आजूबाजूच्या पर्वतराजीच्या कोंदणात, गर्द झाडी–झुडपांत, मांड नदीकाठी वसलेले चाफळ हे गाव समर्थ रामदास स्वामी यांना भावले होते. याच गावात समर्थांनी आपल्या ७३ वर्षांच्या आयुष्यातील ३५ ते ३७ वर्षे वास्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेनुसार शेवटची सहा ते सात वर्षे त्यांनी सज्जनगडावर काढली असली तरी दरवर्षी ते तेथूनही रामजन्मोत्सवाला चाफळ येथे येत असत. त्यांच्या वास्तव्यामुळे व त्यांनी उभारलेल्या येथील राम मंदिरामुळे चाफळ हे गाव प्रसिद्ध आहे. या मंदिराशिवाय समर्थस्थापित ११ मारुतींपैकी तीन मारुती मंदिरे चाफळमध्ये आहेत.
ऐतिहासिक व ग्रंथांमधील नोंदींनुसार, पूर्वी चाफळ ही नाणेघोळ या गावाची एक वाडी होती. तेव्हा या भागाला चाफळवाडी असे संबोधले जात असे. समर्थ रामदास स्वामी येथे आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांकडे मंदिर बांधण्यासाठी जागेची मागणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी मांड नदीकाठावरील स्मशानाची जागा त्यांना दिली. समर्थांनी त्या जागेचा आनंदाने स्वीकार करून तेथे मंदिर बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. गावकरी, शिष्य व भाविक यांच्या श्रमदानाने १६४७ साली येथे लहानसे मंदिर बांधून पूर्ण झाले; परंतु समर्थ येथील मूर्तीबाबत काहीच बोलत नसल्याने त्यांच्या शिष्यांसह गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर समर्थ देवाची आळवणी करीत असत. एकदा त्यांना मारुतीने स्वप्नात दर्शन दिले व सांगितले की अंगापूरच्या डोहात श्रीरामांची मूर्ती आहे. तीच तुमच्या मंदिरात स्थापन होईल. या स्वप्नदृष्टांतानुसार समर्थांना अंगापूर येथील डोहात दोन मूर्ती मिळाल्या. त्यातील एक मूर्ती अंग्लाई देवीची (ही देवी सज्जनगडावरील अंग्लाई मंदिरात आहे) होती, तर दुसरी सूर्यनारायणाची. मारुतीने सांगितल्यानुसार सूर्यपूजक घराण्यातील समर्थ त्या मूर्तीकडे श्रीरामांची मूर्ती म्हणूनच पाहत होते. या मूर्ती घेऊन समर्थ चाफळकडे निघाले असता अंगापूरच्या ग्रामस्थांनी त्यांना वेशीवर गाठले व आमच्या डोहातील मूर्ती आमच्याच गावात राहणार, असे सांगितले. ज्या जागी समर्थांना गावकऱ्यांनी रोखले ती जागा ‘सुखठाण’ म्हणून आज प्रसिद्ध आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे समर्थांनी त्या मूर्ती तेथेच ठेवल्या व ते चाफळला आले.
समर्थांनी ठेवलेल्या मूर्ती गावात नेऊन त्यांची स्थापना करायची, या उद्देशाने अंगापूरच्या ग्रामस्थांनी मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला असता त्या जागच्या हलेनात. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही तोच प्रकार. त्यामुळे या ग्रामस्थांनी चाफळला जाऊन समर्थांनीच या मूर्तींचा स्वीकार करावा, अशी विनंती केली. त्यानुसार समर्थांनी या मूर्ती शिष्यांकरवी चाफळ येथे आणल्या.
१६४८ मध्ये श्रीरामांच्या मूर्तीची चाफळ येथील राममंदिरात स्थापना होणार हे कर्णोपकर्णी सर्वत्र पसरले व श्रीरामांच्या दर्शनासाठी हजारो लोक चाफळला जमा झाले. सगळीकडे प्रचंड उत्साह होता. या निमित्ताने खानोली येथील निनाई देवी, कारवे येथील घानाई देवी, दुसाळे येथील जानाई देवी, चाफळची नांदलाई, दाढोलीची खंडूआई व सोमजाई या देवतांनाही निमंत्रणे धाडली गेली. ज्या अंगापूरच्या डोहातून ही मूर्ती मिळाली त्या अंगापूर ग्रामस्थांना जन्मोत्सवाच्या निशाणाची काठी धरण्याचा मान दिला गेला. ही प्रथा अजूनही कायम आहे. या सर्वांच्या उपस्थितीत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याचवर्षी मंदिरात पहिला रामजन्मोत्सव साजरा झाला. त्यावेळी चाफळची भूमी राममय झाली होती.
राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमीला या मंदिराला ३३ गावे, ४१९ बिघे जमीन, एक कुरण व १२१ खंडीचा गल्ला इनाम म्हणून दिले होते. छत्रपतींनी त्यांच्या कारकिर्दीत एखाद्या मंदिराला दिलेली ही सर्वात मोठी मदत होय. शिवाजी महाराजांनी येथील छोटेखानी राम मंदिराच्या जागी भव्य मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली असता समर्थांनी ती वेळ अजून आली नाही, योग्य वेळ आल्यावर भविष्यात श्रीरामांच्या इच्छेनुसार नवीन मंदिर उभारले जाईल, अशी ग्वाही महाराजांना दिली होती.
