
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा हा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न मानला जातो. येथील विविध प्राचीन मंदिरात असणाऱ्या मूर्तींमध्ये वैविध्य पाहायला मिळते. भद्रावती शहरात असलेले भद्रनाग मंदिर हे सुद्धा असेच एक वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान आहे. हे मंदिर भद्रावती तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. १००० वर्षांहून प्राचीन असणारे शेषनागाचे विदर्भातील हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. अशी नागमूर्ती राज्यात इतरत्र नाही, असा अभ्यासकांचा दावा आहे.
विदर्भाची भूमी ही नागभूमी म्हणून ओळखली जाते. येथील भद्रनाग मंदिर हे नागपूजेचे प्रतीक मानले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये भांदक नगरी असा उल्लेख असलेले हे शहर येथील प्राचीन हेमाडपंती भद्रनाग मंदिरामुळे प्रसिद्ध झाले. या मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखात ११४६ साली येथील सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्यात आला, असा उल्लेख आहे. यावरून हे मंदिर त्यापूर्वीचे असावे. हा शिलालेख संस्कृत, मोडी आणि मराठी भाषेत आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते ती अशी की पूर्वीच्या काळी एक स्त्री येथील नागदेवतेला नवस बोलली की मला मूल झाले तर मी माझे दूध नागदेवाला पाजीन. त्याप्रमाणे काही दिवसांनी तिला मुलगा झाला. बोललेल्या नवसाप्रमाणे ती नागाला दूध पाजण्यासाठीही आली; परंतु नागाचे आक्राळविक्राळ रूप पाहून ती घाबरली व दूध न पाजताच तेथून निघून गेली. नवसफेड न केल्यामुळे काही दिवसांनी तिच्या मुलाचा मृत्यू झाला.
एका आख्यायिकेनुसार, या परिसरात ७ नाग असून ते एकमेकांचे भाऊ आहेत. त्या सर्वांचे वास्तव्य याच परिसरात आहे. त्यापैकी एक भद्रनाग, दुसरा नागसेन, तिसरा दुधाळा तलावावर असलेला नाग, चौथा मोबाळा गावचा चिंतामणी नाग, पाचवा बारी सोसायटीजवळचा नाग, सहावा निलांबरी मंदिरातला नाग आणि सातवा भटाळा येथील नाग असे सांगितले जाते. हे सर्व नागबंधू एकमेकांना भेटत असतात, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. भद्रनाग मंदिरातील नागाच्या मूर्तीखाली नागराजस्वामींची समाधी आहे. असे सांगितले जाते की या समाधीच्यावर नंतर नागाची प्रतिमा बसविण्यात आली असावी; परंतु या नागराज स्वामींबद्दल माहिती उपलब्ध नाही.
भद्रनाग मंदिराच्या तटभिंतीतील कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. हेमाडपंती स्थापत्य रचनेच्या या मंदिराला शिखर नसून त्याजागी उतरत्या छताची रचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व गणेशाच्या प्राचीन मूर्ती आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरात एकूण ३६ दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर कुंभांची शिल्पे अंकित आहेत. सभामंडपात असलेली शेषशाही विष्णू मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. विष्णूंच्या डोक्यावर शेषाचा फणा, तर पायाजवळ लक्ष्मी आहे. याशिवाय या अखंड पाषाणात यक्ष, योगिनी आणि त्रिमूर्तीच्या रूपात असलेले ब्रह्मा–विष्णू–महेश यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. याशिवाय येथे श्रीगणेशाची एक प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील भद्रनागाची ९ फण्यांची व २.५ फूट उंचीची मूर्ती आहे. भद्रनाग मूर्तीच्या मागील बाजूला सुंदर सजावट असून त्यावर महादेवांचे पितळेत घडविलेले शिल्प आहे.
मंदिराच्या आवारात खडकात खोदलेली एक प्राचीन विहीर आहे. त्यात उतरायला पायऱ्या आहेत. भद्रानागाचे या विहिरीत गुप्त रूपाने वास्तव्य असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे आलेले भाविक या विहिरीचेही आवर्जून दर्शन घेतात. सकाळी ५.३० वाजता मंदिर उघडल्यावर येथे अभिषेक, पूजा आणि महाआरती होते. त्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून भाविकांना येथे दर्शन घेता येते. विदर्भासह मध्य प्रदेश आणि तेलंगणा येथून हजारो भाविक भद्रनागाच्या दर्शनाला येत असतात. सोमवारी आणि बुधवारी येथे जास्त गर्दी असते. याशिवाय नागपंचमी आणि महाशिवरात्रीला येथे उत्सव असतो. महाशिवरात्र उत्सव येथे आठवडाभर साजरा केला जातो.
भद्रनाग हे जागृत देवस्थान असल्यामुळे येथे नवस बोलण्याची पद्धत आहे. त्यानुसार नवस पूर्ण झाला की भाविक येथे येऊन भद्रनागाला शिऱ्याचा प्रसाद व स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण करतात. दररोज सकाळी ७ व रात्री ७ वाजता भद्रनागाची आरती होते. या आरतीसाठी खास करून अनेक भाविक उपस्थित असतात. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना मंदिरातील भद्रनागाचे दर्शन घेता येते. येथील नियमांनुसार गर्भवती महिलांना या मंदिरात प्रवेशास मनाई आहे.