नांदेड जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात तामसा गावाला विशेष स्थान आहे. या गावाचा इतिहास थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला आहे. गावात नदीकाठी मराठा साम्राज्याचे सरनौबत नेताजी पालकर यांची समाधी, बारालिंग मंदिर, गौतम तीर्थ, हनुमान मंदिर इत्यादी वास्तू इतिहासाच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत. यापैकी रामायण काळाशी संबंध सांगणारे बारालिंग महादेव मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील भाजी-भाकरीची यात्रा मराठवाड्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
हेमाडपंती शैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे बाराव्या ते तेराव्या शतकातील असावे, असे सांगितले जाते. ते यादवकालीन असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर, सीतावियोगात दुःखी झालेले प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात वानरसेना घेऊन लंकेकडे निघाले होते. तेव्हा वाटेत ते या मंदिरापाशी थांबले. येथे बारा लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याकडील रसद संपली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी आपल्या सोबत असलेल्या वानरसेनेला जंगलातून मिळतील त्या रानभाज्या तोडून आणण्यास सांगितले. याच वेळी पाण्याची सोय व्हावी, म्हणून श्रीरामांनी जमिनीत बाण मारून गौतम तीर्थ निर्माण केले. वानरांनी जंगलातून आणलेल्या बारा प्रकारच्या भाज्या एकत्र करून बारालिंग मंदिर परिसरात शिजवल्या व सर्व सेनेसोबत श्रीरामांनी येथे स्वतः भोजन केले. तेव्हापासून आजतागायत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येथे ही भाजी-भाकरीची जत्रा साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या यात्रेचे सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे लिखित पुरावे सापडतात.
मंदिरापासून काही अंतरावर स्वागतकमान आहे. मंदिरासमोर प्रशस्त मोकळे मैदान आहे. याच मैदानात येथील प्रसिद्ध यात्रा भरते. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात लोखंडी स्तंभांवर गजपृष्ठ आकाराचे पत्र्याचे छत असलेला पूर्णखुल्या स्वरूपाचा रांगमंडप उभारला आहे. रांगमंडपाला लागून प्रसाद वाटप केंद्राची इमारत आहे. यात्रेच्या वेळी येथील सुमारे आठ खिडक्यांतून भाजी-भाकरी प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरासमोर चौथरा आहे व त्यावर सुमारे बारा फूट उंचीचा दीपस्तंभ आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार नक्षीदार आहे आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. सभामंडपात नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत सामावलेले आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे, तर बाजूला शिवपिंडी आहे. शिवपिंडीत मध्यभागी मोठे लिंगपाषाण आहे आणि त्याभोवती बारा लहान आकाराचे लिंगपाषाण आहेत. या शिवपिंडीमुळेच मंदिरास बारालिंग मंदिर म्हणून संबोधले जाते. पुढे अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. अंतराळ व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व ललाटबिंबांवर गणपतीची शिल्पे आहेत. गर्भगृह जमिनीपेक्षा खोल आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील शाळुंकेभोवती पोकळी आहे, त्यात पावसाळ्यात पाणी भरलेले असते. शिवपिंडीवर छत्र धरलेला तांब्याचा नाग आहे, तसेच जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे.गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखरातील खालील पहिला थर अष्टकोनी आहे, तर वरील तीन थर गोलाकार आहेत.
शिखरातील चौथा थर वर निमुळता होत गेलेला आहे. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारी भाजी-भाकरीची यात्रा, हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. यावेळी जवळपास तीस क्विंटल (तीन हजार किलो) भाजी शिजवली जाते. त्यासोबतच साठ ते सत्तर हजार भाकऱ्या तयार केल्या जातात. यात्रेत सुमारे पन्नास ते साठ हजार भाविक भाजी-भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी हजेरी लावतात. हा प्रसाद खाल्ल्याने व्याधी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याशिवाय मंदिरात महाशिवरात्री, श्रावण मास, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, दसरा, दिवाळी आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
बारालिंग मंदिरापासून जवळच आग्नेय दिशेला ‘गौतम तीर्थ’ नावाचे कोरीव पाषाणात बांधलेले कुंड आहे. सुमारे ४१ फूट लांब व ३९ फूट रुंद असलेल्या या कुंडाची खोली सुमारे १२ फूट आहे. कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. असे सांगितले जाते की श्रीरामाने जमिनीत बाण मारून या तीर्थाची निर्मिती केली होती. याच ठिकाणी गौतम ऋषींचा आश्रम होता व गौतम ऋषींच्या शापामुळे त्यांची पत्नी अहिल्या येथे शिळा होऊन पडली होती. श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या शापमुक्त झाली, अशीही आख्यायिका सांगितली जाते. येथे गौतम ऋषी व अहिल्यादेवी यांचे लहानसे मंदिर आहे. मंदिरात गौतम ऋषी व अहिल्यादेवी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. त्यांच्या समोर जमिनीवर शिवपिंडी आहे. या मंदिराच्या प्रांगणात प्राचीन समाध्या आहेत आणि परिसरात मंदिराचे प्राचीन अवशेष विखुरलेले आढळतात.