ब्रह्मदेव मंदिर

ब्रम्हकरमाळी, ता. सत्तरी, जि. उत्तर गोवा

पुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला. ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची देवता असली, तरी इ.स. ५०० नंतर तिचे महत्त्व कमी होत गेले. देशात ब्रह्मदेवाची मोजकीच मंदिर आहेत. त्यातील एक प्रसिद्ध मंदिर उत्तर गोव्यातील ब्रह्मकरमाळी येथे आहे. या मंदिरामुळेच या गावाला हे नाव प्राप्त झाले आहे.

ब्रम्हकरमाळी येथे असलेली ब्रम्हदेवाची मूळ मूर्ती पूर्वी गोव्याच्या उत्तर भागातील तिसगाव येथे असलेल्या करमाळीत होती. तेथील मंदिराबाबतची अख्यायिका अशी की कदंब राजा जयकेशी (द्वितीय) करमाळीच्या जंगलात शिकारीसाठी गेले होते. सावजाचा पाठलाग करून दमल्यामुळे ते एका झाडाखाली विश्रांती घेत होते. अर्धनिद्रित अवस्थेत त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांना तीन तेजस्वी रुपे दिसली. मध्यभागी चारमुखे असलेले ब्रम्हदेव, डावीकडे विष्णू आणि उजवीकडे शिव. ब्रम्हदेव म्हणाले की मी तुझ्या राज्यात त्रिमूर्ती स्वरुपात वास करणार आहे. येथे असलेल्या एका काळ्या पाषाणात मी प्रकट होईन. तेथे माझे मंदिर बांध. जागे झाल्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना आजुबाजुला या पाषाणाचा शोध घेण्याचा आदेश दिला. त्यांना तसा पाषाण तेथे सापडला. त्यात त्रिमूर्तीची आकृती दिसत होती. शिल्पकारांना बोलावून त्या दगडातील अनावश्यक भाग काढून टाकून ब्रम्हदेवाची त्रिमूर्ती स्वरुपातील सुंदर मूर्ती घडवण्यात आली व तेथेच मंदिर बांधून त्या मूर्तीची स्थापन करण्यात आली.

असे सांगितले जाते की बाराव्या शतकात उभारले गेलेले ते मंदिर साध्या रचनेचे पण भव्य होते. (हे मंदिर पोर्तुगिजांनी पाडून टाकले होते. त्याचे काही अवशेष करमाळी येथे झालेल्या उत्खनात सापडले होते.) तिसवाडी भागात पोर्तुगिजांचा मंदिर पाडण्याचा सपाटा सुरू झाल्यामुळे पुजारी आणि भाविकांनी ब्रम्हदेवाच्या मूळ मूर्तीसह स्थलांतर करण्याचे ठरवले. एका बैलगाडीत ही मूर्ती आणि आवश्यक त्या वस्तू घेऊन ते तेथून निघाले. सत्तरी भागातील एका घनदाट अरण्यातून प्रवास करताना संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी एका ओढ्याच्या काठी मुक्काम करायचे ठरवले. बैलगाड्या सोडण्यात आल्या. सामान खाली उतरवण्यात आले. त्या रात्री पुजाऱ्याला स्वप्नदृष्टांत देत ‘हे ठिकाण आपल्याला आवडले आहे’ असे देवाने सांगितले. परंतु आपल्याला भास झाला असावा असे समजून सकाळी पुन्हा बैलगाड्या जोडण्यात आल्या आणि इतर वस्तु गाडीत ठेवण्यात आल्या. पण तेथे जमिनीवर ठेवलेली ब्रम्हदेवाची मूर्ती उचलली जाईना. तेव्हा पुजाऱ्यांनी स्वप्नदृष्टांताबद्दल सांगितले. हा संकेत मानून भक्तांनी त्याच ठिकाणी ब्रम्हदेवाची स्थापना करण्याचे ठरवले. तो परिसर नगरगावाचा भाग होता. मात्र तेथे करमाळीहून आलेल्या ब्रम्हदेवाची मूर्ती असल्याने या परिसराला ब्रम्हकरमाळी अशी ओळख मिळाली. हळहळू हेच नाव प्रचलित झाले. देवतांच्या स्थलांतराबरोबर ते मंदिर असलेल्या मूळ गावाच्या नावाचेही स्थलांतर होण्याचे हे दुर्मिळ उदाहरण मानले जाते.

