
निसर्गसौंदर्याची देगणी लाभलेले संगमेश्वर तालुक्यातील देवळे हे गाव देवालयांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात एक दोन नव्हे तर चक्क दहा मोठी व इतर लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये भवानी खडगेश्वर या प्राचीन व प्रसिद्ध मंदिरासह गावदेवी काळेश्वरी, विठ्ठल मंदिर, भैरी भवानी, रवळनाथ, श्रीकृष्ण, गणपती, मारुती पार, कालिका आणि दत्त मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. अनेक मंदिरे असल्यामुळे या गावाला देवळे हे नाव पडले. येथील खडगेश्वर मंदिर हे जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांपैकी एक असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की कोल्हापूरचा शिलाहार राजा गंडरादित्य पूर्वी या प्रदेशावर राज्य करत असे. एकदा भ्रमंतीदरम्यान त्याला जंगलातील असलेल्या या देवस्थानाचा शोध लागला. त्यानंतर त्याने बल्लाळपंत दीक्षित या व्यक्तीवर देवस्थानाची व्यवस्था सोपवून त्यासाठी उत्तरेकडील बावनदीपासून दक्षिणेकडील मुचकुंदी नदीपर्यंतचा ४८ खेड्यांचा मुलुख देवस्थानाच्या व्यवस्थेसाठी तोडून दिला.
काही काळानंतर देवगिरीचा यादव राजा सिंघण आणि गंडरादित्य यांच्यादरम्यान खिद्रापूर येथे झालेल्या युद्धात गंडरादित्याचा पराभव झाला. त्यानंतर दीक्षित यांनी आपली खडग (तलवार) शंकराला अर्पण केली. तेव्हापासून या मंदिराला खडगेश्वर हे नाव पडले. याशिवाय कुलाबा (आताचे रायगड) जिल्ह्यातील चौल येथे राज्य करणारा शिवभक्त राजा झंज याने १२ शिवालये बांधली होती. त्यात खडगेश्वर आणि धूतपापेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे, असा उल्लेख इ. स १०९४ च्या ताम्रपटात आहे.
रत्नागिरी–कोल्हापूर मार्गावरील दाभोळे घाट पार केल्यावर देवळे गावात येण्यासाठी रस्ता आहे. त्यावरून मंदिरापर्यंत येता येते. रस्त्याला लागून असलेल्या या मंदिराच्या काही पायऱ्या चढल्यावर प्रवेशद्वार लागतो. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना आहे. मंदिराला चारही बाजूंनी चिरेबंदी तटबंदी आहे. खुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराच्या आवारात प्रवेशद्वाराला लागून आठ दीपमाळा आहेत. सुमारे तीन फूट उंचीच्या जोत्यावर उभ्या असलेल्या चौपाखी मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम लाकडी असून तेथील खांब, तसेच आतील कमानींवर कोरीव काम आहे. अंतराळाच्या नक्षीदार द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. अंतराळात गर्भगृहाला लागून डावीकडे असलेल्या चौथऱ्यावर नागफणा असलेला शिवमुखवटा, तर उजव्या बाजूला गणेशमूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अखंड पाषाणातील नंदी आहे. गर्भगृहात काहीशा खोलगट भागात काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे. असे सांगितले जाते की जमिनीतून हे शिवलिंग बाहेर काढताना त्यावर कुदळीचा घाव बसल्याने त्याच्या बाणाचा कपचा उडाला होता. आजही हा वेगळा झालेला कपचा शिवपिंडीवर पाहता येतो.
