चैतन्य कानिफनाथ मंदिर

वर्तकनगर, ठाणे (प.)

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासात नाथ संप्रदायाचे स्थान अनन्यसाधारण आहे. परंपरेनुसार या पंथात नऊ नाथ आणि चौऱ्यांशी सिद्ध मानले आहेत. ‘नवनाथभक्तीसार’ ग्रंथानुसार कानिफनाथ हे या नवनाथांपैकी एक नाथ आहेत. महाराष्ट्रात मोठा भक्तपरिवार असलेल्या कान्होबा ऊर्फ कानिफनाथांचे मंदिर ठाण्यातील वर्तकनगर येथे आहे. चैतन्य कानिफनाथ या नावाने हे मंदिर ओळखले जाते. नाथ आणि चैतन्य या दोन्ही संप्रदायांची परंपरा आदिनाथांपासून सुरू होते. या परंपरेचे ऐक्य सांगणाऱ्या या मंदिरालगत शैव संप्रदायाचे धारेश्वर शिवमंदिर आहे.

संपूर्ण भारतभर पसरलेला नाथ संप्रदाय हा सिद्धपंथ, अवधूत मत, कानफाटा संप्रदाय, गुरूमार्ग आदी विविध नावांनी उल्लेख केला जातो. धार्मिक इतिहासानुसार आंध्र प्रदेशातील श्रीशैल-कदलीवन (कर्दळीवन) ही नाथ संप्रदायाची उदयभूमी आहे, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही या संप्रदायाची प्रथम लीलास्थली आहे. या संप्रदायाचे पहिले ऐतिहासिक पुरुष मत्स्येंद्रनाथ हे होत. त्यांच्या मूलस्थानाविषयी विविध मते असून त्यांचा काळ दहाव्या शतकाचा उत्तरार्ध असल्याचे मत थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांनी मांडले आहे. मत्स्येंद्रनाथ यांच्या नावावर ‘कौलज्ञाननिर्णय’, ‘श्रीकामाख्यागुह्यसिद्धी’, ‘अकुलागमतंत्र’, ‘कुलार्णवतंत्र’, ‘कौलोपनिषद्’, ‘कौलावलिनिर्णय’ आदी प्रसिद्ध ग्रंथ आहेत. या संप्रदायाची माहिती देणारा ‘नवनाथ भक्तिसार’ हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ग्रंथ आहे.

या ग्रंथाची रचना धुंडीसुत मालू नरहरी याने केली आहे. ग्रंथातील उल्लेखानुसार, पेशवाईची अखेर होऊन शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकल्यानंतर एक वर्षाने, सन १८१९ मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. यात ४० अध्याय व सात हजार ६०० ओव्या आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटीनाथ, गहिनीनाथ, गोपीचंदनाथ, अडबंगनाथ, भर्तरीनाथ या नवनाथांचे महिमान या ग्रंथात वर्णिले आहे. या ग्रंथात नवनाथांना नव-नारायणांचे अवतार मानले आहे. त्यानुसार कानिफनाथ हे प्रबुद्धनारायणाचे अवतार मानले जातात. पौराणिक आख्यायिकेनुसार, कानिफनाथांचा जन्म हिमालयात एका हत्तिणीच्या कानात ब्रह्मदेवाने ठेवलेल्या बीजातून झाला. त्यामुळे त्यांना कानिफनाथ असे नाव पडले. धुंडीसुत मालूने कानिफाचा ‘कर्णोदय’ झाला असे आपल्या ग्रंथात म्हटले आहे. अलीकडच्या काळात, त्यांनी कानावर मोठे कुंडल धारण केल्याने त्यांचे कानिफनाथ हे नाव प्रचलित झाले, अशी नामस्पष्टीकरणकथा सांगण्यात येते.

