बल्लाळेश्वर व राम मंदिर

पनवेल शहर, पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड

पनवेल शहराला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या केंद्रस्थानी असलेले बल्लाळेश्वर महादेव मंदिर हे या वारशाचे एक महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. कोकणातील मंदिरे ही प्रामुख्याने काळा पाषाण आणि सागवानी लाकूड यांच्या संगमातून साकारलेली असतात. त्याचा उत्कृष्ट नमुना पनवेलमधील वडाळे तलावाच्या काठी असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात पाहता येतो. हे मंदिर साधारणपणे ४०० वर्षे जुने असून त्याचा ऐतिहासिक संबंध पेशवे काळाशी जोडलेला आहे. तत्कालीन मराठा साम्राज्याचा विस्तार आणि पेशव्यांच्या कोकणातील प्रभावामुळे या भागात अनेक मंदिरांची आणि लोककल्याणासाठी तलावांची निर्मिती झाली. पनवेलमधील हे बल्लाळेश्वर महादेव मंदिर देखील त्याच परंपरेचा एक भाग आहे.

बल्लाळेश्वर मंदिराची उभारणी पेशवे काळात बाळजी कृष्ण बापट यांनी केल्याचे ऐतिहासिक पुराव्यांवरून समजते. बापट कुटुंबीय हे त्या काळातील एक प्रभावशाली घराणे होते. त्यांनी पनवेलच्या सामाजिक आणि पायाभूत विकासात मोलाची भूमिका बजावली. या मंदिराच्या स्थापनेचा उद्देश धार्मिक असण्यासोबतच तो या भागातील जलव्यवस्थापनाशी देखील निगडित होता. पनवेलमध्ये असलेल्या सहा प्रमुख तलावांच्या निर्मितीमागे आणि संवर्धनामागे या मंदिराचे आणि बापट कुटुंबाचे नाव प्रामुख्याने येते. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, बाळजीपंत बापट यांनी वडाळे, कृष्णाळे आणि पार्वती या तीन महत्त्वाच्या जलाशयांची निर्मिती केली होती. यापैकी वडाळे तलावाला आज या मंदिरामुळे बल्लाळेश्वर तलाव म्हणूनही ओळखले जाते. हा तलाव बल्लाळेश्वर मंदिराला लागूनच आहे. पूर्वीच्या काळी या तलावाचा विस्तार तब्बल ४० एकरांहून अधिक होता. कालांतराने नागरीकरणामुळे हा विस्तार कमी झाला असला तरी पनवेलच्या भूगर्भातील जलपातळी टिकवण्यासाठी त्याचे महत्त्व आजही मोठे आहे.

या मंदिराचा संबंध त्रेतायुगाशी देखील जोडला जातो. असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामांनी जेव्हा दक्षिण दिशेकडे प्रवास केला होता, तेव्हा त्यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते आणि महादेवाची पूजा केली होती. कोकण किनारपट्टीवरील इतर मंदिरांशी तुलना करता, हे मंदिर मराठा स्थापत्यशैलीच्या ‘वाडा’ पद्धतीच्या प्रभावाखाली असल्याचे दिसून येते. बल्लाळेश्वर महादेव मंदिराची रचना ही अतिशय नियोजित आणि शास्त्रशुद्ध आहे. मंदिराचा पाया काळ्या बेसाल्ट पाषाणापासून बनवलेला असून तो अतिशय मजबूत आहे. त्यामुळेच ४०० वर्षांनंतरही या वास्तूला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. वडाळे तलावाला लागून मंदिराला एक प्रशस्त मंडप आहे. भाविकांच्या सुविधेसाठी या मंडपावर पत्र्याची शेड बसवण्यात आली आहे. याच मंडपात मंदिराच्या समोर दीपमाळ आहे. पुढे स्वतंत्र नंदीमंडप आहे. नंदीमंडपात मध्यभागी एका वज्रपिठावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. या नंदीमंडपाच्या भोवताली असलेले चारही स्तंभ वरच्या बाजूला एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. त्यावर घुमटाकार शिखर व कळस आहे. नंदीमंडपातून मुख्य मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर मोठे कासवशिल्प व बल्लाळेश्वर महादेवाची लाकडी पालखी आहे. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणपती व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपातून पुढे छोटेखानी अंतराळात प्रवेश होतो. गर्भगृहाचे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गर्भगृहाच्या दर्शनी भागावर विविध देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भगवान गणेशाची सुबक मूर्ती आणि भगवान विष्णूच्या विविध अवतारांची शिल्पे आहेत. या शिल्पकामात ‘गजांत लक्ष्मी’चे एक दुर्मिळ आणि सुंदर शिल्प कोरलेले आहे. ते समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. गर्भगृहात मध्यभागी जमिनीपासून काहीसे वर अखंड पाषाणातील प्राचीन शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या मागे देवी पार्वतीची मूर्ती विराजमान आहे.

मुख्य मंदिराच्या आवारात श्रीरामांचे लाकडी मंदिर आहे. पेशवे काळात लाकडी कामाला आणि त्यावरील चित्रकामाला मोठे महत्त्व होते. हे राम मंदिर संपूर्णपणे सागवानी लाकडामध्ये घडवलेले असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. दगडी शिवमंदिर आणि लाकडी राम मंदिर अशा दोन वेगवेगळ्या स्थापत्य प्रकारांचे एकाच परिसरात दर्शन घडणे, हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त, मंदिराच्या डाव्या बाजूला भगवान दत्तात्रेयांचे छोटे मंदिर असून त्यामध्ये दत्तगुरूंची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे.

बल्लाळेश्वर मंदिर पनवेलच्या अनेक दिग्गज घराण्यांचे श्रद्धास्थान राहिले आहे. प्रख्यात आयुर्वेदिक संस्था ‘धूतपापेश्वर’चे संस्थापक वैद्य कृष्णशास्त्री पुराणिक आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी या मंदिराच्या आणि तलावाच्या जतनकार्यात मोठे योगदान दिले आहे. हे मंदिर धूतपापेश्वर कारखान्याच्या अगदी समोर असल्यामुळे या संस्थेचे कर्मचारी आणि अधिकारी आजही दररोज दर्शनासाठी येथे येतात. तसेच, रामायण मालिकेतील सीतेची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी देखील या बल्लाळेश्वर मंदिराला भेट देऊन येथील शांततेबद्दल आणि आध्यात्मिक ऊर्जेबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

महाशिवरात्री हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी पनवेलसह नवी मुंबई आणि आजूबाजूच्या तालुक्यातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. संपूर्ण वडाळे तलाव आणि मंदिराचा परिसर यावेळी दिव्यांनी उजळून निघतो. महाशिवरात्रीच्या रात्री चारही प्रहरात महादेवाची विशेष पूजा केली जाते आणि शिवलीलामृताचे पारायण केले जाते. मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी उपवासाच्या फराळाची आणि महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. या व्यतिरिक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे विशेष गर्दी असते. श्रावणात शिवलिंगावर बेलपत्रांची आणि फुलांची आकर्षक आरास केली जाते. गणेशोत्सवाच्या काळात देखील मंदिराच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये संगीत, कीर्तन आणि प्रवचनांचा समावेश असतो. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पनवेल बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पनवेलसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : श्रीकृष्ण वैद्य, पुजारी, मो. ८९०८४८४३४८

बल्लालेश्वर और राम मंदिर

पनवेल नगर, पनवेल तहसील, रायगढ़ जिला

Back To Home