सोळाव्या शतकाच्या अखेरीस स्थानिक गावकरी आणि ब्रम्हदेवाचे भक्त यांच्या सहकार्यांने ब्रम्हकरमाळीत मंदिर उभारण्यात आले. सुरुवातीच्या काळात हे मंदिर साधे होते. लाकडी छत आणि दगडी भिंती अशी त्याची रचना होती. एकोणिसाव्या शतकात स्थानिकांनी या मंदिराच्या रचनेत सुधारणा केली. गोवा मुक्तीनंतर १९७० ते १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मंदिराच्या भिंती मजबूत करून घेतल्या. सन २००० मध्ये झालेल्या नुतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. देशभरात ब्रह्मदेवाची अंदाजे दहा मंदिरे असल्याचे सांगितले जाते. त्यातील तीन मंदिरे विशेष महत्वाची मानतात. त्यात पुष्कर (राजस्थान), खेडब्रह्मा (गुजरात) आणि ब्रम्हकरमाळी (गोवा) यांचा समावेश होतो.

मंदिराचा परिसर सदाहरित जंगलाने वेढलेला आहे. परिसरात नैसर्गिक झरे आहेत. तेथेच कुंडासारखी रचनाही करण्यात आलेली आहे. रस्त्यावरून मंदिराच्या मुख्य प्रांगणात येण्यासाठी दहा-बारा पायऱ्या चढाव्या लागतात. प्रांगणात मंदिरासमोर तुळसी वृंदावन आणि दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या वास्तुशैलीवर गोमंतकीय छाप असली तरी त्यात द्राविड-नागर शैलीचे मिश्रणही दिसते. व्यासपिठासह सभागृह, बंदिस्त सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाहून अंतराळ काही इंच उंच आहे. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर दोन्ही बाजुला गदाधारी द्वारपाल मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे.

गर्भगृहात काळ्या बेसाल्ट पाषाणात घडवलेल्या मूर्तीचे दर्शन होते. वस्तुतः या मूर्तीला चार मुख आहेत. चौथे मुख हे प्रदक्षिणा मार्गावरून, मूर्तीच्या मागच्या बाजुने, एका लहानशा झरोख्यातून पाहता येते. पौराणिक आख्यायिकेनुसार ब्रह्मदेव हा पंचानन होता; परंतु शंकराबद्दल अभद्र उद्‌गार काढल्यामुळे शंकराने कालभैरवाकरवी त्याचे एक मस्तक तोडले. त्यामुळे ब्रह्मदेवाची मूर्ती चतुर्मुखी असते. चार दिशा, चार वेद आदींचे ते प्रतीकस्वरूप आहे. या प्राचीन मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण असे कोरीव काम आहे. मूर्तीच्या पायाजवळ दोन्ही बाजुला सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात यज्ञात आहुती देण्यासाठी वापरली जाणारी पळी आहे. कारण ब्रम्हदेव यज्ञदेवताही मानले जातात. ते वेदांचे निर्माते असल्याने त्यांच्या वरच्या डाव्या हातात वेद आहेत. खालच्या उजव्या हातात अक्षयमाळा किवा जपमाळ आहे आणि डाव्या हातात पाण्याने भरलेला कमंडलू आहे. यातील जपमाळेचा वापर ब्रम्हदेव प्रत्येक युगाच्या कालगणनेसाठी करतात, असे सांगितले जाते. ते जीवसृष्टीचे निर्मातेही आहेत. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या हातात पाण्याने भरलेला कमंडलू असतो.

मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव अर्थातच ब्रम्ह जयंतीचा असतो. वैशाख शुक्ल तृतीयेपासून तीन दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवात अभिषेक, त्रिमूर्ती पूजा, रथयात्रा, हवन, अन्नदान केले जाते. त्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. यावेळी निघणारी रथयात्रा संपूर्ण गावातून फिरते. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक आणि जागरण होते. श्रावण कृष्ण अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते. त्यावेळी झुलणीत (पाळण्यात) देवाची उत्सवमूर्ती ठेवली जाते. यावेळी रासलीलेचेही आयोजन केले जाते. कार्तिक पौर्णिमेला येथे जत्रा असते. या जत्रोत्सवात होणारा जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. दररोज सकाळी ६.३० ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात ब्रह्मदेवाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • सत्तरी येथून ६ किमी अंतरावर
  • गोव्यातील अनेक शहरांतून सत्तरीसाठी राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : सागर देसाई, अध्यक्ष, मो. ८४५९२१८५३३,
  • वामनराव देसाई, उपाध्यक्ष, मो. ९४२३१२२२८८

ब्रह्मदेव मंदिर

ब्रह्मकर्माली, सत्तारी, जिला उत्तरी गोवा

Back To Home