मुंबईतील प्राचीन गावांपैकी एक असलेले चेंबूर हे आज मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे उपनगर आहे. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढून अनेक वेळा कारावास भोगलेले काँग्रेसचे नेते कुमारस्वामी कामराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या येथील एका मैदानामध्ये भगवान अय्यप्पांना समर्पित केलेले मंदिर स्थित आहे. ‘लोक समस्तः सुखिनो भवन्तु’ या तत्त्वाने कार्य करणाऱ्या ‘श्री अय्यप्पा संगम’ या संस्थेतर्फे या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. शिस्तबद्ध पूजाविधी आणि संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मंडला-मकरविलक्कू’ महोत्सवामुळे हे मंदिर चेंबूर परिसरातील असंख्य अय्यप्पा भक्तांचे श्रद्धास्थान ठरले आहे.
चेंबूर या आधुनिक उपनगराचा इतिहास हा ब्रिटिश काळापासून सुरू होतो. साष्टी (सालसेत) बेटांमध्ये वसलेले चेंबूर हे प्राचीन काळातही एक महत्त्वाचे गाव होते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संपादित-संशोधित केलेल्या ‘महिकावतीची बखर’मध्ये चेंबूर या ग्रामनामाचा उल्लेख आहे. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब, तसेच बिंबदेव यादव यांची हकीकत या बखरीत सांगण्यात आलेली आहे. त्यातील नामोल्लेखावरून चेंबूर हे तेव्हाचे लक्षणीय गाव असल्याचे समजते. चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणावर चिंबोरी सापडत असल्यामुळे त्यास चिंबोरी असे म्हटले जाई, असे सांगितले जाते. मात्र ब्रिटिशांना चिंबोरीचा उच्चार कठीण जात असल्याने ते त्यास चेंबूर असे म्हणू लागले. मात्र महिकावतीच्या बखरीमध्ये या गावाचा उल्लेख ‘चेंभूर’ असा आहे. यावरून हे त्याचे प्राचीन काळापासूनचे नाव असल्याचे स्पष्ट होते.
पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली मुंबईची व साष्टीची बेटे इंग्रजांकडे आल्यानंतर काही वर्षांनी चेंबूर परिसराचे भाग्य उजळले.
जानेवारी १८०५ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या कारकिर्दीत शीवचा पूल बांधण्यात आल्यानंतर हा भाग मुंबई बेटास रस्तेमार्गाने जोडला गेला. सन १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू झाली. त्यानंतर १९०६ मध्ये कुर्ला ते चेंबूर हा रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला. कचरा वाहतुकीसाठी हा मार्ग उभारण्यात आला होता. दलदलीच्या भागात या कचऱ्याचा भराव घालून येथे मोठ्या प्रमाणावर जमीन तयार करण्यात आली. ४ फेब्रुवारी १९२४ रोजी हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला झाला. येथील लोकसंख्या वाढावी याकरिता सरकारने १९२५ ते १९४० या काळात नागरिकांना अत्यंत कमी दरात येथील भूखंडांचे वाटप केले होते. १९४५ मध्ये चेंबूरचा बृहन्मुंबईत समावेश झाला. त्या काळात येथे फाळणीतून विस्थापित झालेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी छावण्या उभारण्यात आल्या. चेंबूर, ट्रॉम्बे आदी परिसरात औद्योगिकीकरणास गती मिळाल्यानंतर येथे नवीन नागरी वसाहती निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सन १९५५ ते १९५८ मध्ये ‘बॉम्बे हाऊसिंग बोर्ड’ने येथे काही नियोजनबद्ध वसाहती निर्माण केल्या. स्टेशन कॉलनी (सुभाष नगर), टाऊनशिप कॉलनी (टिळक नगर) आणि शेल कॉलनी (सहकार नगर) या त्यातीलच.
शेल कॉलनी ही वसाहत प्रामुख्याने तेव्हाच्या ‘शेल ऑईल कंपनी’तील कामगार व नोकरदारांसाठी उभारण्यात आली होती. ५० आणि ६० च्या दशकात या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतीय नागरिकांनी वास्तव्यास सुरुवात केली. त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक आवश्यकतांमधून येथे विविध देव-देवतांच्या मंदिरांची उभारणी झाली. शेल कॉलनीमधील कामराज मैदानातले अय्यप्पा मंदिर हे त्यातील एक होय.
भगवान अय्यप्पाचे मूळ भव्य मंदिर केरळमधील सबरीमला येथे आहे. अय्यप्पा षष्ठ, हरिहरपुत्र तसेच मणिकंदन या नावांनीही ओळखला जातो. तो शिव आणि मोहिनीच्या रूपातील विष्णू यांचा पुत्र मानला जातो. भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी हा स्त्री अवतार घेतला होता. यानंतर मोहिनीने शिवशंकराला आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या मिलनातून अय्यप्पाचा जन्म झाला. म्हणून त्यास हरिहरपुत्र असेही संबोधले जाते. अय्यप्पाची पूजा ही शैव, वैष्णव आणि शक्ती यांचा अनोखा संगम आहे. काटेकोर ब्रह्मचर्य, मद्यपान व मांसाहार निषिद्ध आणि कठोर आचारसंहिता त्याच्या भक्तीसाठी आवश्यक मानली जाते.
