भैरवनाथ मंदिर

जरुड, ता. बीड, जि. बीड

महादेवाचे उग्र रूप म्हणून भैरवनाथाची सर्वत्र ओळख आहे. काही ग्रंथांमध्ये भैरव हे महादेवाचे गण असल्याचे नमूद केलेले आढळते. अष्टभैरवांचे प्रमुख काळभैरव तर चौसष्ठ भैरवांचे अधिपती महाकाळ म्हणून ओळखले जातात. शैव पंथात भैरव पूजनाला विशेष महत्त्व असल्याने ते तंत्रविद्या व शक्तीचे स्रोत मानले जातात. भैरवाच्या पूजनाने शत्रूचा नाश होतो व मनुष्य चिंतामुक्त होतो, अशी लोकधारणा आहे. महाराष्ट्रात गावोगावी भैरवनाथांची मंदिरे आढळतात; ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील जरुड गावातील प्राचीन व प्रसिद्ध मंदिराचा समावेश होतो. येथील जागृत भैरवनाथ नवसाला पावतो, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे.

‘सिद्धांतबोध’ या ग्रंथामध्ये भैरवनाथांची आख्यायिका वर्णन केली आहे. हा ग्रंथ नगर जिल्ह्यातील पेडगाव येथे जन्मलेले मुस्लिम संतकवी शहामुनी यांनी लिहिलेला आहे. पेशवाईच्या काळात इ.स. १७७८ मध्ये या ग्रंथाची रचना करण्यात आली. या ग्रंथाप्रमाणेच ‘शिवलीलामृता’चे कर्ते थोर ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर यांनीही भैरवनाथांची कथा मांडली आहे. त्यानुसार, प्राचीन काळी काळासूर नावाच्या एका दैत्याने दक्षिण भागातील ऋषी-मुनींचा मोठा छळ चालवला होता. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते शंकराकडे गेले. त्यांची याचना ऐकून शंकराने आपल्या जटा जमिनीवर जोराने आपटल्या. त्यातून एका सिद्ध पुरुषाची निर्मिती केली. त्याचेच नाव भैरवनाथ. शंकराच्या सांगण्यावरून त्याने पाताळलोकातील पाच कुंडांतील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त केली व त्या योगे काळासुराचा वध केला.

जरुड येथील हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन शिलालेख आहे, परंतु तो अस्पष्ट असल्यामुळे त्याचे वाचन होऊ शकलेले नाही. मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम, स्तंभावरील शिल्पशैली व कलाकुसर पाहता हे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

बीड-परळी महामार्गालगत उजवीकडे मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. येथून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर जरुड गावात भैरवनाथाचे मंदिर स्थित आहे. मंदिराला लाभलेल्या भक्कम तटबंदीमध्ये मुख्य प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे तिथे तीन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेकरी रेखाटलेले आहेत आणि वरील बाजूस अश्वमुख शिल्पे व चक्रनक्षी दिसते. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. मंदिराच्या प्रांगणात सुमारे सहा फूट उंच चौथऱ्यावर गोलाकार व वर निमुळती होत गेलेली दीपमाळ आहे. दीपमाळेच्या बाजूला सुमारे आठ फूट उंच चौथऱ्यावर आठ नक्षीदार स्तंभ असलेला रंगमंडप आहे. प्राचीन काळी या रंगमंडपात देवाच्या रंगभोगासाठी नृत्य, नाटिका, गायन, वादन आदी कार्यक्रम आयोजित केले जात असत. मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन हौद आहे. येथे शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनाला जाण्याची जुनी प्रथा आहे. मंदिरासमोर असलेल्या नंदीमंडपात वज्रपीठावर नंदीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे.

सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. यापैकी काही स्तंभांवर वीरगळ व सती शिल्पे आहेत, तर काहींवर इतर देवी-देवतांची शिल्पे व नक्षी आहे. वीरगळ व सतीशिल्पे कोरलेले स्तंभ हे स्थापत्यदृष्ट्या दुर्मिळ व अनोखे समजले जातात. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीत असलेल्या देवकोष्टकांत द्वारपाल शिल्पे आहेत.

पुढे मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. मुख्य सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत, मात्र मुख्य सभामंडपाच्या जुन्या रचनेत काही प्रमाणात फेरफार करण्यात आले असल्याचे दिसून येते. येथील स्तंभाची रचना सभामंडपातील स्तंभांसारखी असली तरीही येथील हस्तांवर भारवाहक यक्ष शिल्पे कोरलेली आहेत. हस्तांवरील तुळईवर कीर्तीमुख व विविध नक्षी आणि वितानावर चक्रनक्षी आहे. मुख्य सभामंडप डाव्या बाजूने खुला आहे. मुख्य सभामंडपाच्या उजव्या बाजूच्या गर्भगृहात वज्रपीठावर भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या सिंहासनारूढ मूर्ती आहेत. मूर्तींच्या बाजूला पितळी अश्व शिल्प आहे. मूर्तींच्या मागील प्रभावळीत पंचफणी नाग, कीर्तीमुख व पानाफुलांची नक्षी आहे. वज्रपीठासमोर दोन्ही बाजूला सुमारे सहा फूट उंचीच्या रक्षक मूर्ती आहेत.

मुख्य सभामंडपाच्या पुढे अरुंद अंतराळ आहे. अंतराळात डाव्या व उजव्या भिंतीत देवकोष्टके आहेत. त्यांत गणपती व मारुतीच्या मूर्ती आहेत. त्यापुढे गर्भगृहाचे पंचशाखीय प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका, गंगा, यमुना आदी शिल्पे आणि वरील बाजूस पर्णशाखा, पुष्पशाखा, नरशाखा, गजशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प व ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी आहे. तोरणात शिखरशिल्पे आहेत. मंडारकावर चंद्रशिला व कीर्तीमुख आहे. अंतराळापेक्षा गर्भगृह खोल असल्यामुळे त्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे.

मंदिराच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या बाजूला इतर देवी-देवतांची लहान मंदिरे, काही प्राचीन शिल्पे व शिवपिंडी आहेत. प्रांगणात असलेल्या प्राचीन शिलालेखाच्या शीर्षभागी सूर्य व चंद्र कोरलेले आहेत. अभ्यासकांच्या मते हे दानपत्र असावे. मंदिराच्या तटबंदीत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला रथकक्ष आहे, ज्यात उत्सवकाळात वापरला जाणारा लाकडी रथ ठेवला जातो.

मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला काळभैरव जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवाची रथावरून मिरवणूक निघते. रथ हार-फुलांनी सजवून देवाच्या उत्सवमूर्ती रथात बसवून ग्राम प्रदक्षिणा केली जाते. यावेळी परिसरातील अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी व रथोत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय मंदिरात महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमा, दसरा, दिवाळी, शारदीय नवरात्र, चैत्र पाडवा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. सोमवार, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळते.

उपयुक्त माहिती:

  • बीड शहरापासून १३ किमी अंतरावर
  • बीड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
  • संपर्क : बालासाहेब काकडे, अध्यक्ष, मो. ९६०४८९२२३४, श्रीकांतराव काकडे, सचिव, मो. ९४२१३४०६०३

भैरवनाथ मंदिर

जारुद, ताल. बीड, जिला. बीड

Back To Home