अजिंठ्याच्या पर्वतरांगांमध्ये आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेले बुलडाणा जिल्ह्यातील मढ येथील बुधनेश्वर महादेव मंदिर आपल्या स्थानमहात्म्यामुळे प्रसिद्ध आहे. विदर्भाची जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीचे उगमस्थान आणि हेमांडपंती स्थापत्यशैलीचे शिवालय हे या परिसराचे आकर्षण आहे. पौराणिक कथेनुसार, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील जल सांडून निर्माण झालेले ‘कुंडिका तीर्थ’ आणि येथील पंचमुखी शिवलिंग पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे १६३९ च्या कालखंडातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराप्रती असलेल्या असंख्य भाविकांच्या श्रद्धेमुळे राज्य सरकारने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या मंदिराचा गौरव केला आहे. बुधनेश्वर मंदिराच्या महात्म्यामध्ये पैनगंगा नदीच्या उगमस्थानाचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. या मंदिराच्या अगदी बाजूला, एका लहान टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या नैसर्गिक झऱ्यातून पैनगंगा नदीचा उगम होतो.
ऐतिहासिक नोंदीनुसार येथे पूर्वी एक लहान तलाव होता. तो कालांतराने गाळाने भरला गेला असला तरी उगमस्थानावरील पाण्याचा प्रवाह आजही अखंड वाहताना दिसतो. या नदीची आख्यायिका अशी की एकदा भगवान ब्रह्मदेव सह्याद्री पर्वतावरून प्रवास करत असताना त्यांच्या हातातील कमंडलू निसटला आणि त्यातील जल या भागात सांडले. ज्या ठिकाणी हे जल सांडले तिथे एक कुंड तयार झाले. त्यास ‘कुंडिका तीर्थ’ असे नाव पडले आणि हेच आजचे पैनगंगेचे उगमस्थान समजले जाते. विदर्भाची महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाणारी पैनगंगा नदी ही वर्धा नदीची मुख्य उपनदी आहे. ६७६ किलोमीटर लांबीची ही नदी निसर्गरम्य डोंगररांगांतून आपला प्रवास सुरू करते. उगम पावल्यानंतर पैनगंगा नदी आग्नेय दिशेने प्रवास करते. तिचा मार्ग बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून जातो. पुढे ही नदी परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमांवरून वाहत जाते. प्रवासादरम्यान कयाधू, अरुणावती, अडाण, वाघाडी आणि पूस यांसारख्या अनेक उपनद्या तिला येऊन मिळतात.
त्यामुळे या नदीचे खोरे जलसिंचनाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध झाले आहे. विदर्भाच्या दक्षिण भागातील शेती आणि जनजीवन या नदीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. नदीचा शेवटचा टप्पा यवतमाळ जिल्ह्यात येतो. यवतमाळमधील वणी तालुक्यातील ‘जुगाद’ या ठिकाणाजवळ पैनगंगा नदी वर्धा नदीला जाऊन मिळते. या संगमानंतर हा संयुक्त जलप्रवाह पुढे दक्षिण दिशेला वाहत जातो. या नदीच्या उगमस्थानी असलेले बुधनेश्वर महादेवाचे मंदिर हे १६३९ मध्ये उभारण्यात आले असावे, असा अंदाज येथील शिलालेखांवरून वर्तवला जातो. हेमांडपंती स्थापत्यशैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धारादरम्यान मंदिराचा जुना सभामंडप काढण्यात आला, मात्र गर्भगृहाचे प्राचीन स्वरूप कायम ठेवण्यात आले. मंदिरासमोर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेले प्रांगण आहे. येथे मूळ प्राचीन मंदिराच्या दगडी स्तंभाचे काही अवशेष आजही पाहायला मिळतात. या प्रांगणात गणेशासह विविध देवदेवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
प्रांगणातून सहा पायऱ्या चढून जमिनीपासून उंचावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांगेची व्यवस्था आहे. या सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ अखंड पाषाणातील नंदीची भलीमोठी मूर्ती आहे.
येथील भिंतींवर अनेक पौराणिक प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस तांडवनृत्य करणाऱ्या शिवशंकराची प्राचीन मूर्ती आहे. या मूर्तीजवळच शिव-पार्वतीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपातून पाच पायऱ्या उतरून काहीशा खाली असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. दगडी बांधकाम असलेल्या या गर्भगृहात मध्यभागी मोठ्या शाळुंकेमध्ये बुधनेश्वर महादेवाचे पंचमुखी शिवलिंग आहे. त्यावर नागाने छत्र धरले आहे. त्यावरील भागात असलेल्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. या महादेवाच्या ‘बुधनेश्वर’ नावाबाबत असे सांगितले जाते की स्थानिक बोलीभाषेत ‘बुधणे’ म्हणजेच ‘पाण्यात गुप्त होणे’ असा अर्थ होतो. या मंदिरातील मूळ शिवलिंग उगमस्थानाच्या कुंडात बुडालेल्या अवस्थेत सापडले होते म्हणून याला बुधनेश्वर हे नाव पडले.
मंदिराच्या मागील बाजूस दगडात बांधलेले प्राचीन कुंड आहे. येथून काही पावलांवरच पैनगंगा नदीचे उगमस्थान आहे. येथील हनुमानाच्या छोट्या मंदिरात मारुतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीजवळ नदीच्या उगमस्थानाजवळ बांधलेल्या छोट्या कुंडावर जाळी बसवण्यात आली आहे. या कुंडाच्या बाजूला असलेल्या मोठ्या दगडी कुंडात पाणी जमा होते. तेथून पैनगंगा नदी पुढे वाहत जाते. या कुंडाजवळ तसेच हनुमान मंदिराजवळही काही प्राचीन मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.
महाशिवरात्री हा येथील सर्वात महत्त्वाचा सोहळा आहे आणि या दिवशी संपूर्ण विदर्भातून तसेच खानदेशातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. या दिवशी पैनगंगेच्या उगमस्थानी स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. श्रावणी सोमवारी येथे विशेष अभिषेक आणि कावड यात्रा आयोजित केल्या जातात. या मंदिरापासून काही अंतरावर महानुभावपंथीयांचे ‘जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.