चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या तालुक्याच्या शहराचे ग्रामदैवत असलेले येथील भवानी देवीचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. या मंदिरातील नवरात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून येथे दसऱ्याच्या दिवशी भरणारी यात्रा ही राजुरा तालुक्यातील मोठी यात्रा समजली जाते. नवरात्रीच्या ९ दिवस येथे होणारा दांडिया व दसऱ्याच्या दिवशी होणारे रावणदहन हे येथील प्रमुख आकर्षण आहे. येथील कोष्टी समाजातील अनेकांची ही देवी कुलदैवत आहे.
राजुरा शहरात भवानी मातेच्या मंदिराला विशेष स्थान आहे. या मंदिराच्या इतिहासाबाबत नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी मंदिराच्या वास्तूवरून ते किमान ४०० वर्षे जुने असावे, असा अभ्यासकांचा दावा आहे. सध्या ज्या ठिकाणी मंदिर आहे तेथे आधी रामपूर नावाचे एक छोटे खेडे होते. हा संपूर्ण परिसर तेव्हा जंगल व शेतीने व्याप्त होता. दिवसेंदिवस होणाऱ्या विकासामुळे राजुरा शहराच्या सीमा वाढत गेल्या व रामपूर हे गाव या शहरात समाविष्ट झाले. त्यामुळे सध्या हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात आले आहे. संकटात साथ देणारी, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही भवानी माता राजुरा शहराची प्रमुख श्रद्धास्थान बनली आहे.
असे सांगितले जाते की देवीचे हे स्थान येथे पुरातन काळापासून अस्तित्वात असून ही देवी सोमेश्वराबरोबर (राजुरा शहरात सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूर्वीचे सोमेश्वराचे भव्य देवस्थान आहे) येथे आली. देवीचे मूळ नाव तुकाई होते, पण भवानी नावाने हे मंदिर प्रसिद्ध झाले. सध्याचे हे मंदिर नागपूरचे राजे जानोजी भोसले यांनी बांधले, असे सांगितले जात असले तरी त्याची अधिकृत नोंद मात्र नाही.
मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की फार पूर्वी गाडगे नावाचा एक देवीभक्त या गावात राहत असे. दररोज तो देवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवण ग्रहण करीत नसे. एकदा पावसाळ्याच्या दिवसांत मंदिरासमोर असलेल्या नाल्याला पूर आला. त्यामुळे देवीभक्त गाडगे मंदिरात येऊ शकला नाही म्हणून देवीला उपवास घडला. त्यामुळे देवीने नाल्याला शाप दिला की तू कायम कोरडा राहशील. तेव्हापासून हा नाला कोरडा पडला आहे.
भवानी देवीच्या मंदिरासमोर भव्य पटांगण आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दीपमाळ व एक उंच त्रिशूळ आहे. जमिनीपासून साधारणतः ५ फूट उंचीवर मंदिराचा सभामंडप आहे. सभामंडपाच्या उजवीकडे बाहेरच्या बाजूने गणेशमूर्ती, तर डावीकडे काळभैरव व बटुभैरव यांच्या मूर्ती आहेत. हा सभामंडप नंतरच्या काळात बांधला असून तो अर्धमंडप (बाजूने भिंती नसलेला, मोकळा) प्रकारातील आहे. सभामंडपातील स्तंभ नक्षीदार असून तेथे श्रीविष्णू, नंदीवर आरुढ शिव–पार्वती, परशुराम व जमदग्नी ऋषी यांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपासमोर असलेले गर्भगृह हे पूर्वीचे देवीचे मूळ मंदिर होते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर २ प्रतिमा कोरलेल्या असून त्यातील एक बालाजी पद्मावतीची व दुसरी लक्ष्मी नारायणाची आहे. गर्भगृहात सुंदर मखरामध्ये सुमारे २.५ फूट उंचीची शेंदूरचर्चित देवीची मूर्ती आहे. डोक्यावर मुकुट, नाकात नथ, गळ्यात विविध अलंकार व वैशिष्ट्यपूर्ण नेसविलेली साडी यामुळे या देवीचे रूप खुलून दिसते. गर्भगृह चौकोनी असून त्यावरील छत मात्र अष्टकोनी आहे. दररोज सकाळी देवीची महापूजा, तर सकाळी आणि सायंकाळी आरती होते. या आरतीसाठी अनेक भाविक आवर्जून उपस्थित असतात. मंगळवारी आणि शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी गर्दी असते. याशिवाय दसरा आणि चैत्र नवरात्रोत्सवात येथे यात्रा भरते. वर्षातील अनेक उत्सवही येथे साजरे होतात. येथील नवरात्रोत्सव व दसऱ्याला रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतो. या सर्व उत्सवांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय असते.
मंदिराच्या आवारात अष्टकोनी विहीर असून पूर्वी त्यात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या; परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या आता बुजविल्या आहेत. या मंदिराच्या आवारात मारुतीची देवळी (छोटे मंदिर) आहे. याशिवाय येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी मंदिराच्या शेजारी मोठा सभामंडप बांधण्यात आला आहे. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत भाविक गर्भगृहात जाऊन देवीचे दर्शन घेऊ शकतात.