भैरवनाथ मंदिर,

किकली, ता. वाई, जि. सातारा

वाई तालुक्यातील चंदन आणि वंदन या दोन किल्ल्यांच्या मध्यभागी ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभलेल्या किकली या गावातील भैरवनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या इतर मंदिरांच्या तुलनेने या मंदिराची रचना, बांधकाम त्यावरील शिल्परचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. अश्विन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. येथील वैशिष्ट्य असे की गावच्या बारा बलुतेदारांकडून या यात्रेचे आयोजन करण्यात येते आणि त्यावेळी देवाच्या पालखीवर गुलाल, खोबरे पेढ्यांची उधळण होते. पेढ्यांची उधळण होणारी ही जिल्ह्यातील एकमेव यात्रा आहे.

किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. या मंदिराच्या स्थापत्य रचनेवरून ते १२व्या शतकातील यादावकाळातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या समोरील बाजूस उंच दगडी दीपमाळ त्याच्या शेजारीच गणेशवंदना स्तंभ आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराची रचना त्रिदल (तीन गर्भगृह असणारे) पद्धतीची आहे. यामध्ये कक्षासनयुक्त (भिंतीत बसण्यासाठी दगडी बाकांची रचना) मुखमंडप आहे. मुखमंडपाच्या डाव्या उजव्या बाजूच्या भिंतीवर असणाऱ्या विविध प्रकारच्या व्यालशिल्पांना मेष, शुक्र, अश्व, वृषभ, गर्दभ, सिंह, वराह व्याघ्र अशी मुखे आहेत. याशिवाय मैथुन शिल्पे विविध वाद्य वाजविणारे वादक अशी शिल्पे आहेत. मुखमंडपाच्या छतावर झुंबरे कोरलेली आहेत.

मुखमंडपातून सभामंडपाकडे जाताना प्रवेशद्वारावर द्वारपाल, सेवक इतर शिल्पे दिसतात. सभामंडपात वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असणारे पूर्णस्तंभ अर्धस्तंभ असून या स्तंभांच्या मध्यभागी असलेल्या आयताकृती सपाट पृष्ठभागावर रामायणातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. त्यामध्ये सुवर्णमृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा वध, वालीसुग्रीव युद्ध, श्रीरामांकडून झालेला वाली वध, श्रीरामहनुमान भेट, हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस, अशोकवनात राक्षसांचे सीतेला धमकावणे, कुंभकर्ण रावण वध यांचा समावेश आहेयाशिवाय या स्तंभांवर त्रिविक्रम, शिवतांडव, वामनावतार, हरिहर, नर्तकी दर्पणसुंदरी यांचीही शिल्पे आहेत. या सर्व वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी हा सभामंडप व्यापून गेला असून या सभामंडपातच अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे.

सभामंडपाच्या पुढे असलेल्या अंतराळात दोन देवड्या आहेत. त्यातील एकात शंकर पार्वती, तर दुसऱ्यात मच्छिंद्रनाथ यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. सभामंडपाच्या समोर, उजव्या डाव्या बाजूकडे तीन गर्भगृहे आहेत. त्यातील मुख्य दक्षिण गर्भगृहात शिवपिंडी असून उत्तरेकडील गर्भगृहात भैरवनाथांची मूर्ती आहे. सभामंडपातील नंदीचे मुख हे शिवलिंग असलेल्या गर्भगृहांकडे नसून ते भैरवनाथांच्या गर्भगृहाच्या दिशेने झुकलेले दिसते. भैरवनाथांच्या गर्भगृहासमोरील अंतराळ हा तुलनेने इतर दोन अंतराळापेक्षा रेखीव आहे.

मंदिराच्या मागच्या बाजूला एक लहानसे शिखर असून इतर पृष्ठभाग हा सपाट आहे. या कळसाकडील भागावरही विविध शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे असलेल्या लहान मंदिरात दत्ताची मूर्ती आहे. याशिवाय एक पडके मंदिर असून त्यात एक शिवपिंडी आहे. किकली गावात परिसरात सापडलेल्या अनेक विरगळींचे येथे जतन करण्यात आले आहे. असे सांगितले जाते की येथे तीन प्राचीन मंदिरांचा समूह होता१६४९ साली जेव्हा अफजल खानाला वाई प्रांताची सुभेदारी मिळाली होती, तेव्हा त्याने येथील दोन मंदिरे पाडून त्या दगडांचा वापर त्याच्या वाड्याच्या बांधकामासाठी केला होता.

अश्विन महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी भैरवनाथांची मोठी यात्रा भरते. अनेक वर्षांपासून या गावातील परिसरातील बारा बलुतेदारांकडून या यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी शनिवारी देवाची महापूजा होते. मध्यरात्री भैरवनाथ शेजारी असलेल्या जांब या गावातील चिलाई देवीची भेट हा महत्त्वाचा विधी असतो. या यात्रेसाठी हजारो भाविक येथे येतात. रविवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी दुपारी भैरवनाथांची मिरवणूक (छबिना) निघते. नवसाला पावणारा भैरवनाथ अशी या देवाची ख्याती असल्यामुळे नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून या छबिन्यात पेढे, खोबरे गुलालाची उधळण केली जाते. पेढ्यांची उधळण हा प्रकार अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाही.

या मंदिराबाबत असे सांगितले जाते की यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री या मंदिरात ३६५ दिवे लावले जातात. त्यावेळी गावातील परिट समाजातील एका व्यक्तीच्या अंगात येते आणि ती व्यक्ती त्या दिव्यांवरून उडी मारून भैरवनाथांच्या गाभाऱ्यासमोर असलेल्या दगडी स्तंभाला डोक्याने धडक मारते. हा प्रकार शेकडो भाविकांसमोर तीन वेळा केला जातो. तरीही त्या व्यक्तीला काही दुखापत होत नाही.

या मंदिराची रचना, पुरातत्त्वीय ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन जून २००० मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

उपयुक्त माहिती:

  • वाईपासून २० किमी, तर साताऱ्यापासून २५ किमी अंतरावर
  • वाई येथून किकलीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home