भार्गवराम मंदिर

देवाचे गोठणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

राजापूरजवळील देवाचे गोठणे येथील भार्गवराम मंदिर हे भगवान परशुरामाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते. परशुरामभक्त पेशव्यांचे गुरू श्री ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर १७१०११ मध्ये दक्षिण कोकणातील गोठणे या गावी वास्तव्यासाठी आल्यानंतर, श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांनी त्यांना हे गाव इनाम म्हणून दिले होते. राजाश्रय मिळाल्यावर ब्रह्मेंद्रस्वामी यांनी येथील प्राचीन गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यात परशुरामाची धातूची मूर्ती प्रतिष्ठापित केली. श्री ब्रह्मेंद्रस्वामी यांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या मूर्तीमुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे.

राजापूर ते जैतापूर या खाडीच्या काठी वसलेल्या गावाचे मूळ नाव गोठणे; पण देवासाठी इनाम मिळाले म्हणून त्यालादेवाचे गोठणेअसे म्हटले जाऊ लागले. राजापूर तालुक्यातच गोठणे नावाचे आणखी एक गाव आहे, त्यासदोनिवडे गोठणेअसे म्हणतात. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी निसर्गसमृद्ध वातावरणात असलेल्या भार्गवराम मंदिराभोवती जांभ्या दगडांचा तट प्रांगणात संपूर्ण फरसबंदी आहे. एखाद्या किल्ल्याचा दरवाजा भासावा, असे मंदिराचे प्रवेशद्वार असून त्यावर अष्टकोनी शिखर आहे. या प्रवेशद्वाराच्या शेजारी प्राचीन मोठी दगडी दीपमाळ आहे. मुख्य मंदिरासमोरही दीपमाळ तुलशी वृंदावन असून त्यापुढे मंदिराचा सभामंडप आहे. कौलारू असलेला हा सभामंडप नंतरच्या काळात बांधला असावा, असे मूळ मंदिराकडे पाहिल्यावर जाणवतेसभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.

मंदिराचा सभामंडप खुल्या रचनेचा असून त्यातील कमानीयुक्त लाकडी खांबांवर कलाकुसर केलेली आहे. या खांबांवर रंगकाम केल्यामुळे सभामंडप आकर्षक भासतो. सभामंडपाच्या तीन बाजूला असलेल्या आडव्या लाकडी खांबांवर १०८ ठिकाणी कमळपुष्पातरामनाम लिहिलेले आहे. सभामंडपात असलेल्या अंतराळाच्या प्रवेशद्वारावर कोरीवकाम केलेले असून द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर श्रीगणेशाची मूर्ती आहे. अंतराळात अखंड दगडात कोरलेला नंदी गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ श्रीगणेशाची मूर्ती आहे. अंतराळाप्रमाणेच गर्भगृहाच्या दारावरही कोरीव काम आहे. गर्भगृहात श्रीगोवर्धनेश्वराची पिंडी ही मध्यभागी नसून ती उजवीकडे आहे. (सर्वसाधारणतः गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपिंडी असते). गर्भगृहाच्या मध्यवर्ती भागात देवपीठावर (चौथऱ्यावर) श्री परशुरामांची तांब्याची मूर्ती आहे. सुमारे दोन फूट उंचीच्या या मूर्तीवर चांदीचा मुखवटा बसविण्यात आलेला आहे. या मूर्तीचे वेगळेपण म्हणजे ती नमस्कार मुद्रेत आहे डाव्या हाताच्या बगलेत परशू खोचलेला आहे. परशुरामाची अशी मूर्ती दुर्मिळ समजली जाते. या मूर्तीच्या बाजूला ब्रह्मदेव देवीच्या इतर धातू मूर्तीही आहेत. या मंदिरात सुमारे दीड टन वजनाची एक घंटा आहे. असे सांगितले जाते की वसई जिंकल्यानंतर चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांच्या चर्चमधील काही घंटा जमा करून त्या काही मंदिरांना दिल्या होत्या, त्यापैकीच ही एक आहे.

मुख्य मंदिर हे दगडी बांधकामाचे असून त्यावर अष्टकोनी आकाराचा घुमट आहे. मंदिराच्या भिंतींवर विविध शिल्पांसोबतच गंडभेरुंडाचे (मनुष्याचे किंवा पक्ष्याचे एक धड, पण दोन तोंडे आणि दोन पंख असणारा काल्पनिक पक्षी) शिल्प आहे. मंदिराच्या प्रांगणात गणपती, गरुड, लक्ष्मीनारायण, कालिकादेवी, हनुमान श्रीदत्त अशी मंदिरे आहेत. मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, आषाढीकार्तिकी एकादशी, गोकुळाष्टमी, त्रिपुरारी पौर्णिमा, मकर संक्रांत, महाशिवरात्र दसऱ्याला उत्सव साजरे होतात. दसरा रामनवमीला येथे यात्रा भरते. याशिवाय अक्षय्य तृतीयेला भार्गवराम जयंती उत्सव श्रावण शुद्ध नवमीला ब्रह्मेंद्रस्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव साजरा केला जातो. उत्सवांमधील पूजेचा पहिला मान हा गोवर्धनेश्वराचा असून त्यानंतर भार्गवरामाची पूजा केली जाते.

मंदिरात काही शुल्क आकारून पूजा, अभिषेक, एकादष्णी (रुद्राच्या स्तोत्राची अकरा आवर्तने म्हणजे एक एकादष्णी) अभिषेक महानैवेद्य आणि लघुरुद्र अभिषेक केले जातात. (विधींसाठी संपर्क : अरुण दीक्षित : ७२६४९८९९३६, जयंत दाते : ७७९८८७२१९४)

मध्ययुगीन भार्गवराम मंदिरासोबतच या परिसरात अनेक अश्मयुगीन कातळशिल्पे (सड्यावर / कातळाच्या आडव्या भुपृष्ठावर कोरलेली शिल्पे) आहेत. मंदिराच्या मागील पाखाडीतून (पायवाट) काही अंतर पुढे गेल्यास तेथील वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प पाहता येते. परिसरात दहाहून अधिक कातळशिल्पे आहेत. त्यामध्ये काही मनुष्याकृतीही आहेत. मार्च २०२२ मध्ये येथील नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश केलेला आहे. या गावाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे येथील खडकांमध्ये असलेल्या चुंबकीय लहरींमुळे येथील होकायंत्रावर चुकीची दिशा दाखविली जाते. असे सांगितले जाते की जांभ्या दगडांत चुंबकीय विस्थापन दर्शवणारी जगातील ही दुर्मिळ जागा आहे. याशिवाय या परिसरामध्ये लाखो वर्षांपूर्वीची जीवाष्मेही आढळली आहेत. पावसाळ्यात येथे पाण्याची लहानमोठी तळी निर्माण होतात. गवताच्या ३० हून अधिक प्रजाती आणि १५० हून अधिक प्रजातींच्या रंगीबेरंगी कातळ फुलांनी (कातळावर येणाऱ्या गवतसदृश्य रोपांवरील फुले) हा परिसर भरून जातो. दुर्मिळ असलेले मोठे धनेश किंवा शिंगचोचा (Hornbill) पक्षीही येथे पाहायला मिळतात. परिसरातील विविध वैशिष्ट्यांमुळे भाविकांसोबतच जगभरातील अनेक पर्यटक अभ्यासकही येथे येत असतात.

उपयुक्त माहिती:

  • राजापूरपासून २५ किमी, तर रत्नागिरीपासून ३३ किमी अंतरावर
  • राजापूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home