अय्यप्पा मंदिर

वर्तकनगर, ठाणे (प.)

षष्ठ, हरिहरपुत्र, मणिकंदन या नावांनीही संबोधल्या जाणाऱ्या ‘धर्म शास्ता’ भगवान अय्यप्पा यांचे मंदिर ठाणे शहरातील वर्तकनगर या भागात स्थित आहे. दक्षिण भारतीय मंदिर वास्तुकला आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगणारे हे मंदिर ठाण्यातील अय्यप्पा भक्तांच्या आस्थेचे प्रमुख केंद्र आहे. या मंदिराची स्थापना ३५ वर्षांपूर्वी करण्यात आली. तेव्हापासून ते ठाण्यातील दक्षिण भारतीय बांधवांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथे दरवर्षी अत्यंत उत्साहाने ‘मंडला-मकरविलक्कू’ उत्सव साजरा करण्यात येतो. ठाणे शहर आणि परिसरातील शेकडो अय्यप्पा भक्त या उत्सवात सहभागी होतात.

हरि-हर ऐक्याचा संदेश देणारी अय्यप्पा ही देवता षष्ठ, हरिहरपुत्र, मणिकंदन या नावांनीही पूजली जाते. ‘नैष्ठिक नित्य ब्रह्मचारी’ म्हणून गौरवला जाणारा अय्यप्पा हा शिव आणि मोहिनीच्या रूपातील विष्णूंचा पुत्र मानला जातो. ‘भागवत’, ‘अमसुमद्भेदागम’, ‘सुप्रभेदागम’ आदी ग्रंथांत याविषयीची अशी कथा देण्यात आली आहे की भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी हा स्त्रीअवतार घेतला होता. यानंतर मोहिनीने शिवशंकराला आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या मिलनातून अय्यप्पाचा जन्म झाला. म्हणून त्यास हरिहरपुत्र असे संबोधले जाते. ‘राजविजयम’ या प्रो. पी. चेन्ना रेड्डी संपादित ग्रंथातील ‘षष्ठ कल्ट अँड द शबरीमला टेंपल’ या अजित कुमार यांच्या लेखानुसार, अय्यप्पा ही मूळची षष्ठ नामक द्रविड देवता आहे. अय्यप्पास शास्ताचा अवतारही मानले जाते. पौराणिक काळात या द्रविड देवतेचे वैदिक परंपरेत सम्मिलित करण्यात आले.

अय्यप्पाबाबत पौराणिक आख्यायिका अशी सांगितली जाते की दुर्गादेवीने महिषासुराचा वध केल्यानंतर त्या असुराची बहीण महिषी हिने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला, की शिव आणि विष्णूच्या पुत्राखेरीस तिला कोणीही मारू शकणार नाही. शिव व विष्णूचा पुत्र असणे अशक्य असल्याचे जाणून ती उन्मत्त झाली. अखेर सर्व देवांनी तिचे अत्याचार मिटवण्याची प्रार्थना विष्णूकडे केली. विष्णूने सागरमंथनाच्या वेळी मोहिनी रूप धारण केले होते. त्या रूपातच विष्णूने शंकराशी विवाह केला. त्या संबंधातून त्यांना अपत्यप्राप्ती झाली. विष्णूने ते मूल पंडालमच्या निपुत्रिक राजाकडे सोपवण्याचे ठरवून, त्या बालकास पंबा नदीच्या तीरावरील जंगलात ठेवले.

दैवी संकेतानुसार, केरळमधील पंडालमचा वैष्णव राजा राजशेखर तेथे शिकारीसाठी गेला असता त्याला ते बालक दिसले. त्याने अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावरून त्या बालकाचा स्वीकार केला. त्याचे नाव मणिकंठ असे ठेवण्यात आले. काही काळाने राजा राजशेखर याच्या राणीने एका पुत्रास जन्म दिला. मात्र मणिकंठ यालाच राजा आपला थोरला पुत्र मानत असे. त्याने युवराज म्हणून त्याचा अभिषेक करण्याचेही ठरवले होते. त्यावेळी राजशेखरच्या दरबारातील काही दुष्ट मंत्र्यांनी राणीचे कान भरले आणि त्यांनी मणिकंठाचा काटा काढण्याचे ठरवले.

