महाराष्ट्रातील धार्मिक, तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. वेरूळ लेण्यांपासून जवळ असलेल्या या मंदिरातील मारुतीची मूर्ती निद्रिस्त स्थितीत आहे. देशभरात प्रयागराज, खुलताबाद व मध्य प्रदेशातील जावसावली या तीन ठिकाणीच निद्रिस्त मारुतीच्या मूर्ती आहेत. नवसाला पावणारे दैवत, अशी खुलताबाद येथील भद्रा मारुतीची ख्याती आहे. हनुमान जयंती, रामनवमी तसेच श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
मंदिराची आख्यायिका अशी की खुलताबादचे मूळ नाव भद्रावती असे होते. रत्नपूर म्हणूनही ते ओळखले जात असे. येथे भद्रसेन नावाचा रामभक्त राजा होता. तो सदैव रामस्तुतीपर गीत गात असे. एके दिवशी मारुती आकाशातून उड्डाण करत असताना त्याच्या कानावर भद्रसेन गात असलेली रामस्तुतीपर गीते पडली. ती ऐकतच तो येथे उतरला. ही गीते ऐकत असताना मंत्रमुग्ध होऊन त्यांनी योगमुद्रा धारण केली. यालाच ‘भावसमाधी’ असेही म्हणतात. भद्रसेनने डोळे उघडून पाहिले असता त्याला भावसमाधी घेतलेल्या मारुतीचे दर्शन झाले. भद्रसेनने येथे आपण कायमस्वरूपी वास्तव्य करून भक्तांना आशीर्वाद द्यावेत, अशी मारुतीला विनंती केली. मारुतीने ती मान्य केली. तेव्हापासून भद्र म्हणजेच शांत मुद्रेत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मारुतीने येथे कायमचे वास्तव्य केले.
जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांपासून चार किमी अंतरावर भद्रा मारुती मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असले तरी ते केव्हा उभारण्यात आले, याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. मंदिर परिसरात फुले, प्रसाद तसेच इतर पूजा साहित्य विक्रीची शेकडो दुकाने आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला नव्याने उभारलेली सभामंडपाची प्रशस्त इमारत दिसते. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत ८५ फूट रुंद व २११ फूट लांब असा हा भव्य सभामंडप बांधण्यात आला आहे.
भद्रा मारुती मंदिराला पांढऱ्या रंगाची दोन शिखरे असून त्यावर आकर्षक कलाकुसर आहे. शिखरावरील देवळ्यांमध्ये विविध देव–देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडप आणि मधोमध असलेले गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला हे स्वरूप आलेले आहे. प्रशस्त सभामंडपाच्या छतावर तसेच छताच्या कमानींवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. सभामंडपातील भिंतींवर हनुमान चालिसा आणि हनुमानस्तोत्र लिहिलेली आहेत. याशिवाय भिंतींवर काही संतांच्याही प्रतिमा आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहाच्या भोवताली दर्शन रांगेसाठी रेलिंग लावण्यात आलेले आहेत. येथे पुरुषांना दर्शनासाठी रांग लावावी लागते, तर महिलांना थेट प्रवेश दिला जातो. गर्भगृहात प्रवेशासाठी मात्र पुरुषांना सोवळे नेसूनच जावे लागते. गर्भगृहाजवळील कठड्यावर दर्शनासाठी मारुतीच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. महिला येथूनच दर्शन घेऊ शकतात. गर्भगृहात निद्रावस्थेतील मारुतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचा मुकुट असून बाजूला चांदीची गदा ठेवण्यात आलेली आहे.
हनुमान जयंती हा येथील मोठा उत्सव. या दिवशी येथे मोठी जत्रा भरते. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येपासून हजारो भाविक येथे दर्शनासाठी रांगा लावतात. छत्रपती संभाजीनगर तसेच आसपासच्या परिसरातून शेकडो भाविक येथे दर्शनासाठी पायी येतात. त्यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर–खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी चहा, फराळाची व्यवस्था करण्यात येते. हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भद्रा मारुतीच्या मूर्तीभोवती, तसेच गर्भगृहात आकर्षक सजावट करण्यात येते. या दिवशी सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ होतो. सूर्योदयाला मारुतीचा जन्म झाल्यानंतर कीर्तन संपते आणि आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे भाविकांसाठी फराळ, जेवणाची व्यवस्था करण्यात येते. येथे येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधाही पुरवल्या जातात. रामनवमीलाही शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
आषाढी वारीसाठी या मंदिरातून भद्रा मारुतीची दिंडी पंढरपूरला जाते. दिंडी निघण्यापूर्वी मारुतीची आरती होते. या दिंडी सोहळ्यात परिसरातील हजारो वारकरी व भाविक सहभागी होतात. टाळ–मृदुंगाच्या गजरात तसेच ज्ञानोबा–तुकारामाच्या जयघोषात येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. १७ दिवसांचा पायी प्रवास करत ही दिंडी पंढरपूरला पोचते. मारुतीला महादेवाचे रूप मानले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या महिन्यात दरदिवशी भद्रा मारुतीच्या मूर्तीला आकर्षक शृंगार केला जातो. श्रावणातील शनिवारी तसेच सोमवारी येथे भाविकांची गर्दी असते.
मंदिराच्या मागील बाजूस शनिदेवाचे स्थान आहे. काळ्या संगमरवरी चौथऱ्यावर विराजमान असलेली शनिदेवाची सुबक मूर्ती कावळ्यावर आरूढ आहे. महिलांना या मूर्तीजवळ जाण्यास प्रतिबंध आहे. मूर्तीच्या मागील बाजूस शिवपिंडी आहे. येथून काही अंतरावर एक कुंड आहे. त्याला भद्राकुंड असे म्हणतात. भद्रा मारुती संस्थानतर्फे परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. संस्थानाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून भक्तांसाठी डिजिटल हनुमान ग्रंथही उपलब्ध करून दिला आहे. येथे भक्त निवास व प्रसादालय असून सकाळी ११ ते २ व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत नाममात्र शुल्कात येथे भोजनाची व्यवस्था होते.