प्राचीन काळी सेऊणदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यादवांच्या राज्याची राजधानी असलेल्या देवगिरी किल्ल्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर भांगसी गड वा भांगसाई गड आहे. येथील भांगसी मातेचे प्राचीन मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरामुळे या गडास भांगसी गड हे नाव पडले. भगवान शंकराची अर्धांगिनी असलेली भांगसी माता ही भव–भयाचा नाश करणारी देवी म्हणून ओळखली जाते. निसर्गसुंदर गडावर, कातळात कोरलेल्या गुहेत वसलेल्या भांगसी मातेची सर्वांवर कृपादृष्टी असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
छत्रपती संभाजीनगर–दौलताबाद मार्गावर अजिंठा डोंगर रांगेपासून वेगळा झालेला एक मध्यम आकाराचा डोंगर दिसतो. आजूबाजूच्या सपाट परिसरामुळे हा डोंगर लगेच नजरेत भरतो. येथील गड कातळात कोरलेला व समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचीवर आहे. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ दिसत असलेले तटबंदीचे अवशेष, गडावरील कोरलेल्या गुहा, पाण्याचे टाक हे गडाचे ऐतिहासिकत्व रेखीत करतात. या गडाच्या उभारणीपासूनच येथे भांगसी मातेचे मंदिर असल्याने त्यास धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, देवगिरी आणि भांगसी गड हे समकालीन आहेत. या गडाच्या इतिहासाबद्दल फारशा नोंदी नाहीत. मात्र इ.स. १२९६ मध्ये, त्या वेळी कारा–माणिकपूरचा सुभेदार असलेल्या अल्लाऊद्दीन खिलजीने जेव्हा देवगिरीवर हल्ला केला, तेव्हा प्रथम लासौर घाटीत रामदेवराय यांचा मांडलिक सरदार कान्हा याच्याशी त्याचे युद्ध झाले. तेथून तो भांगसी गडाच्या पायथ्याशी आला. त्यावेळी येथे त्याच्या फौजेने तळ ठोकला होता असे सांगण्यात येते.
या गडाच्या पायथ्यापर्यंत वाहने जातात. येथे पूजासाहित्याची दुकाने व छोटी उपाहारगृहे आहेत. पायथ्याजवळ असलेल्या प्रवेशद्वारानजीक श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांचा आश्रम, आश्रमाचे गुरुकुल आणि परमानंदगिरी महाराजांची कुटी आहे. प्रवेशद्वारापासून ५८५ पायऱ्या चढून गडावर जावे लागते. शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या वाटेवरून गडावर पोचण्यासाठी साधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडाचा आकार आयताकृती आहे; परंतु येथे गडाचे अवशेष फारसे दिसत नाहीत. या गडाच्या कडेच्या बाजूने ११ लहान–मोठ्या गुंफा आहेत. राष्ट्रकुटांच्या काळात मराठवाड्यातील डोंगरांवर मोठ्या प्रमाणावर लेण्या खोदण्यात आल्या. त्याच काळात या मंदिरावरही लेण्या खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्या नंतर अर्धवट सोडून देण्यात आल्या. या गुंफा आणि लेण्यांमधील ओबडधोबड कोरीव कामांवरून ते स्पष्ट होते. त्यातीलच एका गुंफेमध्ये भांगसी मातेचे मंदिर आहे.
