्ये आयुधे आहेत. सुमारे साडेतीन फूट उंच असलेली ही मूर्ती केवळ कंबरेपर्यंत असून देवीचे अर्धे शरीर जमिनीखाली आहे, असे सांगितले जाते. या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे. गुहेतील मंद प्रकाशात देवीला प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा गुहेबाहेर येता येते.
देवीला रोज नऊवारी साडी नेसवली जाते. मंदिरात आश्विन प्रतिपदा ते विजयादशमीपर्यंत नवरात्रोत्सव होतो. या उत्सवादरम्यान मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार–पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढवले जाते. शिमगोत्सवात देवीची पालखी निघते. मंदिरात त्रिपुरी पौर्णिमाही साजरी केली जाते. मंगळवार हा चंडिका देवीचा वार असल्याने या दिवशी हजारो भाविक दर्शनाला येतात. देवी शुद्ध शाकाहारी असल्याने येथे बळी देण्याची पद्धत नाही.
१६६०–६१ मध्ये दाभोळ जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली होती. तेव्हा मोहिमेदरम्यान अनेक वेळा त्यांनी या स्थानास भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात आहे. शिवरायांनी मंदिराला दिलेल्या वतनाबाबतचे ताम्रपटही पुरी कुटुंबीयांकडे आहे. प्राचीन काळी ऐतिहासिक दाभोळ बंदरातून मोठा व्यापार चालत असे. व्यापारासाठी गुहेतील चंडिका मंदिरापासून दाभोळ खाडीपर्यंत भुयारी मार्ग असावा, असा काहींचा कयास आहे.
मंदिरापासून काही पायऱ्या वर चढल्यावर समोरच एका चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आणि त्याजवळ जमनापुरी यांची जिवंत समाधी आहे. पुरी हे दशनाम गोसावी समाजातील होते. या समाजातील व्यक्ती मृत पावल्यावर त्यांच्या नावे शिवलिंग तयार केले जाते. येथे जमनापुरी यांच्या समाधीजवळच काही शिवलिंगे आहेत. सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत देवीचे दर्शन घेता येते. याच गावात असलेल्या इंगळाई व भैरीदेवी या चंडिकेच्या बहिणी असल्याची मान्यता आहे.