भाई महाराज समाधी मंदिर

वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर

मानवी जीवनाचे गुढ आकलन व तत्वज्ञान हे प्राचीन परंपरेने लाभलेले आहे. तत्वज्ञानाचे अध्यात्म शास्त्र ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे. अनेक प्रकारची संकटे आली तरी अध्यात्म परंपरेचा थोर वारसा अद्यापही जतन झाला आहे तो योगी, ऋषी व संत यांच्यामुळेच. भाईनाथ महाराज कारखानीस हे असेच एक सिद्धयोगी व संतपुरुष होते. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील त्यांचे समाधी मंदिर हे त्यांच्या हजारो शिष्यांचे श्रद्धास्थान आहे. कार्तिक वद्य षष्ठीला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेळापूरमध्ये हजारो भाविकांचा मेळा भरतो.
आनंदमूर्ती साधक संजिवनी या ग्रंथातील माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील महाड हे भाई महाराजांचे जन्मगाव. त्र्यंबक सीताराम कारखानीस व लक्ष्मीबाई यांच्या पोटी २३ नोव्हेंबर १९०५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. वडिलांची इच्छा त्यांनी डॉक्टर व्हावे ही होती. म्हणून त्यांना त्यावेळच्या एलसीपीएस अभ्यासक्रमासाठी मुंबईत पाठविले गेले. तेथे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर ते पुण्यात परतले. त्यांनी घरीच वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. भाईंच्या आई व मावशी वारकरी होत्या. त्यामुळे त्या दररोज प्रवचन, किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण ऐकण्यासाठी तेथील केशवराव महाराज देशमुख यांच्याकडे जात असत. त्यांच्यासोबत भाई पण जात असत. केशवराव महाराज भाईंकडे पाहून आई व मावशीला म्हणत असत की या मुलाचे लक्ष प्रपंचाकडे नाही.
एकदा भाईनी केशवराव महाराज यांच्यासोबत पंढरपूरची वारी केली. ते ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, अमृतानुभव हे ग्रंथ वाचत असत. त्यानंतर भाईंनी सैन्यात वैद्यकिय अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. त्यानिमित्ताने ते नाशिक येथील देवळाली कॅम्प परिसरात राहत होते. नाशिकमध्ये त्यांचे मित्र डॉ. गोडबोले राहत होते. त्यांनी गजानन महाराज गुप्ते यांचा अनुग्रह घेतला होता. गजानन महाराज हे चौरंगी नाथाचे अवतार समजले जात. त्यामुळे त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा, असे भाईंना वाटत होते. डॉ. गोडबोले भाईंना घेऊन गजानन महाराजांकडे गेले. भाईंनी महाराजांकडे अध्यात्मिक मार्गदर्शन करण्याची विनंती केली. महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला व त्यांना दिक्षा दिली. तो दिवस कार्तिक शुद्ध पंचमी सन १९४४ हा होता. त्या दिवसापासून त्यांचे जप, तप वाढू लागले. त्यानंतर १९४५ मध्ये भाई सैन्याची नोकरी सोडून पुण्यात आले व घरीच वैद्यकीय व्यवसाय करू लागले.
ज्यावेळी इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा सरकारला ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करायच्या होत्या. त्यावेळी भाईंकडे विचारणा झाल्यावर त्यांनी वेळापूर मागून घेतले. भाई सप्टेंबर १९४९ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी वेळापूर येथे आले. भाई अनेकदा वेळापूर शेजारच्या गावांमध्ये औषधे देण्यास जात असत. त्यामुळे त्यांच्या ओळखी वाढल्या होत्या. या काळात भाई अधूनमधून पंढरपूर येथे जात असत. तेथे ते धुंडामहाराज देगलुरकर, मामासाहेब दांडेकर, मामांचे गुरू बंधू बंकटस्वामी, रंगनाथ महाराज परभणीकर यांची प्रवचने किर्तने ऐकण्यासाठी जात असत. वेळापूर हे आळंदी-पंढरपूर मार्गावर असल्याने एक दिवस वारीचा मुक्काम येथे असे.
