कोकण आणि गोव्यात राखणदार हा धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग आहे. राखणदार हा सखा, मित्र, मार्गदर्शक, पालनहार, रक्षक आणि देव आहे. तो गावाचे, घरांचे, शेती, गुरेढोरे व माणसांचे वाईट शक्ती व नैसर्गिक संकटापासून रक्षण करतो. त्यामुळेच कोणत्याही कामाची सुरवात करताना राखणदाराचा कौल घेऊन व राखणदारास मानपान देऊनच कामाची सुरुवात केली जाते. कोकण व गोव्यात गावोगावी वेगवेगळ्या नावाने राखणदाराची देवस्थाने आहेत. यापैकीच एक प्राचीन व प्रसिद्ध बाबरेश्वर मंदिर गोव्यातील खोब्रावाडा गावात आहे. येथील जागृत बाबरेश्वर देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाबरेश्वराची केळ्याची जत्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
हे मंदिर सुमारे तीनशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत अख्यायिका अशी की पूर्वी हे मंदिर बाघा डोंगरावर होते. पोर्तुगीजांच्या धर्मांध सत्ताकाळात या मंदिरास धोका निर्माण झाला तेव्हा कलंगुटकर नावाच्या कोळ्यांनी तेथील देवाची मूर्ती आपल्यासोबत खोब्रावाडा येथे आणून स्थापित केली. तेव्हापासून हे देवस्थान संपूर्ण गोवावासियांचे श्रद्धास्थान आहे. अलीकडील काळात या मंदिरात नवी मोठी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार बाबरेश्वर देवाची मूळ मूर्ती ही मच्छिमार बांधवांना समुद्रात सापडली होती व त्यांनी येथे हे मंदिर बांधले.
हे मंदिर गावापासून काही अंतरावर समुद्र किनाऱ्यालगत आहे.
मंदिराभोवती आवारभिंत आहे व त्यातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा काहीसे उंचावर असल्यामुळे काही पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या प्रांगणात समुद्रकिनाऱ्यावरील रुपेरी वाळू पसरली आहे. मंदिराचा काही वर्षांपूर्वी जिर्णोद्धार करून हे मंदिर चमकदार काळ्या पाषाणात बांधण्यात आलेले आहे. मंदिर उंच चौथऱ्यावर असून सभामंडप व गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे सभामंडपाच्या प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. सभामंडपाचे अर्धचंद्राकृती प्रवेशद्वार झडपारहित मुक्तद्वार स्वरूपाचे आहे.
द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी व ललाटबिंबावर कीर्तीमुख आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप लहानसा आहे व त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे आणखी दोन दरवाजे आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामूळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. या अर्धचंद्राकृती प्रवेशद्वाराच्या पानाफुलांचे नक्षीकाम व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर श्रीबाबरेश्वर देवाची सिंहासनारूढ द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या उजव्या हातात मशाल व डाव्या हातात घुंगुराची काठी आहे. मूर्तीच्या डोक्याला मुंडासा व कासेला धोतर आहे. देवाला धारदार मिशी असून नजर करारी व कानात कुंडले आहेत.
मंदिराच्या बाह्य बाजूने वातायने व स्तंभांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. सभामंडपाच्या छतावर पिरॅमिड आकारातील उतरत्या पायऱ्यांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी कळसाच्या जागी मशालीची प्रतिकृती आहे.
गर्भगृहाच्या छतावर आठ थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरावरील शेवटचा चौकोनी थर उतरत्या रचनेचा आहे. चारही बाजूंना मशालीच्या प्रतीकृती व शीर्षभागी कळस आहे.
बाबरेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. केळ्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेला हा जत्रोत्सव सात दिवस चालतो. यावेळी मंदिरासमोर लाकडी वासे बांधून तात्पुरता मंडप उभारण्यात येतो. या सात दिवसात हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. नवसपूर्ती म्हणून भाविकांनी देवासाठी आणलेले केळ्याचे घड या मंडपाच्या छताला टांगून ठेवतात. छताला केळ्याचे हजारो घड लटकलेले दृश्य मनोहारी दिसते. या दरम्यान मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. त्यात केळ्याचे घड, देवाच्या पूजेचे साहित्य, खाद्य पदार्थ, कपडे, खेळणी, मनोरंजनाची साधने आदी वस्तूंचा समावेश असतो. मंदिरात वर्षभरातील इतर सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. उत्सवकाळात मंदीरात भजन, कीर्तन, दशावतार आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.