गडमाथ्यावर गेल्यानंतर प्रथम सिमेंट–काँक्रीटचा वापर करून बांधलेले नवीन मंदिर दिसते. मुखमंडप, खुला सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मुखमंडपावर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीतील आयताकृती व उतरत्या छपराची वास्तू आहे. सभामंडप समतल वितान स्वरूपाचा असून गाभाऱ्यावर उंच गोलाकार शिखर व त्यावर सुवर्णरंगी आमलक आणि कळस आहे. या नव्या मंदिराच्या खाली भांगसी मातेचे गुंफामंदिर आहे. तेथे जाण्याकरीता नव्या मंदिराच्या सभामंडपातून १६ ते १८ पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून गुहेत येताच समोरच गुहामंदिराचा सभामंडप आणि गर्भगृह दिसते. हा सभामंडप, त्यातील दगडी खांब आणि गर्भगृह हे एकाच अखंड शिळेतून कोरलेले आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर भांगसी मातेची मूळ शेंदूरचर्चित तांदळास्वरूप मूर्ती आहे. मंदिरात साधारणतः एका उंच चौथऱ्यावर मूर्ती बसवलेली असते त्यास वज्रपीठ असे म्हणतात. या मूर्तीशेजारी सिंहारूढ अष्टभुजाधारी दुर्गामातेची नवीन मूर्ती बसविलेली आहे. या गर्भगृहाच्या डाव्या बाजूला कातळात एक अत्यंत अरुंद व कमी उंचीचा बोगदा आहे. त्यातून रांगतच जावे लागते. पुढे गेल्यानंतर आत २५ खांब असलेली प्रशस्त गुहा आहे. दक्षिणाभिमुखी असलेली ही गुहा दोन स्तरांत खोदलेली आहे. या गुहेच्या उजव्या बाजूस पाण्याचे विशाल टाक आहे. येथूनच प्राचीन काळी गडावरील सैन्य शिबंदीस पाण्याचा पुरवठा होत असावा. या गुहेच्या एका कोपऱ्यात गणेशमूर्ती, शिवपिंडी व नंदी बसवण्यात आलेला आहे. या पाण्याच्या टाकास सासू–सुनेचे कुंड असे म्हणतात. गडावर ठिकठिकाणी असे पाण्याचे टाक असून अन्यत्रही कातळात कोरलेल्या गुंफा दिसतात. या गडावरून दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याचा परिसर दिसतो. येथून पूर्वी देवगिरीवर नजर ठेवली जात असे, असे सांगण्यात येते.
भांगसी गडाच्या पायथ्याशी श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराजांचा ‘परमानंदनदर, शरणापूर’ हा आश्रम आहे. यात परमानंदगिरी महाराजांची ‘कुटिया’ आहे. आश्रमाच्या कातीव दगडांनी बांधलेल्या प्रवेशद्वारातून आत काही अंतर चालत गेल्यानंतर समोर एक मोठी दुमजली इमारत दिसते. या इमारतीस पुढच्या बाजूने एखाद्या राजवाड्यासारखे सुशोभित करण्यात आले आहे. १४ पायऱ्या चढून या इमारतीच्या मुखमंडपात (पोर्च) प्रवेश होतो. समोरच एका खोलीमध्ये महाराजांचे दर्शनस्थळ आहे. तेथे त्यांचे सिंहासन आहे. या आश्रमामध्ये निवासी गुरुकुल आहे. तेथे ४५० विद्यार्थी धर्मशिक्षणाबरोबरच नियमित शिक्षणही घेत असतात. त्यांना येथे ध्यान, योगासन, प्राणायामाचेही धडे दिले जातात. आश्रमपरिसरात भव्य ध्यानमंदिर असून तेथे महाराजांना बसण्यासाठी भव्य मंदिरसदृश्य पीठ तयार करण्यात आले आहे. तेथे बसून परमानंदगिरीजी महाराज विद्यार्थी तसेच शिष्यांना उपदेश करतात. परिसरात रोपवाटिका तसेच गोशाळाही आहे. त्यात गीर जातीच्या सुमारे शंभऱ गायी आहेत. या गायींचे दूधही या विद्यार्थ्यांना दिले जाते.
नवरात्रोत्सवाच्या काळात या गडावर देवीभक्तांची मोठी गर्दी असते. ‘नाही केली भांगसी, तर देवा काय सांगशी’, अशी म्हण येथे प्रचलित आहे. परिसरातील अनेक भक्तांचा वर्षातून एकदा भांगसी मातेच्या दर्शनास येण्याचा परिपाठ आहे. परमानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव, जपानुष्ठानचे आयोजन केले जाते. तसेच या काळात आश्रमात नित्य नियम विधी, आरती, प्रवचन, योगासने आदी विविध कार्यक्रम केले जातात.