राणीचे पोट दुखत असून, त्यावर इलाज म्हणून वाघिणीचे दूध हवे असे त्यांनी राजाला सांगितले. तेव्हा मणिकंठाने वाघिणीचे दूध आणण्याचे काम स्वीकारले. त्याकरिता तो जंगलात गेला असता, त्याचा तेथे महिषी या राक्षसीशी सामना झाला. अय्यप्पा हा शिव व विष्णूचा पुत्र असल्याने तो महिषी राक्षसीचा वध करू शकला. यानंतर तो एका वाघिणीवर बसून राजवाड्यात परतला. तेव्हा तो दैवी अवतार असल्याची सर्वांची खात्री पटली. महिषीवधाचे जीवनकार्य समाप्त झाले असल्याने त्याने राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने राजाला सबरीमला (शबरीमला) येथे आपले १८ पायऱ्यांचे मंदिर बांधण्यास सांगितले. या मंदिरास सन्निधानम असे म्हटले जाते.

सबरीमला मंदिराचे प्राचीन वा मध्ययुगीन संदर्भ अनुपलब्ध आहेत. त्याचा सर्वांत जुना उल्लेख सन १७९३मधील पंडालम राजपरिवाराच्या दस्तावेजात आढळतो. यानंतर सन १८१८मध्ये लेफ्टनंट बी. एस. वॉर्ड याने या मंदिरास दिलेल्या भेटीचे वर्णन आहे. त्यात या मंदिरातील वार्षिकोत्सवात त्या काळी १० ते १५ हजार भाविक येत असल्याचा उल्लेख आहे. आज जगातील एका मोठ्या तीर्थस्थळात त्याची गणना केली जाते. तेथे दरवर्षी सुमारे एक ते दीड कोटी भाविक दर्शनासाठी जातात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ मंडल पूजा (साधारणतः १५ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर), मकरविलक्कु (मकरसंक्रांत, १४ जानेवारी), महा तिरूमल संक्रांत (१४ एप्रिल रोजी) आणि प्रत्येक मल्याळी महिन्याचे पहिले पाच दिवस या कालावधीतच पूजेकरिता खुले असते. सबरीमला मंदिराचे वर्तमानकाळात आश्चर्यकारक ठरावे असे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले ‘वावर स्वामी’चे मंदिर. त्याविषयीच्या आख्यायिकेनुसार, वावर हा मुस्लिम संत पूर्वाश्रमीचा समुद्री चाचा होता. एकदा भगवान अय्यप्पाने त्याचा युद्धात पराभव केला. त्यानंतर तो त्यांचा परमभक्त बनला. षष्ठमपट्टू आणि भूतनाथ उपाख्यान यांसारख्या ग्रंथात त्याविषयीची गीते आहेत. येथील मंदिराप्रमाणेच सबरीमलापासून ४० किमी अंतरावरील एरुमेली येथे त्याची मशीदही आहे. ही मशीद स्वतः अय्यप्पाने दिलेल्या आदेशानुसार पंडालम देशाच्या राजाने बांधली होती. सबरीमला येथे अय्यप्पाच्या दर्शनास जाण्यापूर्वी या मशिदीत जाण्याची प्रथा तेथे आजही पाळली जाते. अशा प्रकारे धार्मिक एकात्मता, तसेच शैव आणि वैष्णव या हिंदू संप्रदायांतील ऐक्याचे प्रतीक असलेल्या भगवान अय्यप्पाची मंदिरे आज देशात, तसेच परदेशातही विविध ठिकाणी आहेत. वर्तकनगरमधील मंदिर हे त्यांपैकी एक होय.

