चक्रेश्वर महादेव मंदिर

सोपारा, ता. वसई, जि. पालघर

अपरान्त म्हणजेच कोकणाची इ.स.पू. १५०० ते इ.स. १३०० या काळातील राजधानी असलेले, सुमारे अडीच हजार वर्षे एक व्यापारी केंद्र असलेले शूर्पारक म्हणजे हल्लीचे सोपारा. या ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या गावातील चक्रेश्वर महादेव मंदिर व त्यासमोरील चक्रतीर्थ (तलाव) ही अनेकांची श्रद्धास्थाने आहेत. निर्मळ महात्म्यातील वर्णनानुसार हे मंदिर व तीर्थ परशुरामांनी स्थापित केले आहे. पाळपंजर नामक दैत्यास मारल्यानंतर भगवान विष्णूंनी आपले चक्र या तीर्थात धुतले म्हणून या देवस्थानास चक्रेश्वर व तलावास चक्रतीर्थ असे नाव पडले. या प्राचीन मंदिराचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे येथे एक हजार वर्षांपूर्वीची सुमारे सहा फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ अशी ब्रह्ममूर्ती आहे.

ठाणे गॅझेटियर (खंड १४, १८८२) मध्ये या स्थानाबाबत अशी आख्यायिका देण्यात आली आहे की प्राचीन काळी या परिसरावर एक बुरूड राजा राज्य करीत होता. त्याला धर्मराजा असेही म्हणत. तो अत्यंत दयाळू होता. प्रजेकडून करसुद्धा घेत नसे. स्वतः बनवलेल्या बांबूच्या टोपल्या विकून त्यातून आलेल्या पैशांतून तो आपला खर्च भागवत असे. त्याच्या राणीची राहणीही साधी होती. ती दागिने घालत नसे. घरकाम स्वतः करीत असे. राजाच्या किल्ल्यापासून साधारणतः ४५० मीटर अंतरावरील चक्रेश्वर तलावातून ती स्वतःच पाणी भरीत असे. या तीर्थावर राज्यातील इतर स्त्रिया काठावरच पाणी भरीत असत, परंतु राणी सरळ पाण्यावरून चालत तलावाच्या मध्यभागी असलेल्या कुंडातील पवित्र पाणी आणत असे व त्या पाण्याने चक्रेश्वर महादेवाला अभिषेक घालत असे. चक्रेश्वरावर असेलेल्या श्रद्धेमुळे तिला ही सिद्धी प्राप्त झाली होती.

काही मत्सरी स्त्रिया या राणीला सतत पाण्यात पाहात असत. एकदा या स्त्रियांनी राणीची फजिती करण्याचे ठरवले. एका सणाच्या दिवशी गावातील स्त्रियांनी राणीला विचारले की ‘आज सण असूनही आपण एकही अलंकार कसा घातला नाही?’ दुसरी स्त्री म्हणाली की ‘अलंकार हे तर स्त्रियांचे भूषण आहे. महाराजांनी तुम्हाला दागिने कसे केले नाहीत?’ यावर सर्व स्त्रिया हसू लागल्या. त्याचे राणीला वाईट वाटले. तिने राजाकडे अलंकारासाठी हट्ट केला. दुसऱ्या दिवशी राजा राज्यातील प्रत्येक घरी जाऊन मला कर द्या, असे बोलू लागला. आजपर्यंत राजाने कधीही कर मागितला नव्हता. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले. लोकांनी किती कर हवा आहे असे विचारले असता मला एक सुपारी द्या, असे राजाने सांगितले. लोक अचंबीत होत होते. मात्र राजाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने एकेक सुपारी राजाला दिली. त्या सुपाऱ्या विकून राजाने राणीसाठी दागिने खरेदी केले. ते सर्व दागिने लेवून राणी चक्रतीर्थावर गेली. नेहमीप्रमाणे राणी तलावाच्या मध्यावर असलेल्या कुंडातील पाणी आणण्यासाठी पाण्यावरून चालू लागली. मात्र ती त्या दिवशी पाण्यात पडली. आपण का पडलो हे तिच्या लक्षात आले होते. तिने चक्रेश्वराकडे माफी मागितली व घरी येऊन राजाला सर्व दागिने परत दिले.

नालासोपारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उमराळे भागात चक्रतीर्थ तलाव आणि त्या शेजारी चक्रेश्वर महादेवाचे स्थान आहे. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर दीपमाळ आहे. मंदिर साध्या बांधणीचे आहे. मोठा सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या समोरील बाजूस एका उंच चौथऱ्यावर नंदीची प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांमध्ये डाव्या बाजूला गणेश व उजव्या बाजूला चक्रधारी श्रीविष्णू यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी शिवपिंडी आहे. सभामंडपाच्या उजव्या बाजूला एका लहानशा मंदिरात मारुतीचे स्थान आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या मारुतीला चक्क मिशा आहेत. तसेच या मूर्तीच्या पायाखाली, गुजरातमधील हनुमान मूर्तीच्या पायदळी दाखवतात तशी सिंहिका राक्षसी म्हणून एक छोटी देवीमूर्ती आडवी ठेवण्यात आलेली आहे.