ती वेळ आली ११ डिसेंबर १९६७ रोजी. या दिवशी कोयना परिसरात झालेल्या भूकंपात हे मंदिर भंग झाले होते. त्यामुळे मंदिराची पुनर्बांधणी आवश्यक होती. त्यावेळी भूकंपाची पाहणी करण्यासाठी चाफळ येथे आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. पद्मनाभन यांच्यासोबत प्रसिद्ध उद्योगपती अरविंदशेठ मफतलाल होते. त्यांनी मंदिराची अवस्था पाहून जीर्णोद्धाराचा भार उचलण्याचे ठरविले. त्यानुसार १० मे १९६८ रोजी जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले. सुमारे २१ लाख रुपये खर्चून या जागेवर भव्य मंदिर उभे राहिले. १ मे १९७१ रोजी कऱ्हाडच्या ईश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते ध्वज आणि सुवर्णकलशाची स्थापना झाली.
हे मंदिर उंच जोत्यावर असून मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरांच्या भिंतींवर व खांबांवर ठिकठिकाणी कोरीव काम आहे. गर्भगृहात समर्थ रामदासांनी स्थापन केलेली मूळ मूर्ती ही पुढील भागात आणि त्यामागे शुभ्र संगमरवरातील सुमारे तीन फूट उंचीच्या श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. समर्थांना अंगापूरच्या डोहात सापडलेली व सध्या गर्भगृहात असलेल्या मूळ मूर्तीच्या दोन हातांत कमळे आहेत. ही मूर्ती उभी असून मूर्तीच्या समोरील बाजूस घोड्यांची सात तोंडे आहेत. बाजूस एक पुरुष व एक स्त्री गण आहेत. सकाळी ४.३० ते दुपारी १२.३० व दुपारी १.३० ते रात्री ९ पर्यंत श्रीराम मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.
मांड नदीच्या काठावर असलेल्या या श्रीराम मंदिराचा परिसर मोठा आहे. समर्थस्थापित अकरा मारुतींपैकी तीन मारुती हे चाफळ परिसरातच आहेत. त्यांपैकी दास मारुतीची स्थापना श्रीराम मंदिरासमोरच आहे. या मारुतीची स्थापना १६४९ मध्ये समर्थांनी केली होती. येथील मारुतीची मूर्ती सहा फूट उंचीची असून त्याची दृष्टी श्रीरामांच्या चरणावर विसावलेली दिसते. या मूर्तीच्या पायात जाड तोडे, हातात कंकणे आणि दंडांवर बाजुबंद असून गळ्यात माळ आहे. या मारुतीची शेपटी मागून डोक्यावरून खाली येऊन डाव्या हाताच्या कोपराच्याही खाली आलेली दिसते. या मंदिराच्या मागच्या भिंतीमध्ये समर्थस्थापित गणेश मंदिर आहे. त्यामध्ये सुमारे तीन फूट उंचीची शेंदूरचर्चित गणेशमूर्ती आहे.
श्रीराम मंदिराच्या प्रांगणात मंदिराच्या मागच्या बाजूला एक ध्यानगुंफा आहे. असे सांगितले जाते की या गुंफेत समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची खलबते चालत. या गुंफेत उतरण्यासाठी पायरी मार्ग असून या मार्गाच्या सुरुवातीला जेमतेम दीड फूट चौरस आकाराचा व तीन ते चार फूट खोल असा खड्डा आहे. तेथून पुढे पायरी मार्गाने जमिनीखाली असलेल्या गुंफेत जाता येते.
येथून १०० मीटर अंतरावर दुसरे समर्थस्थापित मारुती मंदिर आहे. याला प्रताप मारुती वा वीर मारुती असे संबोधले जाते. येथील मारुतीची मूर्ती ही सात ते आठ फूट उंचीची आहे. ‘पुच्छ ते मुरडिले माथा…’ या उक्तीप्रमाणे ही मूर्ती असून नेटका व सडपातळ बांधा, सुवर्णकासोटी आणि त्याच्यावर घंटा आहेत. गळ्यातील माळ पोटापर्यंत आली असून डाव्या पायाखाली राक्षस आहे. मूर्तीच्या मनगटावर जाड कंकणे आणि बाजुबंद आहेत. १६४८ साली रामनवमीला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली असावी, असे सांगितले जाते.
चाफळच्या श्रीराम मंदिरापासून साधारणतः दीड किमी अंतरावर असलेल्या शिंगणवाडी येथे १६५० मध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. हा चाफळमधील तिसरा मारुती होय. याला बाल मारुती वा खडीचा मारुती असे म्हटले जाते. एका लहानशा टेकडीवर हे मंदिर असून समर्थांनी स्थापित केलेल्या ११ मंदिरांपैकी ते सर्वात लहान मंदिर आहे. केवळ दोन मीटर चौरस आकाराच्या या मंदिरातील मूर्ती उत्तराभिमुख असून वर केलेल्या डाव्या हातात त्रिशूल व उजवा हात उगारलेल्या स्थितीत आहे. शेपूट शरीरामागून, डोक्यावरून, डाव्या हाताच्या पंजाकडे आलेले आहे. असे सांगितले जाते की १६४९ साली शिंगणवाडी येथे समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती. याच वेळी समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला होता. ही भेट येथील एका चिंचेच्या झाडाखाली झाली होती. यावेळी शिवाजी महाराजांनी उधळलेले सोन्याचे होन या भागात आजही सापडतात, असे बोलले जाते.