जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर मोठ्या मारुतीचे मंदिर आहे. येथील शिळास्वरूपातील मोठी मूर्ती निद्रिस्त (झोपलेल्या) अवस्थेत असून ती दुर्मिळ मानली जाते. उल्केच्या पाषाणातून ही मूर्ती घडवण्यात आल्याचे सांगण्यात येते. २.८३ मीटर लांब व १.३२ मीटर रुंद असलेली ही मूर्ती चुंबकीय गुणधर्म असलेली आहे. येथील जागृत मारुतीच्या दर्शनाने शनीची पीडा दूर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चैत्र महिन्यात येथे होणाऱ्या रामनवमी व हनुमान जयंतीच्या उत्सवाप्रसंगी भाविकांची मोठी मांदियाळी असते.
लोणार येथे आकाशातील उल्का पडून विवर निर्माण झाले, तेव्हा त्याचा एक तुकडा बाजूला पडला. गावाबाहेरचा अंबर तलावही त्यातूनच निर्माण झाला असावा. या तलावानजीक मूळ उल्केच्या पाषाणातून ही मूर्ती घडवण्यात आली असावी, असे सांगण्यात येते. सन १८०० च्या आसपास रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथून गोविंद भिकाजी कानिटकर नावाची व्यक्ती लोणार येथे आली. त्यावेळी त्यांना या मूर्तीचे दर्शन झाले आणि त्यानंतर ते येथेच स्थायिक झाले. सन १८६५ मध्ये निजामाचा दिवाण चंदुलाल याने या मंदिरासाठी कानिटकर कुटुंबाला जहागिरी दिली होती, असे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्ये नमूद आहे.
हे मंदिर कानिटकर कुटुंबाच्या वहिवाटीत आहे आणि या कुटुंबाची ११ वी पिढी येथे वास्तव्यास आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. दोनशे-सववादोनशे वर्षांपासून या मूर्तीवर शेंदराचे लेपन करण्यात येत होते. या मूर्तीवर शेंदराच्या लेपाचा सुमारे दोन फूट जाड थर होता. कानिटकर कुटुंबातील नवव्या पिढीतील रमेश श्रीपाद कानिटकर यांना पंधरा वर्षांपूर्वी मारुतीचे दृष्टांत होत असत. या दृष्टांतादरम्यान हनुमान आपल्या मूर्तीवरील शेंदराच्या लेपाचे ओझे कमी करण्यास सांगत असल्याचा अनुभव त्यांना येत असे. त्यानंतर रमेश कानिटकर यांनी अकोल्यातील दत्तगुरू कुलकर्णी यांना या दृष्टांताबाबत सांगितले. ‘अधिकारी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय हे कार्य हाती घेऊ नये,’ अशी सूचना कुलकर्णी यांनी केली. पुढे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी ३ नोव्हेंबर २०१२ रोजी लोणारला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कलाकर्षण विधी करण्याचे निश्चित झाले. ८ डिसेंबर २०१३ ते गुरुवार, १९ डिसेंबर २०१३ या कालावधीत शास्त्रोक्त पद्धतीने हा विधी पार पडला. त्यावेळी या मूर्तीवरील तब्बल २५ क्विंटल शेंदूर काढण्यात आला. त्यानंतर पाषाणातील मूळ मूर्तीचे दर्शन झाले. देशभरात निद्रिस्त मारुतीची मंदिरे दुर्मिळ आहेत, त्यापैकी हे प्रसिद्ध मंदिर आहे.
लोणार सरोवराच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. मंदिराजवळून दिसणारा लोणारचा निसर्गरम्य परिसर येथे येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. मंदिराच्या प्रवेश कमानीतून आत आल्यावर प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात अनेक झाडे आहेत. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या पायरी मार्गावर दोन्ही बाजूला चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर दीपकोष्ठके व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून पाच पायऱ्या उतरून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या भोवताली ओवऱ्यासदृश बांधकाम आहे. समोर मोकळ्या जागेत उंच चौथऱ्यावर महादेवाची पिंड आणि समोर नंदी आहे. नजीकच हनुमानाची छोटी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या देवकोष्ठकात संत तुकाराम महाराजांची मूर्ती व उजवीकडील देवकोष्ठकात तुळजाभवानीची मूर्ती आहे.
तिच्या शेजारी काळ्या पाषाणात घडवलेली परशुरामाची मूर्ती आहे.