अंतरिक्षनारायणाचे अवतार मानले गेलेले जालंधरनाथ हे कानिफनाथांचे गुरु होते. या दोघा गुरुशिष्यांनी बद्रिकेश्वरी तप केले. तेथे दोघांनी मिळून ४० कोटी २० लाख कविता केल्या, अशी आख्यायिका आहे. नाथसंप्रदायाचे प्रवर्तक व मत्स्येंद्रनाथांचे शिष्य असलेल्या गोरक्षनाथांचा काळ हा इ.स. १०५० ते ११५० असल्याचे रा. चिं. ढेरे यांच्यासारखे अभ्यासक सांगतात. कानिफनाथांचा काळ त्यांच्या नंतर दोन शतकांचा आहे. (नाथपरंपरेनुसार हा काळ बारावे शतक व जन्मतिथी वैशाख शुद्ध त्रयोदशी सांगण्यात येतो.) कानिफनाथांनी देशभर फिरून नाथपंथाचा प्रसार केला. हे कार्य करीत ते हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य पंचमी (रंगपंचमी) या दिवशी समाधी घेतली. नामवंत मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ डॉ. जे. जे. रायबर्मन यांच्या ‘हिंदू-मुस्लिम सिंक्रेटिक श्राईन्स अँड कम्युनिटीज’ या ग्रंथात कानिफनाथांचा समाधीकाळ इ.स. १३६० असल्याचे म्हटले आहे. फाल्गुन वद्य पंचमी (रंगपंचमी) या दिवशी त्यांनी मढी येथे समाधी घेतली. दरवर्षी या दिवशी येथे कानिफनाथांची भव्य यात्रा भरते.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कानिफनाथ ऊर्फ कान्होबांची मंदिरे आहेत. वर्तकनगरमधील मंदिर हे त्यांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिरासमोर पत्र्याची मोठी शेड आहे. त्यात डावीकडे ध्वजस्तंभ आणि मोठे त्रिशूळ आहे. मंदिर आधुनिक स्थापत्यशैलीतील आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भागार अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप चकचकीत फरसबंदीचा व समतल छत असलेला आहे. त्यात प्रवेशद्वारासमोरच कूर्मशिल्प आहे. तेथून काही पावलांवर प्रवेशद्वाराभिमुख गजमूर्ती आहे. कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला असल्याच्या कथेची स्मृती या मूर्तीतून जपलेली आहे. समोरच चौकोनाकार गर्भगृह आहे. त्याभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. गर्भगृहास महिरपी प्रवेशकमान आहे. येथे दर्शनी भिंतीलगत डावीकडे वणीच्या सप्तशृंगीमातेची पाषाणात घडवलेली मूर्ती आहे, तर उजवीकडे काळ्या पाषाणात घडवलेली मारुतीची मूर्ती विराजमान आहे. गर्भागाराच्या प्रवेशद्वारासमोर संगमरवरी चौथऱ्यावर कानिफनाथांच्या पादुका आहेत. आत मध्यभागी चंदेरी व सोनेरी पत्र्याने मढवलेल्या व महिरपी प्रभावळ असलेल्या आसनावर कानिफनाथांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मूर्तीस कषायवस्त्रे, रुद्राक्षमाला व अलंकारांनी शृंगारलेले आहे. त्यांच्या मस्तकी भरजरी फेटा आहे. प्रभावळीवर कोरलेल्या नागराजाने त्यांच्या मस्तकी छत्र धरलेले आहे. या मूर्तीच्या डावीकडे सुशोभित अधिष्ठानावर त्रिमुखी दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे, तर उजवीकडे गणेशमूर्ती विराजमान आहे.

कानिफनाथ मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर डावीकडे असलेल्या दरवाजातून धारेश्वर स्वयंभू शिवमंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या मंदिराची स्थापना १९९५ मध्ये करण्यात आली होती. यानंतर २४ एप्रिल २०१२ रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे मंदिरही आधुनिक बांधकामशैलीतील आहे. त्याच्या गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात जमिनीवर संगमरवराची चौकोनाकार शाळुंका आहे. त्यात पाषाणात घडवलेली पारंपरिक पद्धतीची शिवपिंड आहे. पिंडीतील लिंगावर सर्पाकार कोरलेले आहेत. पिंडीच्या वरती पितळेची गलंतिका आहे. गर्भागारात मागच्या बाजूस संगमरवरी चौथऱ्यावर पार्वती मातेची मूर्ती व पितळेची नागमूर्ती आहे. सण-उत्सवाच्या काळात ही नागमूर्ती पिंडीवर ठेवली जाते. या मंदिराच्या बाजूलाच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांकरिताचा मोठा मंडप आहे.

या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे हिंदू धर्म आणि नाथपरंपरेनुसार विविध सण व उत्सव साजरे केले जातात. वैशाख शुद्ध त्रयोदशीस कानिफनाथांचा जयंती सोहळा आणि फाल्गुन वद्य पंचमीस पुण्यतिथी सोहळा हे या मंदिरातील मोठे उत्सव होत. या दिवशी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. फाल्गुन वद्य पंचमीला मढी येथे कानिफनाथांची भव्य यात्रा भरते. या परिसरातील अनेक भाविक दरवर्षी येथून या यात्रेस जातात.

उपयुक्त माहिती

  • ठाणे रेल्वे स्थानक व एसटी  बस स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून ठाणेसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

चैतन्य कनीफनाथ मंदिर

वर्तक नगर, ठाणे (पश्चिम)

Back To Home