कोकणातील रत्नागिरी शहरानजीक असलेला रत्नदुर्ग किल्ला हा इतिहासप्रेमी व पर्यटकांचे विशेष आवडीचे ठिकाण आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, १२०५ मध्ये बांधलेला हा प्राचीन किल्ला १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या किल्ल्याला येथील प्राचीन भगवती देवीच्या मंदिरामुळे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रत्नासुर नावाच्या राक्षसाचा वध करणारी येथील भगवती देवी ही कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण असल्याची मान्यता आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की कोल्हासुर, करवीर व रत्नासुर या नावाचे तीन राक्षस मातले होते. त्यांचा संहार करण्याची जबाबदारी अंबादेवीवर होती. तिने कोल्हासुर व त्याचा मुलगा करवीरचा वध केल्यानंतर तेथे कोल्हापूर शहर वसले. रत्नासुर हा महापराक्रमी होता. त्याला मारण्यासाठी अंबादेवीने महादेवाची आराधना केली. रत्नासुराला मारणे अंबादेवीला कठीण होते म्हणून महादेवाने तिच्या मदतीसाठी देवी टेंबलाई व देवी भगवती या दोन बहिणी निर्माण केल्या. या तिन्ही देवींनी रत्नासुराला कोल्हापूर येथील जोतिबाच्या खिंडीत गाठले व देवी भगवतीने सुदर्शन चक्राने त्याचे मुंडके उडवले. रत्नासुराचा वध केल्यानंतर अंबादेवीने देवी भगवतीला रत्नेश्वरी हे नाव दिले व कोकणात जाऊन वास्तव्य करण्यास सांगितले. त्यानुसार रत्नेश्वरी भगवती देवी आता जेथे रत्नदुर्गा किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी आली. त्यानंतर ती स्वयंभू रूपाने रत्नदुर्ग किल्ल्यावर प्रकट झाली. रत्नेश्वरी भगवती देवीच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याचे नामकरण रत्नदुर्ग, तर शहराचे नाव रत्नागिरी असे झाले.
रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहराच्या पश्चिमेकडे तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. (पूर्वी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला होता. इंग्रजांनी एका बाजूला भराव टाकून त्यात जाण्यासाठी मार्ग बनविला होता.) १२० एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालेप्रमाणे आहे. शिलाहार कारकिर्दीत गोव्याचा राजा विहय मार्क देव याचा पुत्र राजा भोज याने तो बांधल्याचे बोलले जाते. मात्र त्यापूर्वीही हा किल्ला अस्तित्वात होता, असेही काहींचे म्हणणे आहे. या भव्य रत्नदुर्ग किल्ल्याचा भाग असलेले येथील भगवती देवीचे मंदिर राज्यातील प्राचीन मंदिरांपैकी महत्त्वाचे व प्रसिद्ध मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील हनुमान मंदिरापासून काही अंतरावर हे सुबक बांधणीचे मंदिर आहे. मंदिराची वेळोवेळी पुनर्बांधणी करण्यात आली. कान्होजी आंग्रे यांचे वडील शेखोजी आंग्रे यांनी भगवती देवीसाठी हेमाडपंती घुमट बांधल्याची नोंद आहे. छत्रपती शाहू महाराजांनी बावडेकर संस्थानचे रामचंद्रपंत नाईक परांजपे यांना या मंदिरासाठी आर्थिक मदत दिली होती. रत्नागिरीतील दानशूर व्यापारी भागोजी कीर यांनी १९४१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही वर्षांपूर्वी मंदिर संस्थानतर्फे केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
गर्भगृहात देवी भगवतीची तीन फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. तिच्या हातात शंख, चक्र, ढाल व तलवार आहे. या देवीवर नवरात्रोत्सवात व होळीच्या वेळी सोन्या–चांदीची रूपे आणि दागिने चढवले जातात. देवीचा चांदीचा मुखवटा हा ६०० वर्षांपूर्वीचा आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या चांदीच्या भव्य सिंहासनावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. मंदिराचे शिखर जमिनीपासून सुमारे ७० फूट उंचीचे आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. असे सांगितले जाते की ही देवी पालखीत बसत नाही. त्यामुळे देवीच्या नावाने एका मुलाला सजविले जाते. देवीचा भाऊ भैरव व बहीण जोगेश्वरी, नवलाई–पावणाई यांची मंदिरे रत्नागिरी शहरात आहेत. त्यांना भेटण्यासाठी देवी वर्षातून एकदा किल्ल्याखाली उतरते.
मुख्य मंदिरासमोर असलेल्या दीपमाळेजवळ मराठा आरमाराचे सेनापती कान्होजी आंग्रे यांचा अर्धपुतळा आहे. दोन सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. पहिला सभामंडप हा अर्धमंडप प्रकारातील असून त्यामध्ये भाविकांना बसण्यासाठी बाजूने दगडी बाकांची रचना आहे. दुसरा सभामंडप तीन फूट उंचीवर आहे. प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलेल्या दरवाजाच्या वरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. या सभामंडपात आठ दगडी स्तंभ असून त्यावर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. सभामंडपात डावीकडे श्रीदेव चव्हाटा आहे. या चव्हाट्यावर पूर्वीपासून बळी देण्याची प्रथा आहे. गर्भगृहासमोर सभामंडपात देवीचे वाहन असलेल्या वाघाची धातूची मूर्ती आहे.
मंदिर परिसरात गणपती, खंडोबा, वेताळ, होळदेव यांची मंदिरे आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी भागोजी कीर यांनी बांधलेले भागेश्वर मंदिरही आहे. समुद्राने वेढलेल्या या किल्ल्यात मंदिराच्या डाव्या बाजूला गोड्या पाण्याची एक विहीरही आहे. किल्ल्यावरील प्रवेशाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सात अशी आहे. याच वेळेत भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येते. सायंकाळी सातच्या सुमारास येथे तीन वेळा शिट्ट्या वाजविल्या जातात. त्यानंतर किल्ल्याचे प्रवेशदार बंद केले जाते.