अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद किल्ल्यात स्वतंत्र भारतातील भारतमातेचे पहिले मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर प्राचीन वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सध्या ज्या जागेवर हे मंदिर आहे ती जागा सोडण्यास जैन, बौद्ध, मुस्लिम तसेच हिंदू धर्मीय भाविकांची तयारी नव्हती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या विवादित जागी भारतमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ही देवी या किल्ल्यात उभी आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या वायव्येकडे वेरूळ रस्त्यावर, इतर डोंगररांगांपासून वेगळ्या असलेल्या सुमारे २०० मीटर उंच टेकडीवर प्राचीन दौलताबाद किल्ला आहे. यादव, मुस्लिम, मराठा आणि ब्रिटिश अशा अनेक साम्राज्यांची राजधानी असलेला हा किल्ला त्या त्या कालखंडांतील राजकीय व सामाजिक बदलांचा साक्षीदार राहिलेला आहे. असे सांगण्यात येते की पाचवा भिल्लम यादव याने इ. स. ११८७ मध्ये या डोंगरावर किल्ला बांधून येथे यादवांची राजधानी स्थापन केली होती. या किल्ल्याचे आधीचे नाव देवगिरी (देवांचा डोंगर) असे होते. दिल्लीचा सुलतान महंमद बिन तुघलक याने इ. स. १३३८ मध्ये आपली राजधानी दिल्लीहून येथे हलवली. त्याने यादवांकडे असलेली विपुल संपत्ती पाहून या किल्ल्याचे नाव दौलताबाद असे केले. येथे जैन, हिंदू व मुस्लिम धर्मीयांच्या वावराचे पुरातत्त्वीय अवशेष सापडतात. या किल्ल्यात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांची प्राचीन प्रार्थनास्थळे आहेत. त्यापैकी भारतमातेचे मंदिर सर्वात महत्त्वाचे समजले जाते.
पूर्वी हे जैन मंदिर होते, असा इतिहासकारांचा दावा आहे. या मंदिराचा कालावधी निश्चित नाही. यादव राजा रामदेवराय याने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आहे, तर राजा भोज याने हे मंदिर उभारल्याचा उल्लेख शौनक अली यांच्या पुस्तकात आढळतो. दुसरीकडे परमार राजाचा मंत्री पृथ्वीधर याने हे मंदिर बांधल्याचे भारत इतिहास संशोधक मंडळाचे मत आहे. अलाउद्दीन खिलजीने १२९४ मध्ये हा किल्ला घेतला. त्याच्या निधनानंतर काही काळासाठी हा किल्ला पुन्हा यादव राजा हरपालदेवकडे होता. मात्र अल्लाउद्दीननंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारकशाह खिलजीने पुन्हा किल्ला जिंकला. त्याने १३१८ मध्ये देवगिरी किल्ल्यावरील मंदिरांची तोडफोड केली. त्यात या जैन मंदिराचाही समावेश होता. त्यानंतर या जागेवर मशिद बांधण्यात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाचे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. मराठवाड्याचाही स्वतंत्र भारतात समावेश झाला. मात्र या किल्ल्यातील मंदिराच्या जागेबाबत जैन, हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये वाद निर्माण झाला. हिंदू धर्मीयांना येथे हिंदू मंदिर, जैन श्रद्धाळूंना जैन मंदिर हवे होते. दुसरीकडे मुस्लिम धर्मीय मशिदीची जागा सोडायला तयार नव्हते.
या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून या विवादित जागी भारतमातेची मूर्ती स्थापन केली.
दौलताबाद किल्ल्यात ४७.७५ मीटर लांबी, ४६.७५ मीटर रुंदी आणि ६.६१ मीटर खोली असलेला हत्ती तलाव आहे. या तलावाच्या काठावर उभे राहून टाळी वाजवल्यास प्रतिध्वनी ऐकू येतो. पूर्वी किल्ल्यातील रहिवासी वर्षभर या हौदातील पाणी वापरत. या तलावाच्या समोरच भारतमाता मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर घुमट आहे. भक्कम दगडी बांधकाम असलेल्या या प्रवेशद्वाराचा आकार चौकोनी आहे. मंदिराभोवती असलेली मजबूत तटबंदी आजही सुस्थितीत आहे. मंदिराच्या प्रांगणात दगडांची फरसबंदी आहे. प्रांगणाच्या उत्तर व दक्षिण दिशेला आणखी दोन दरवाजे आहेत. याशिवाय प्रांगणाच्या चारही कोपऱ्यांवर बुरूज–मनोरे आहेत. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराकडून मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर अनेक शिल्पे दिसतात. हे सारे बांधकाम खिलजी–बहमनी काळातील स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य दर्शविते.
या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. त्यात पश्चिम बाजूकडे ८५ मीटर लांबीचा व २० मीटर रुंदी असलेला प्रार्थनामंडप आहे. या मंडपात तब्बल १२६ दगडी खांब आहेत. यातील प्रत्येक खांबावर वेगवेगळे नक्षीकाम आहे. त्यामध्ये कमलपुष्पे, देवी, जैन तीर्थंकारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंडपात यादव काळात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव होत असे. त्यावेळी जनतेलाही येथे प्रवेश मिळत असे, अशा नोंदी आहेत. प्रार्थनामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहात प्रसन्न मुद्रेतील भारतमातेची मूर्ती मोजकेच दागदागिने लेवून उभी आहे. हिरवी साडी परिधान केलेली भारतमाता अष्टभुजाधारी असून तिच्या हातांमध्ये कमळ, त्रिशूळ, तलवार, चक्र, अग्नि, नागराज, शंख अशी आयुधे आहेत. एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. या शस्त्रसज्ज देवीमूर्तीच्या मस्तकावर मुकुट आहे. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे.
दिल्ली येथील कुतुबमिनारप्रमाणे भारतमाता मंदिराच्या शेजारीच एक उंच मनोरा आहे. तो चांदमिनार म्हणून प्रसिद्ध आहे. बहमनी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या सुलतानावर मिळविलेल्या विजयाची स्मृती म्हणून इ. स. १४४५ मध्ये चांदमिनारची उभारणी केली होती. या चारमजली मिनारची उंची १०० मीटर असून त्याचा तळाजवळ असलेला व्यास दहा मीटर आहे. हा मिनार वरच्या बाजूला अरुंद होत जातो. चांदमिनारच्या आतील बाजूने असलेल्या पायऱ्यांवरून वर चढत जाता येते. येथील सर्वांत खालच्या मजल्याची उंची सर्वात अधिक आहे. त्यावरील मजले कमी उंचीचे आहेत. या मनोऱ्याच्या आतील भागात असलेल्या वर्तुळाकार पायऱ्यांवर प्रकाश यावा व हवा खेळती राहावी यासाठी लहान लहान खिडक्या ठेवलेल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर सुमारे ८० पायऱ्या व सहा लहान खिडक्या आहेत. प्रत्येक मजल्यावर सज्जा असल्यामुळे तेथून दौलताबाद किल्ल्याचे विहंगम दर्शन होते.
याशिवाय किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याजवळ एक गुहा आहे. असे सांगितले जाते की या गुहेत संत एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी हे तपश्चर्या करीत असत. काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये जनार्दन स्वामी हे येथील किल्लेदार होते, असा उल्लेख आहे. एकनाथ महाराजांना याच ठिकाणी जनार्दन स्वामींकडून गुरुबोध प्राप्त झाला होता. एकनाथ महाराजांसह गुरू जनार्दन स्वामी यांचे सहा वर्षे या किल्ल्यावर वास्तव्य होते. फाल्गुन वद्य षष्ठीला संत जनार्दन स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक भाविक व एकनाथांचे वंशज येथे येतात. त्यांच्या श्रद्धेप्रमाणे स्वामींनी येथेच देह ठेवला होता.