पालघर जिल्ह्यातील विरार येथील जीवदानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बारोंडा देवी ही याच जीवदानीची थोरली बहीण म्हणून ओळखली जाते. जीवदानी डोंगरालगतच्या पापडखिंड धरणाच्या पूर्व दिशेला, बारोंडा गडावर बारोंडा देवीचे पुरातन व जागृत स्थान आहे. असे सांगितले जाते की हे केवळ बारोंडा देवीचेच स्थान नसून हे जीवदानी देवीचेही मूळ स्थान आहे. या मंदिरात बारोंडा माता ही तिच्या जीवदानी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आणि शीतलादेवी या पाच बहिणींसह एकत्रित आहे. यामुळे या देवस्थानाची महती मोठी मानली जाते. बारोंडा देवी नवसाला पावते या श्रद्धेतून दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
विरारची माता म्हणून येथे पुजली जाणारी बारोंडा देवी ही मूळची स्थानिक लोकदेवता आहे. येथे तिचे साहचर्य आदिशक्ती दुर्गामातेच्या महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन रूपांशीही आहे. पौराणिक श्रद्धांनुसार शीतलादेवी हीसुद्धा देवी भगवतीचे रूप आहे. जीवदानी देवी ही अपत्यप्राप्तीसाठी पुजली जाते, तर शीतलादेवी ही लहान मुलांस होणाऱ्या ज्वर, गोवर आणि कांजण्या या आजारांचा नाश करणारी देवता मानली जाते. या बारोंडा देवीच्या धाकट्या बहिणी आहेत. या सर्व देवतांची ठिकठिकाणी स्थाने असून नजीकच्याच जीवदानी डोंगरावर जीवदानीचे स्थान आहे.
याबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी बारोंडा डोंगराच्या पायथ्याशी काही गुराख्यांचे वास्तव्य होते. एके दिवशी गुराखी आपल्या गुरांना चरण्यासाठी या डोंगरावर घेऊन आले असता त्यातील एक वासरू वाट चुकले. आईचा शोध घेत घेत ते वासरू सध्या जेथे जीवदानी देवीचे मंदिर आहे त्या डोंगरावर गेले. सायंकाळ झाल्यानंतर ते भुकेने कासावीस होऊन हंबरडा फोडू लागले. त्यावेळी बारोंडा देवीने जीवदानीला तेथे गायीच्या रूपात पाठवले. जीवदानीने त्या वासराला दूध पाजून शांत केले व त्याच डोंगरावर तिने वास्तव्य केले. मात्र जीवदानीच्या मूळ स्थानाची स्मृती आजही बारोंडा देवी मंदिरात मूर्तीच्या रूपात जपलेली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी जीवदानी देवीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
बारोंडा देवीचे हे मंदिर विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील पापडखिंड धरणाच्या परिसरात आहे. या धरणाजवळ महापालिकेने तरण तलाव बांधलेला आहे. तेथील पदपथावर उभे राहिल्यास मागे डाव्या बाजूस जीवदानी डोंगर, तर विरुद्ध दिशेला बारोंडा डोंगर दिसतो. येथून काही अंतर कच्च्या रस्त्याने आल्यावर बारोंडा गडाचा पायथा लागतो. पायथ्यापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी ३२५ पायऱ्या आहेत. येथील निसर्गसमृद्ध परिसरातून अर्ध्या अधिक पायऱ्या चढून आल्यावर एक छोटे कुंड आहे. त्यात बारमाही पाणी असते. या कुंडालगत एका घुमटीमध्ये गणपती, महादेव आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. येथून काही पायऱ्या चढून आल्यावर बारांडो देवी मंदिराचे शिखर दिसू लागते.
पत्र्याची शेड असलेला खुल्या स्वरूपाचा सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. या संपूर्ण परिसरात फरसबंदी केलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर यज्ञकुंड आहे. मंदिराचे गर्भगृह हे गुहेमध्ये आहे. यावरून त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. या गर्भगृहाला लोखंडी जाळ्या असलेले प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात डावीकडील चौथऱ्यावर हनुमानाचे स्थान आहे. उजवीकडील चौथऱ्यावर डावीकडून गणेश, जीवदानी, बारोंडा देवीच्या मूर्ती तसेच महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आणि शीतलादेवी यांचे तांदळे आहेत. देवींच्या मूर्तींच्या मागील भागाला सोनेरी रंग लावलेला आहे.
या मंदिरापासून आणखी सुमारे ७० पायऱ्या चढून गेल्यावर भोलेनाथ तसेच कालिका मातेची लहान मंदिरे आहेत. येथून समोरच्या निसर्गरम्य अशा परिसराचे विहंगम दर्शन होते. या मंदिरात दररोज सकाळी ६ ते दुपारी १ व दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना बारोंडा देवीचे दर्शन घेता येते. ही देवी जागृत व नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो भाविक तिच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येतात. पूर्वी या मंदिरात दर गुरुवारी भंडारा होत असे. अलीकडील काळात येथे महाशिवरात्र तसेच नवरात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यावेळी शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या उत्सवांदरम्यानही भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते.