साष्टी म्हणजेच सालशेत बेटांमधील प्राचीन गावांपैकी एक असलेले भांडुप हे आजचे मुंबईतील एक मराठीबहुल उपनगर होय. येथील रेल्वे स्थानकाच्या जवळच भांडुपेश्वर महादेवास समर्पित असलेले ऐतिहासिक मंदिर स्थित आहे. भांडुप या गावाची देवता म्हणून भांडुपेश्वर असे नाव प्राप्त झालेल्या या महादेवाचे येथील स्थान अतिशय प्राचीन असल्याचे मानले जाते. भांडुपमधील हजारो रहिवाशांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या या मंदिरात राम दरबार, हनुमान, कालभैरव, शीतला माता आणि नवग्रहांचेही स्थान आहे. महाशिवरात्र आणि रामनवमीच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
भांडुपचा सर्वांत जुना उपलब्ध उल्लेख हा अकराव्या शतकातील आहे. या काळात मुंबई व साष्टी बेटांसह उत्तर कोकणात चालुक्यांचा मांडलिक असलेल्या शिलाहारांचे राज्य होते. पुरी म्हणजेच घारापुरी ही त्यांची राजधानी होती. इ.स. १०२५ च्या सुमारास येथे शिलाहार राजा छित्तराजदेव हा गादीवर आला होता. अंबरनाथ येथील प्रसिद्ध शिवालय छित्तराजदेवानेच बांधले होते. या छित्तराजदेवाचा एक ताम्रपट सन १८३५ मध्ये भांडुपनजीक सापडला होता. तो ताम्रपट इ.स. १०२६ मधील आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी त्याचे वाचन आणि संपादन केले आहे.
तसेच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९८२ मध्ये प्रकाशित केलेल्या शांताराम भालचंद्र देव यांच्या ‘महाराष्ट्र व गोवे शिलालेख-ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची’ या ग्रंथामध्ये या ताम्रपटाची माहिती देण्यात आली आहे.
हा ताम्रपट संस्कृत भाषेत आणि पश्चिम भारतातील अकराव्या शतकातील नागरी लिपीत लिहिलेला आहे. या ताम्रपटात ‘कार्तिक शुद्ध १५, रविवार, सूर्यग्रहण, क्षय संवत्सर, शके ९४८’ अशी तिथीची नोंद आहे. यात प्रारंभी गणेशाचे स्तवन केले आहे. नंतर शिलाहार वंशाची जीमूतवाहनापासून छित्तराजदेवापर्यंतची वंशावळ दिलेली आहे. राजाने पाराशर गोत्री ब्राह्मण नोडमैय्याचा पुत्र आमदेवैय्या याला स्थानक म्हणजेच आजचे ठाणे विभागातील षट्षष्टि म्हणजेच साष्टी जिल्ह्यातील वोडणिभट्ट येथील शेत दान दिले, हे नमूद करणे या दानपत्राचा मुख्य उद्देश होता. हे दानपत्र हंजमन म्हणजेच आजचे संजान शहरातील लोकांना उद्देशून काढलेले आहे. याचे लेखन राजाज्ञेवरून भांडागारसेन महाकवी नागलैय याचा पुतण्या भांडागारसेन जोगपैय याने केले आहे. या दानपत्रात ठाण्यानजीकच्या नोऊर म्हणजेच नाहूर, गोम्वणी म्हणजेच गोव्हन किंवा गव्हाण, तसेच गोरपवली या गावांचा उल्लेख आहे. शांताराम भालचंद्र देव यांच्या मते गोरपवली हे भांडुपचे जुने नाव असावे. तसेच, ‘गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी – ठाणा’ या ग्रंथातील ‘प्लेसेस ऑफ इंटरेस्ट’ या नोंदीतही असाच उल्लेख आढळतो.
इ.स. ११४२ मध्ये मुंबईतील माहिम येथे आपली राजधानी स्थापन करणारा मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब आणि त्यानंतर इ.स. १२९५ मध्ये सत्तेवर आलेला यादव राजा रामदेवराय यांचा पुत्र बिंबदेव यादव यांची हकीकत ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात दिली आहे. या ग्रंथातही भांडुपचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये विविध गावांचा ‘उपज’ म्हणजेच उत्पन्न नोंदवले आहे. त्यात ‘भांडुप-सरकार भात मुंडे ११५ राजभाग ९५ धर्म ६ सीळोतर १४ नगद दाम ११००’ असा उल्लेख आहे. या बखरीचे संपादन इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी केले असून त्यांनी याचा लेखनकाळ इ.स. १४४८ ते १५७८ असा निश्चित केला आहे. यावरून किमान पंधराव्या शतकात भांडुप हे याच नावाने ओळखले जात होते, हे स्पष्ट होते.
मुंबईच्या इतिहासात भांडुपला एक विशेष स्थान आहे. मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे धावली. या रेल्वेची संकल्पना लॉर्ड डलहौसी यांची होती. त्यांनी १८४३ मध्ये रेल्वे मार्गाच्या नियोजनासाठी येथे जॉर्ज टी. क्लार्क या अभियंत्यास पाठवले होते.
जॉर्ज टी. क्लार्क हे भांडुपमधील फ्रामजी कासवजी बानाजी यांच्या ‘इस्टेट’मध्ये म्हणजेच मालमत्तेत वास्तव्यास होते. तेथे राहूनच त्यांनी या रेल्वे मार्गाची योजना तयार केली. छित्तराजदेवाच्या या ताम्रपटात दान दिलेल्या जमिनीची जी सीमा नमूद केलेली आहे, त्यात उत्तर आणि पूर्व दिशेस ‘राजपथ’ असल्याचे म्हटले आहे. हा शिलाहारकाळातील महामार्ग होय. आजचा भांडुप ते ठाणे दरम्यानचा रेल्वे मार्ग बहुतांश याच राजपथावरून जातो, असे गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. शिलाहार आणि त्यांच्या आधी येथे राज्य करणारे कलचुरी तसेच त्यांचे मांडलिक त्रैकूटक यांच्या काळात मुंबईच्या व साष्टी बेटांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैव उपासना प्रचलित होती. या प्राचीन काळात भांडुपमध्ये तत्कालीन राजमार्गाजवळच भांडुपेश्वर महादेवाची स्थापना झाली असावी, असा निष्कर्ष अभ्यासकांनी नोंदवला आहे.
भांडुपमधील स्थानक मार्गावरील अत्यंत गजबजलेल्या परिसरात हे मंदिर स्थित आहे. अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिरास सध्याचे भव्य आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. दर्शनमंडप, सभामंडप, मुख्य गर्भगृह आणि अनेक उपगर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे.
मुख्य प्रवेशद्वारातून अर्धखुल्या स्वरूपाच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. या दर्शनमंडपात नक्षीदार चारही स्तंभ व भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. हे सर्व स्तंभ नक्षीदार महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. सर्व स्तंभांच्या वरच्या बाजूला गायन व वादन करणाऱ्या सुरसुंदरींची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. सभामंडपात एका उंच वज्रपीठावर संगमरवरी नंदी व कासव यांच्या मूर्ती आहेत. त्यापुढे अंतराळात दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणपती व मारुती यांच्या मूर्ती विराजमान आहेत. अंतराळात असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापासून काही पायऱ्या उतरून काहीसे खोल असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. संगमरवरी फरसबंदी असलेल्या गर्भगृहात मध्यभागी भांडुपेश्वर महादेवाची पिंड आहे. या पिंडीला चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढविलेले आहे. या पिंडीवर अभिषेकपात्र व छत्र आहे. पिंडीच्या मागील भिंतीत असलेल्या देवकोष्टकात पार्वती मातेची मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहाशिवाय या मंदिरात असलेल्या अन्य उपगर्भगृहांमध्ये सिद्धिविनायक, शीतला माता, संतोषी माता, बटुक भैरव, कालभैरव, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, राधा-कृष्ण, नवग्रहांच्या मूर्ती, श्रीदत्त, श्रीकृष्ण, देवी सरस्वती, महालक्ष्मी, वाघेश्वरी, कालीमाता, गायत्री माता, श्रीराम-लक्ष्मण-सीता आणि महादेव यांच्या मूर्ती विराजमान आहेत.
या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या काळात भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्र होय. या दिवशी येथे रुद्राभिषेक, विशेष पूजा, भजन-कीर्तन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या काळात मंदिर विद्युत दीपमाला आणि पुष्पमालांनी सजवले जाते. भांडुप आणि परिसरातील असंख्य भाविक या दिवशी येथे दर्शनासाठी रांग लावतात. याचबरोबर संपूर्ण श्रावण महिन्यात, विशेषतः प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि आरत्या असे कार्यक्रम आयोजित केले जातात. येथे प्रत्येक पंधरवड्याला येणाऱ्या प्रदोष तिथीला विशेष शिवपूजा व अभिषेक केला जातो. याचप्रमाणे येथे रामनवमी आणि गणेशोत्सव हे उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.