चिपळूण तालुक्यातील निसर्गसमृद्ध परिसरात वसलेल्या टेरव या गावातील कुलस्वामिनी भवानी देवी व ग्रामदैवत वाघजाई देवी यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवी, असा येथील देवतांचा लौकिक आहे. आधुनिक रचनेचे हे दुमजली मंदिर प्रशस्त असून संपूर्ण बांधकामात संगमरवराचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिरावर असणारी भाविकांची श्रद्धा व दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या, यावरून राज्य सरकारनेही तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन या मंदिराचा गौरव केला आहे.
मंदिराच्या स्थापनेबाबत असे सांगितले जाते की चिपळूण तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ आहे. पूर्वीच्या काळी येथे घनदाट जंगल असल्याने वाघांचा वावर असायचा. येथील बहुसंख्य लोक शेतकरी असल्यामुळे या प्राण्यांपासून आपले व गुरांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यांनी वाघजाईचे मंदिर बांधले. वाघजाई म्हणजे वाघांपासून संरक्षण करणारी देवता, अशी येथील स्थानिकांची धारणा आहे. देवीचे हे स्थान ३५० वर्षांपूर्वीचे आहे. जागृत स्थान व भवानी–वाघजाईच्या लौकिकामुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांतून दररोज शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येथील भवानी मातेचा इतिहास तुळजापूरच्या भवानीशी नाते सांगणारा आहे. असे मानले जाते की तुळजापूरची भवानी माता अंशरूपाने येथे वास करते.
चिपळूणपासून काही अंतरावर असलेल्या टेरव गावातील कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवीचे मंदिर कोकणातील वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. एका मोठ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील विस्तीर्ण प्रांगणात सुंदर उद्यान विकसित करण्यात आले असून त्यामध्ये सात अर्धवर्तुळाकार पुष्पवाटिका आहेत. या उद्यानात अनेक प्रकारची फुलझाडे व शोभेची झाडे लावून त्याची निगाही राखलेली दिसते. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी या उद्यानातून फरसबंदीची पायवाट आहे. या पायवाटेवरून पुढे जाताना शुभ्र संगमरवरी बांधकाम असलेले मंदिर नजरेस पडते. दाक्षिणात्य पद्धतीची रचना असलेल्या या मंदिराचे स्वरूप सभामंडप व दोन गर्भगृह असे आहे. दोन हजार भाविक एकावेळी बसू शकतील, असा येथील प्रशस्त सभामंडप आहे.
मंदिराला ४० फूट उंचीची दोन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारावरील खांबांवर कोरीव नक्षीकाम असून त्यावर अनेक शिल्पेही आहेत. सभामंडपाच्या मुख्य द्वारपट्टीवर दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत. सभामंडपाच्या उजवीकडे व डावीकडे दोन गर्भगृहे आहेत. उजवीकडील गर्भगृहात भवानी मातेच्या मुख्य मूर्तीसह श्री भैरी व श्री महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. भवानी देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची आहे. देवीच्या हातात महिषासुराचा वध दर्शवणारी विविध आयुधे आहेत. ही मूर्ती काळ्या नीलम पाषाणातील असून उडपी येथून ती बनवून घेण्यात आली होती.
डावीकडील गर्भगृहात वाघजाई मातेच्या मुख्य मूर्तीसह श्री केदार व श्री कालिका माता यांच्या मूर्ती आहेत. देवी वाघजाई वाघावर आरूढ असून अष्ठभुजाधारिणी आहे. तिला व्याघ्रेश्वरी किंवा व्याघ्राम्बरी असेही म्हणतात. याशिवाय सभामंडपातील एका लहान गर्भगृहात शिवपिंडी व त्याच्यासमोर नंदी आहे. या मंदिरात नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्वतीच्या सर्व नऊ रूपांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धीदात्री यांचा समावेश आहे. या सर्व मूर्ती येथील सभामंडपाच्या एका बाजूला स्थित आहेत.
मंदिराच्या भिंतींवर शिल्पांकन असून त्यामध्ये वीणाधारी स्त्री, मृदंगधारी वादक, नृत्य करणाऱ्या अप्सरा, ध्यानस्थ देवी आदी शिल्पे आहेत. सभामंडपाच्या गवाक्षांवर (खिडकी) मोर, कपोत, हंस, दशावतार कोरलेले आहेत. मंदिराच्या गर्भगृहांवर दाक्षिणात्य पद्धतीचे शिखर आहेत. दरवर्षी या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यामध्ये महाभिषेक, घटस्थापना, नवदुर्गा पूजन, कुंकुमार्चन, पुष्पार्चन, चंडीपाठ, महामंगल आरती, भंडारा, भजन, कीर्तन, गरबा व दांडिया असे कार्यक्रम होतात. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी मंदिर व परिसरात हजारो दिवे लावून रोषणाई करण्यात येते.
चैत्र पौर्णिमेला ‘चैतावली’ या नावाने येथे दोन दिवसांची मोठी यात्रा भरते. यावेळी परिसरातील कामथे व चिंचरवरी या गावांतून ग्रामदेवींच्या पालख्या वाजत–गाजत मिरवणुकीने टेरव येथे आपली मोठी बहीण श्रीभवानी देवीला भेटण्यास येतात. यावेळी देवी भवानीची पालखी व आलेल्या दोन पालख्या एकमेकींना भेटतात. हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविक उपस्थित असतात. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर त्या पुन्हा आपल्या गावी मार्गस्थ होतात. त्यावेळी टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाते. या कार्यक्रमानंतर येथील जत्रोत्सवाची सांगता होते.