सबरीमला तीर्थयात्रेला जाणारे भाविक मंदिरात जाण्यापूर्वी ४१ दिवसांचे अशा प्रकारचे व्रत पाळतात. “श्रीभूतनाथ सदानन्द सर्वभूत दयापरः। रक्षः रक्षः महाबाहो शास्त्रे तुभ्यं नमोनमः।।” हा अय्यप्पाचा पूजामंत्र आहे. असंख्य दक्षिण भारतीय आणि खासकरून मल्याळी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान अय्यप्पांची मंदिरे आज जगभरात अनेक ठिकाणी आहेत. चेंबूरच्या कामराज मैदानातले मंदिर हे त्यातीलच एक होय.
या मंदिराची स्थापना नेमकी कोणत्या वर्षी झाली, याची अचूक माहिती अनुपलब्ध आहे. पन्नासच्या दशकानंतर येथे स्थायिक झालेल्या मल्याळी समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली, असे सांगितले जाते. आपल्या आराध्य देवतेच्या नावाने त्यांनी येथे अय्यप्पा संगम ही संस्था स्थापन करून सुमारे सहा दशकांपूर्वी या मंदिराची उभारणी केली. कामराज मैदानाच्या छोट्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मैदानाच्या उजवीकडील एका कोपऱ्यामध्ये हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर खास केरळी स्थापत्यशैलीत, आधुनिक बांधकाम साहित्य वापरून केलेले आहे. केरळ हा कोकणासारखेच पाऊसमान असलेला प्रदेश असल्याने तेथील घरांचे, देवालयांचे छप्पर बहुतांशी चारही बाजूंनी उतरत्या प्रकारचे असते. या मंदिराचे छप्परही उतरत्या प्रकारचे व कौलारू आहे.
मुखमंडपम् आणि ‘श्रीकोविल’ म्हणजे गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपास मोठे चौकोनाकार प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला गजमूर्ती आहेत. द्वारचौकटीवर भगवान अय्यप्पा यांच्या शिकवणीचे सार असलेले ‘तत्त्वमसि’ हे वचन लिहिलेले आहे. हा मंत्र सामवेदाशी संबंधित असलेल्या छांदोग्य उपनिषदातील सहाव्या अध्यायातील महर्षी उद्दालक आणि त्यांचा पुत्र श्वेतकेतू यांच्या संवादात प्रथम आला आहे. याचा वाच्यार्थ ‘ते तूच आहेस’ असा होतो. केवलाद्वैत तत्त्वज्ञानानुसार हे वाक्य जीव आणि ब्रह्मा यांचे ऐक्य दर्शविण्यासाठी वापरतात. द्वारचौकटीच्या वरच्या भागात तिकोनी आकारात अय्यप्पा यांची व्याघ्रारूढ कोरीव मूर्ती आहे.
मंदिराच्या मुखमंडपात उंच असा समईच्या आकाराचा सप्तस्तरीय दीपस्तंभ आहे. याच्या समोरच मंदिरातील मुख्य श्रीकोविल आहे. हे श्रीकोविल उंच जगतीवर उभारलेले आहे. त्यास केरळी मंदिर स्थापत्यशैलीनुसार सोपानम् आहे. त्याच्या समोर, तसेच त्याच्या १९ छोट्या पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी समया मांडलेल्या आहेत. विशेष पूजेच्या वेळी त्या प्रज्वलित करण्यात येतात. श्रीकोविलमध्ये उंच वज्रपीठावर अय्यप्पा स्वामींची मूर्ती विराजमान आहे. गुडघे मुडपून बसलेल्या अय्यप्पांनी एका हाताचा कोपर डाव्या गुडघ्यावर ठेवला आहे आणि त्यांचा दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मूर्तीच्या मस्तकी मुकुट आहे. पाठीमागे अर्धचंद्राकृती मखर आहे. बहुतेक दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये गर्भगृहामध्ये सहसा विद्युत दिवे लावले जात नाहीत. त्या ऐवजी तिथे केवळ तुपाचे दीप असतात. येथील अय्यप्पा स्वामींच्या मूर्तीच्या भोवतीही अनेक दीप तेवत आहेत. येथे मुख्य श्रीकोविलच्या शेजारीच डाव्या व उजव्या बाजूस दोन गर्भगृहे आहेत. त्यातील उजव्या गर्भगृहात गुरुवायूरप्पन (विष्णू भगवान) यांची मूर्ती विराजमान आहे, तर डावीकडील गर्भगृह देवी भगवतीस समर्पित आहे.
या मंदिरात रविवार ते शुक्रवार या काळात सकाळी ५.३० ते १०.३० आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या काळात भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. शनिवारच्या दिवशी या मंदिरात दर्शनेच्छुकांची मोठी गर्दी असते. या दिवशी येथे सकाळी ५.३० ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ ही दर्शनवेळ असते. या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात चालणारा ‘मंडला-मकरविलक्कू’ हा उत्सव होय. ४१ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या काळात येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. सबरीमला येथील मूळ मंदिराच्या यात्रेला जाणे शक्य नसलेले भाविक या काळात येथे येऊन आपली व्रतधारणा पूर्ण करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे ‘मकरविलक्कू’ हा विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी मंदिराला दिव्यांची विशेष रोषणाई केली जाते. या शिवाय येथे भागवतसप्ताह, महाअन्नदान (प्रसाद ओट्टु) असे कार्यक्रमही आयोजित केले जातात. या मंदिरात छायाचित्रे काढण्यास सक्त मनाई आहे.