सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद येथे पांडवकालीन बेंबळेश्वर महादेव मंदिर विराजमान आहे. या मंदिराला लागूनच पंडूपुत्र अर्जुनाने बाण मारून उत्पन्न केलेले कुंडही आहे. या प्राचीन मंदिरातील जागृत शिवलिंगावर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांची श्रद्धा असल्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. महाशिवरात्रीनिमित्त हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो. श्रावण महिन्यात पयोष्णी (पूर्णा) नदीच्या पवित्र जलाने येथील शिवलिंगावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषात जलाभिषेक करण्यात येतो.
या प्राचीन मंदिराचे अधिकृत नाव नारायणेश्वर असले, तरी जनमानसात मात्र हे स्थान बेंबळेश्वर या विशेष नावाने प्रसिद्ध आहे. या आगळ्यावेगळ्या नामाभिधानामागचे कारण असे सांगितले जाते की येथील शिवलिंग जमिनीच्या सर्वसाधारण पातळीवर नसून एका विशिष्ट खोलगट भागात आहे. या शिवलिंगाची शाळुंका खोल आहे आणि ती एखाद्या वर्तुळाकार विवरासारखी भासते. मानवी शरीराच्या रचनेतील नाभीचा किंवा बेंबीचा भाग जसा मध्यभागी आणि खोल असतो, तशीच रचना या शिवलिंगाच्या स्थानाची आहे.
या ‘बेंबी’सारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळेच स्थानिक बोलीभाषेत या मंदिराला ‘बेंबळेश्वर’ असे संबोधले जाऊ लागले. काळाच्या ओघात हेच नाव अधिक रूढ झाले आणि आज संपूर्ण जिल्ह्यात ते बेंबळेश्वर या नावानेच प्रसिद्ध आहे.
‘जळगाव’ या शब्दाचा अर्थ पाण्याचे गाव असा होतो. शहराच्या आसपास असलेल्या जलस्रोतांमुळे हे नाव रूढ झाले. या गावाला लागूनच जामोद आहे. मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज महल ही लष्करी मोहिमांसह प्रवास करत असताना तिला गरोदरपणाचा त्रास होऊ लागला. जळगाव जामोद नजीकच्या बुरहानपूर येथे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुघलांनी या गावाला ‘जा-ए-मौत’ असे नाव दिले. पर्शियन भाषेत त्याचा अर्थ ‘मृत्यूचे ठिकाण’ असा होता. स्थानिक त्याला ‘जा-मऊत’, ‘जा-मोद’ असे म्हणू लागले. पुढे जामोद हे नाव रूढ झाले. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असल्याने जळगाव जामोदला सातपुडा नगरी असेही संबोधतात. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी एक असलेल्या बेंबळेश्वर महादेवाच्या मंदिराची उभारणी यादव राजवटीत झाल्याचे सांगितले जाते.
या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. अज्ञातवासादरम्यान पांडव या परिसरात आले होते. त्यावेळी पाण्याच्या शोधार्थ अर्जुनाने या मंदिराच्या दक्षिण दिशेला बाण मारून कुंड तयार केल्याची आख्यायिका आहे. कालौघात या शिवमंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आला. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारामुळे या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून आत प्रांगणात प्रवेश होतो. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात ओवरीसदृश खोल्या आहेत. प्रांगणात दक्षिण बाजूला कुंड आहे. या कुंडात उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. कुंडाजवळच आसरा मातेचे स्थान आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत व त्यांमध्ये गर्भगृहासमोर नंदी विराजमान आहे. नजीकच मोठ्या आकाराचा त्रिशूळ आहे. गर्भगृहाजवळील देवकोष्ठकांत गणेश व हनुमानाचे स्थान आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. संगमरवरी फरसबंदी केलेल्या गर्भगृहात खोलगट जागेत मोठ्या शाळुंकेमध्ये बेंबळेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे. गर्भगृहात पार्वतीमातेचेही स्थान आहे.
गर्भगृहातील भिंतींवर सुबक नक्षीकाम आहे आणि येथे काही मूर्तीही कोरण्यात आल्या आहेत. बेंबळेश्वर मंदिरावर सुंदर शिखर आहे. शिखराच्या छताजवळ बाशिंगी कठडा आहे व त्यावर चारही बाजूंनी शिखराच्या प्रतिकृती आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य शिखरावर तीन स्तर आहेत. त्यातील पहिल्या व दुसऱ्या स्तरांमध्ये पुष्परचना आहे. त्यावरील स्तरावर मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. त्यावरील घुमटाकार शिखरावर आमलक व कळस आहेत.
या मंदिरात नित्यनेमाने पूजा-अर्चा करण्यात येते. तालुक्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. भाविक सकाळपासूनच रांगा लावून बेंबळेश्वर महादेवाचे दर्शन घेतात.
या उत्सवानिमित्त येथे कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. या महिन्यात मंदिरात सकाळी व सायंकाळी महाआरती केली जाते व प्रत्येक सोमवारी येथील शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी कावडींमधून पूर्णा नदीचे जल आणून बेंबळेश्वर महादेवावर जलाभिषेक करतात. या महिन्यातही संस्थानातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम होतात.