मंदिराच्या परिसरात काही वीरगळी पाहायला मिळतात. या गावात पूर्वी काही
लढाया झाल्या होत्या. त्यात धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या या वीरगळी आहेत. पूर्वी उघड्या माळावर असलेल्या वीरगळी कालांतराने उचलून मंदिरात आणल्या गेल्या. काही वीरगळींवर कोरीव काम आहे. देवालयाच्या मागे असलेल्या हरिहर धर्मशाळेत अन्नपूर्णागृह आहे. धर्मशाळेत सुमारे ५० भाविकांच्या राहण्याची सोय होते. धर्मशाळेला लागूनच विहीर आहे. मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्र, कोजागरी पौर्णिमा आणि रामनवमी या दिवशी उत्सव होतात. उत्सवांना निश्चित स्वरूप असावे, या उद्देशाने ग्रामस्थांनी गेल्या शतकात ज्येष्ठ साहित्यिक न. चिं. केळकर यांच्या सल्ल्याने ‘श्रीखडगेश्वर संस्था वर्धक मंडळी’ नावाचे मंडळ स्थापन केले. या मंडळाला २०२० मध्ये १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
माघ वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत येथे होणारा शिवरात्रीचा उत्सव हा येथील प्रमुख उत्सव असतो. यावेळी सहा दिवस मोठी यात्रा भरते. पारंपरिक पद्धतीने शंकराला आवाहन केल्यानंतर षोडोशोपचार पूजेने उत्सवाला सुरुवात होते. पहिल्या दिवशी मंत्रजागर व आरती झाल्यावर महादेवांचा मुखवटा पालखीत ठेवला जातो. त्यानंतर ढोल–ताशांच्या गजरात पालखी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालते. त्यानंतर देवाला मंदिरात पुन्हा विराजमान केले जाते. रात्री कीर्तनाने त्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता
होते. त्यानंतर पुढचे पाच दिवस मंदिरात विविध कार्यक्रम होतात. शिवरात्रीच्या दिवशी रूद्रावर्तन आणि इतर विधी होतात. रात्री मंदिराला ११ प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यानंतर देवाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये महापूजा बांधल्या जातात. त्यापैकी रात्री १२ वाजता बांधली जाणारी तांदळाची महापूजा भाविकांचे आकर्षण असते. पहाटे कीर्तनाने त्या दिवसाच्या सोहळ्याची सांगता होते.
मंदिराच्या दक्षिणेला ग्रामदेवता कालिका कालेश्वरीचे मंदिर आहे. तेथे होळीदरम्यान उत्सव होतो. मंदिराच्या उत्तरेला असलेल्या विठ्ठल–रखुमाई मंदिरात कार्तिक वद्य दशमी ते कार्तिक अमावस्येपर्यंत उत्सव असतो. येथील कालिका मंदिराचे नाते थेट कोलकात्याच्या कालिका मंदिराशी सांगितले जाते. उघड्या स्थितीत असलेल्या या मंदिराचे बांधकाम करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, पण ते टिकत नसल्याचे सांगितले जाते. येथील शिमगोत्सवही प्रसिद्ध आहे. उत्सवादरम्यान दाभोळे, मेघी, करंजारी आणि चाफवली या गावांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा होतो. तेव्हा पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित असतात. गावातील लंबगोलाकार म्हणजेच पिंडीच्या आकाराची दगडी बांधकामाची जुनी विहीर आहे. भोकरीची विहीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विहिरीत उन्हाळ्यातही मुबलक पाणी असते.
ऐतिहासिक काळात संगमेश्वरमध्ये देवळे महाल होता. सुभ्याचे ठिकाण असलेल्या महालाची कचेरी गावात मध्यवर्ती भागात होती. शिवाजी महाराजांच्या काळात देवळे गावाला महत्त्व होते. गावातून आसपासच्या सुमारे ४० गावांचा कारभार चालत असे. गावातील खलबतखान्यात सरदारांच्या आणि कारभाऱ्यांच्या मसलती होत असत. आजही खलबतखान्याच्या चौथऱ्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. या गावात अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज आल्याच्या नोंदी आहेत. देवळे आणि मेघी गावच्या सीमेवर एक खिंड आहे, ती घोडखिंड म्हणून प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की संगमेश्वर येथील वास्तव्यादरम्यान या परिसरावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे घोडदळ फिरत असे. घोडदळ या खिंडीत विश्रांतीसाठी थांबत असे म्हणून तिला घोडखिंड हे नाव पडले.