हे मंदिर साध्या बांधणीचे असले तरी मंदिराच्या आवारातील मूर्तींमुळे त्यास ऐतिहासिकदृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही येथील ब्रह्मदेवाची मूर्ती ही भाविकांप्रमाणेच अभ्यासकांच्याही औत्सुक्याचा विषय आहे. मंदिराच्या आवारात उघड्यावर असलेली ही मूर्ती सहा फूट चार इंच बाय २ फूट एवढ्या आकाराची आहे. ही मूर्ती अकराव्या वा बाराव्या शतकातील असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. ही मूर्ती १८५० च्या सुमारास सोनारभट येथील एका शेतामध्ये सापडली होती, असे ठाणे गॅझेटियरमध्ये म्हटले आहे. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही मूर्ती दत्ताची म्हणून तिची पूजा केली जात असे. स्थानिक या मूर्तीला ‘चाबूकस्वार गावचा रक्षणकर्ता’ म्हणूनही ओळखत असत. आताही काही जण ही विश्वकर्म्याची मूर्ती असल्याचे समजतात. मात्र ती मुळात ब्रह्मदेवाची मूर्ती आहे.

सात फूट तीन इंच उंचीच्या शिळेवर ही पूर्णाकृती मूर्ती एका बाजूने कोरलेली आहे. मूर्ती त्रिमुखी आणि चतुर्भुज आहे. तिन्ही मुखांवर सुबक नक्षीकाम केलेले उंच मुकुट आहेत. मूर्तीच्या केवळ मधल्या मुखास टोकदार दाढी आहे. वरच्या हातात स्त्रूक (लांब दांड्याची पळी), डावीकडील वरच्या हातात वेदपोथी, खालच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात तेलाचा गडू कोरलेला आहे. या मूर्तीच्या पायाशी सुमारे ८ इंच उंचीच्या स्त्रीप्रतिमा आहेत. त्यातील एका स्त्रीच्या हातात स्त्रूक, तुपाचे पात्र आहे व दुसऱीच्या हातात शस्त्र आहे. ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या पायाशी उजवीकडे हंसाची प्रतिमा कोरलेली आहे. मूर्तीच्या गळ्यात साधी पट्ट्याची माळ व तिच्या मधोमध आणि दोन्ही बाजूंना उंचवटे आहेत. डाव्या खांद्यावर मृगचर्म आणि खांद्याच्या किंचित खालच्या बाजूस हरणाचे डोके दिसते. त्याचबरोबर गळ्यातील जानवे जांघेपर्यंत लांब आहे. कमरेचे वस्त्र बक्कल असलेल्या पट्ट्याने बांधलेले आहे. हे वस्त्र उजव्या जांघेवर एका गाठीने बांधले आहे. मूर्तीचे पादपीठ व प्रभावळ हे भाग पूर्णपणे कोरलेले नाहीत.

स्कॉटिश पुरातत्त्व शास्त्रज्ञ व ‘आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे अधीक्षक हेन्री कुझेन्स यांचा ‘मेडिएव्हल टेम्पल्स ऑफ द डेक्कन’ हा ग्रंथ १९३१ साली भारत सरकारच्या मध्यवर्ती प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाला. या ग्रंथात पान क्र. २० वर या ब्रह्ममूर्तीचे वर्णन व छायाचित्र आहे. मात्र तेथे ही मूर्ती ‘रामकुंडानजीकच्या मंदिरात’ असल्याचे आणि ती अपूर्ण स्वरूपात असल्याचे म्हटले आहे.

अत्यंत प्राचीन असा ऐतिहासिक ठेवा असलेल्या या ब्रह्ममूर्तीप्रमाणेच या मंदिर परिसरात काही प्राचीन मूर्तीही पाहावयास मिळतात. त्यात एक नंदीची मूर्ती आहे. ही मूर्ती शिरोहीन आहे. मात्र तिच्या गळ्यातील माळांवरील नक्षी आजही उठून दिसते. ही मूर्तीही ब्रह्ममूर्ती सापडली त्या स्थानाजवळच गाडलेल्या अवस्थेत होती. ती दहाव्या शतकातील असावी असा अंदाज गॅझेटियरकर्त्याने वर्तविला आहे. या मूर्तीच्या बाजूला अनेक मूर्तींचे खंडावशेष पडलेले आहेत. यात एका उंच शिळेवर कोरलेली देवतामूर्ती आहे. तिच्या गळ्यातील अलंकार, कर्णकुंडले, वस्त्रे, तसेच माथ्यावरील विचित्र प्रकारचा मुकुट व केशरचना यांचे कोरीव काम अत्यंत आकर्षक आहे. या मूर्तीच्या बाजूलाच गजांतलक्ष्मीची आडव्या शिळेवर कोरलेली खंडित मूर्ती आहे. या सर्व मूर्तींचे विविध अवयव खंडित असले, तरी या भागाच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीने या मूर्ती अनमोल मानल्या जातात. चक्रेश्वर महादेव मंदिराच्या बाजूलाच एक खासगी मालकीचे राममंदिर आहे. येथे अशा काही प्राचीन मूर्ती पाहावयास मिळतात. या परिसरातील मूर्तींमध्ये जैनांच्या मूर्ती असल्याचेही गॅझेटियरमध्ये म्हटले आहे. त्यात आणखीही काही मूर्तींचे वर्णन केलेले आहे. त्या मूर्ती मात्र आता तेथे दिसत नाहीत.

उपयुक्त माहिती

  • नालासोपारा रेल्वेस्थानकापासून २.५ किमी, तर वसईपासून ९ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांतून नालासोपाऱ्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home