वर्तकनगरची ही वसाहत स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतच ठाण्याचे एक उपनगर म्हणून आकारास येऊ लागली. कोकण हाऊसिंग बोर्डाच्या इमारतींनी अनेक ठाणेकरांना त्या काळी उच्चभ्रू राहणीमानाचा अनुभव दिला. ऐंशीच्या दशकात येथील लोकसंख्येत मोठी वाढ झाली. याच सुमारास येथे वास्तव्य करीत असलेल्या मल्याळी नागरिकांनी एकत्र येऊन अय्यप्पा भक्त सेवा संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून सन १९९१मध्ये या मंदिराची उभारणी केली. ३५ वर्षांपूर्वी येथे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी ‘अय्यप्पा प्रार्थना हॉल’ हे सभागृह बांधण्यात आले. १ जानेवारी १९९१ रोजी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. येथे वेळोवेळी करण्यात आलेल्या जीर्णोद्धार आणि नूतनीकरणानंतर या मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हे मंदिर केरळ मंदिर स्थापत्यशैलीत उभारण्यात आले आहे. गोपुरम्, मर्यादा (आवारभिंत), आंतरमंडलामध्ये बलिक्कल मंडपम, कोडिमारम (ध्वजस्तंभ), श्रीकोविल, त्याचप्रमाणे कोरीव नक्षीकाम केलेले सुवर्णरंगी चकचकीत स्तंभ, तसेच भिंतींवर, प्रवेशद्वारांवर जडवलेला धातूचा पत्रा ही केरळी मंदिरशैलीची वैशिष्ट्ये येथेही पाहावयास मिळतात. उतरते छप्पर आणि दर्शनी भागातील देवकोष्टकासारखी तिकोनी रचना असलेले येथील गोपुरम तीनस्तरीय आहे. त्यास कोरीव नक्षीकाम केलेले भव्य लाकडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या त्रिकोणाकारावर कीर्तीमुखे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या खिडक्यांच्या वरच्या भागात अय्यप्पांची कोरीव मूर्ती आहे. येथून मंदिराच्या प्राकारात प्रवेश होतो. समोरच धातूच्या उंच चौथऱ्यावर सप्तस्तरीय समई आहे. त्यापुढे उंचच उंच असा, चकचकीत सुवर्णरंगाचा कोडिमारम म्हणजेच ध्वजस्तंभ आहे. त्यापुढे मंदिराचा बलिक्कल मंडप आहे. या मंडपाच्या वरच्या भागातील त्रिकोणाकारात ‘तत्त्वमसि’ हे मंत्र-वचन लिहिलेले आहे. हे वचन सामवेदाशी संबंधित असलेल्या छांदोग्य उपनिषदातील सहाव्या अध्यायातील महर्षी उद्दालक आणि त्यांचा पुत्र श्वेतकेतू यांच्या संवादात प्रथम आले आहे. याचा वाच्यार्थ ‘ते तूच आहेस’ असा होतो. केवलाद्वैत तत्त्वज्ञानानुसार हे वाक्य जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य दर्शविण्यासाठी वापरतात. बलिक्कल मंडपातील बलीपीठ हे अष्टदिक्पाल आणि अन्य देवतांचे प्रतिनिधित्व करते. येथून मंदिराच्या मुख्य प्राकारात प्रवेश होतो. त्यात मध्यभागी श्रीकोविल (गर्भागार) आहे. त्याच्या समोर दोन्ही बाजूंनी पायऱ्या असलेली रचना आहे. श्रीकोविलच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला काळ्या पाषाणात घडवलेल्या द्वारपालांच्या मूर्ती आहेत. त्यात उंच वेदीवर भगवान अय्यप्पांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथील मूर्ती सबरीमला मंदिरातील मूळ मूर्तीशी साधर्म्य दर्शवणारी आहे. मूर्तीच्या सभोवती अनेक दीप तेवत आहेत. मंदिर प्राकारात विष्णू, गणेश, सुब्रमण्यम, संतोषीमाता, भगवान शिव, त्याचप्रमाणे भगवान मुरुगन, नवग्रह, नागराज यांचीही मंदिरे आहेत.

या मंदिरात सकाळी ५.३० ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे रोज पहाटे मंदिराची कवाडे उघडल्यानंतर निर्माल्य दर्शन पूजा होते. त्यानंतर अभिषेक, नैवेद्य विधी पार पडतात. येथील वार्षिक उत्सवांमधील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे ‘मंडला’ उत्सव होय. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान येणाऱ्या वृश्चिकम या मल्याळी महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होणारा हा उत्सव एकूण ४१ दिवस चालतो. या काळात शेकडो भाविक या मंदिरात येतात. मंडला काळात सबरीमला येथील मूळ मंदिराच्या यात्रेला जाणे शक्य नसलेले भक्त येथे येऊन आपली व्रतधारणा पूर्ण करतात. वार्षिक उत्सवाच्या प्रारंभी येथे ध्वजस्तंभावर अधिकृत ध्वजारोहण केले जाते. या विधीला ‘कोडिगेट्टू’ असे म्हणतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे ‘मकरविलक्कू’ हा विशेष उत्सव साजरा केला जातो. या मंदिरात छायाचित्रे काढण्यास मनाई आहे.

उपयुक्त माहिती

  • ठाणे रेल्वे स्थानक व एसटी  बस स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून ठाणेसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८४३३७४९७८२, ७७३८५४८४२९

अय्यप्पा मंदिर

वर्तकनगर, ठाणे (प.)

Back To Home