रुग्णांची तपासणी केल्यानंतर एखाद्या रुग्णाकडे पैसे नसतील तर तो भाईंना धान्य आणून देत असे. वर्षातील एक महिन्याचा पगार व रुग्णांकडून शुल्क म्हणून आलेले धान्य ते संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीच्या वेळी खर्च करीत असत. भाईंनी दर महिन्याच्या वद्य एकादशीस ज्ञानेश्वरी पारायण सुरू केले. गावातील लोकांना ते एक तास ज्ञानेश्वरी वाचावयास सांगत. १९६५ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन भाई नाशिक येथे एका खाजगी संस्थेत रुजू झाले. परंतु त्यांचे तेथे मन रमत नव्हते. काही दिवसांनी ते नाशिक सोडून पुन्हा वेळापूर येथे आले. देशपांडे मळ्यात भाई राहत होते ती झोपडी गवताची होती. त्या खोलीस भाईनी ‘श्रीधरकुटी’ असे नाव दिले.
श्रीधरकुटीत दर गुरूवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत भाई ज्ञानेश्वरी व गाथेवर प्रवचन करीत असत. आपल्याकडे येणाऱ्या साधकांमध्ये त्यांनी गरीब श्रीमंत हा भेद कधी केला नाही. भाईंच्या वयाच्या ८५ व्या वर्षी १९९१ साली त्यांची रौद्रीशांती केली. या शांतीस गगनगिरी महाराजांना निमंत्रित केले गेले होते. परंतु ते कार्यक्रमाच्या अगोदरच आठ दिवस निमंत्रण द्यायला गेलेल्या साधकाबरोबर रात्री दोन वाजता झोपडीवर आले आणि त्यांनी भाईचे अभिष्ठचिंतन केले. गगनगिरी महाराजांकडे वरचेवर भाई जात असत. त्यांच्यासोबत त्यांचे साधक ही असत. तेव्हा गगनगिरी महाराज म्हणत असत देशपांडेच्या मळ्यात ज्ञान राहते. तुम्ही त्यांना सांभाळा.
वयोमानानुसार भाईंना उन्हाळ्याचा त्रास जाणवत असे. म्हणून सन १९९३ पासून म्हणजे वयाच्या ८८ व्या वर्षापासून भाई दरवर्षी दोन चार महिने पुण्याजवळ निगडीला भाच्याकडे जाऊन राहू लागले. सप्टेंबर १९९७ मध्ये ते आजारी पडले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना वेळापूर येथे आणण्यात आले. जवळजवळ एक महिना भाई वाचा गेलेल्या अवस्थेतच होते. त्यांना बोलता येत नव्हते. ते सर्व खुणेनेच सांगत. एकदा झोपेत भाईंना नागाचा दृष्टांत झाला होता. तेव्हा ते साधकाला म्हणाले की माझ्यानंतर माझ्या समाधीवर नागाची प्रतिमा काढा. कार्तिक वद्य षष्ठी २० नोव्हेंबर १९९७ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यापुढील सर्व कार्ये श्रीधर कुटीत करण्यात आली. त्यांच्या निधनामुळे वेळापूरमधून एक चालता बोलता अध्यात्माचा ग्रंथ लोप पावला होता.
त्यांच्या निधनानंतर वेळापूर येथील शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांनी साधकांच्या सहकार्यातून येथे भाईनाथ महाराजांचे समाधी मंदिर बांधले. वेळापूर गावाच्या सीमेवर हे मंदिर आहे. प्रशस्त प्रांगणात एका उंच अधिष्ठानावर मंदिरासमोर सभामंडप आहे. चार पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने व उत्सवाच्या वेळी वापरली जाणारी पालखी आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस समाधी मंदिर आहे. उंच अधिष्ठानावर प्रदक्षिणा मार्ग सोडून हे षटकोनी आकाराचे मंदिर आहे. समाधी मंदिराच्या मध्यभागी भाईनाथ महाराजांचे समाधीस्थान आहे. त्यात काळ्या पाषाणातील त्यांच्या पादुका व वर चांदीचे छत्र आहे. या समाधीस्थानाच्या मागील भिंतीला लागून असलेल्या वज्रपिठावर महाराजांची मोठी प्रतिमा आहे. खालून षटकोनी व वरील भागात गोलाकार असणाऱ्या या मंदिराच्या शिखरावर सर्व बाजूंनी देवकोष्टके व त्यात संतांच्या मूर्ती आहेत.
या मंदिराच्या शेजारी भाईनाथ महाराजांचे श्रीधरकुटी हे निवासस्थान आहे. याच ठिकाणी महाराजांनी १९६९ ते १९९७ या काळात वास्तव्य केले होते. दरवर्षी कार्तिक वद्य एकादशीला येथे महाराजांचा जयंती उत्सव व कार्तिक वद्य षष्ठीला पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून त्यांचे अनुयायी येथे उपस्थित असतात.

उपयुक्त माहिती

  • माळशिरस येथून २१ किमी, तर सोलापूरपासून १०६ किमी अंतरावर
  • माळशिरस येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : शिवप्रसाद देशपांडे, मो. ७०५७५५५९४२
Back To Home