मुख्य गर्भगृहात निद्रिस्त हनुमानाची मूर्ती आहे. एकसंध पाषाणात घडवलेल्या या मूर्तीच्या मस्तकावर मुकुट असून त्यावर मुकुटमणी आहे. मूर्तीच्या कानात कुंडले आहेत. छातीवर रत्नजडित आभूषणे आहेत आणि उजवा हात वरदहस्त आहे. मूर्तीचा डावा हात छातीवर आहे. ध्यानमुद्रा व योगमुद्रा या मुद्रांचे एकत्रित रूप येथे पाहायला मिळते. या मूर्तीच्या कमरेला लंगोट आणि वस्त्रामध्ये सोगा आहे. पायात तोडे आणि एका पायात वाळा आहे. या मूर्तीच्या डाव्या पायाखाली शनिदेव मारुतीच्या शेपटीने जखडलेल्या अवस्थेत दिसतात. उजवीकडे शनिदेवांची पत्नी धामिनीदेवीची मूर्ती आहे.
पौराणिक संदर्भानुसार, रावण अत्यंत विद्वान परंतु अहंकारी होता. त्याने आपला पुत्र इंद्रजित याला अजेय बनवण्यासाठी सर्व नवग्रहांना बंदी बनवून आपल्या सिंहासनाखाली पालथे पाडून ठेवले होते. यामध्ये शनिदेवही होते. मारुती जेव्हा सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांना शनिदेवांची ही दुर्दशा दिसली. त्यावेळी मारुतीने शनिदेवांना रावणाच्या बंधनातून मुक्त केले. मात्र, शनिदेवांच्या ‘वक्रदृष्टी’पासून सृष्टीचा बचाव करण्यासाठी आणि त्यांच्या अहंकाराचे शमन करण्यासाठी मारुतीने शनिदेवांना आपल्या पायाखाली जखडून ठेवले. शनिदेवांनी मारुतीवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण मारुतींच्या अफाट शक्तीपुढे त्यांचे काही चालले नाही.
त्याच वेळी शनिदेवांची पत्नी धामिनीदेवीने मारुतीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली की, ‘हे पवनपुत्र, माझ्या पतीला मुक्त करा. ते केवळ आपले कर्तव्य पार पाडत आहेत.’ पत्नीची व्याकुळता आणि शनिदेवांनी आपली चूक मान्य केल्यावर मारुती प्रसन्न झाले व त्यांनी शनिदेवांना मुक्त केले. या उपकाराची परतफेड म्हणून शनिदेवांनी हनुमंतांना वचन दिले की, ‘जो भक्त तुमची मनापासून भक्ती करेल, त्याला माझ्या साडेसातीचा किंवा वक्रदृष्टीचा त्रास होणार नाही.’ अशा या पौराणिक घटनेचे वर्णन लोणार येथील या मूर्तीमध्ये अधोरेखित होते. मात्र, काही अभ्यासकांच्या मते मारुतीच्या पायाखाली असलेली व्यक्ती ही रावणाचा किशोरवयीन पुत्र अक्षयकुमार असावा. त्याला मारुतीने मारले होते. या मंदिराच्या परिसरातील जमिनीत मोठ्या प्रमाणावर लोखंड असल्याने हनुमानाची ही मूर्ती चुंबकीय शक्तीने भारलेली असल्याचे मानले जाते. या मूर्तीच्या मागील बाजूला असलेल्या देवकोष्ठकात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या उजवीकडे गोविंद भिकाजी कानिटकर यांची समाधी आहे.
लोणारच्या या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव व सोहळे पार पडतात. त्यात हनुमान जयंती हा सर्वात मोठा उत्सव असतो. चैत्र पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या उत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिराचा परिसर भक्तांनी गजबजून जातो. सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म सोहळा पार पडल्यावर ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. सकाळी मुख्य मूर्तीला तेलाचा लेप लावून अभिषेक केला जातो. सायंकाळी लोणार शहरातून पालखी काढली जाते. यात ढोल-ताशांच्या गजरात शेकडो भाविक सहभागी होतात. याशिवाय येथे रामनवमीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. नऊ दिवस चालणाऱ्या रामजन्मोत्सवात दररोज कीर्तन, भजन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. तसेच, श्रावण महिन्यात दर शनिवारी येथे भाविकांची गर्दी असते. अनेक भाविक लोणार सरोवराची परिक्रमा पूर्ण करून या मारुतीचे दर्शन घेतात. दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांना व पर्यटकांना या मंदिरातील निद्रिस्त मारुतीचे दर्शन घेता येते.