आवजीसिद्ध महाराज मंदिर

सुनगाव, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे वसलेले श्री आवजीसिद्ध महाराज मंदिर हे सुमारे १३०० वर्षांची वैभवशाली आध्यात्मिक परंपरा लाभलेले एक जागृत शक्तीपीठ मानले जाते. जन्मतः अंध असतानाही केवळ आपल्या उत्कट शिवभक्तीच्या बळावर साक्षात महादेव-पार्वतीचा साक्षात्कार घडवणाऱ्या आवजी महाराजांची जीवनगाथा अत्यंत प्रेरणादायी आणि विलोभनीय आहे. या थोर भक्ताने आपल्या नवसासाठी कड्यावरून उडी घेतली आणि त्यांच्या निस्सीम भक्तीने प्रसन्न होऊन देवाने त्यांना केवळ दृष्टीच दिली नाही, तर स्वतःच्या चरणी सामावून घेतले. आजही सुनगावच्या पवित्र मातीत एका सुपारीतून ‘बाण’ रूपात प्रगटलेले महाराजांचे हे दिव्य स्वरूप भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे.

महाराजांच्या आख्यायिकेनुसार, त्यांचा जन्म तेराशे वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे बारई समाजात झाला. महादेव आणि पार्वती या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या आवजींचे वडील नागवेलीच्या पानांच्या विक्रीचा पिढीजात व्यवसाय करत असत. चार भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे असलेले आवजी महाराज जन्मतःच दृष्टिहीन होते आणि बालवयातच त्यांच्यावरील माता-पित्यांचे छत्र हरवले.

अनाथ आवजींचे त्यांच्या मोठ्या भावजयीने खूप हाल केले. तिने अनेकदा महाराजांना उपाशी ठेवून खाण्यासाठी भाकरीऐजी भिंतीवरील मातीचे पोपडे दिले. ही वार्ता जेव्हा सुनगावला राहणाऱ्या त्यांच्या अंबाबाई नावाच्या मावशीला समजली, तेव्हा त्यांनी आवजींना आपल्या घरी आणले आणि पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ केला. मावशीने ऐकवलेल्या शिवशंकराच्या गोष्टींमुळे आवजींच्या मनात बालपणापासूनच शिवभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली.

एके वर्षी माघ महिन्यात मध्य प्रदेशातील पंचमढी येथील बडा महादेवाच्या दर्शनासाठी सुनगावातून दिंडी निघाली असता, आवजींनी त्या दिंडीसोबत जाण्याचा हट्ट धरला. मावशीने सुरुवातीला विरोध केला, परंतु आवजींच्या आग्रहापुढे नमते घेत त्यांना परवानगी दिली. प्रवासाला निघण्यापूर्वी आवजींनी मावशीच्या शेतात जाऊन सुपारी, खारीक, बदाम, कापूर व श्रीफळ ठेवले आणि बडा महादेवाच्या दर्शनानंतर दृष्टी प्राप्त झाल्यास आपला देह शिवशंकरांना अर्पण करण्याचा नवस केला. पायी प्रवास करत ही दिंडी महाशिवरात्रीला महादेवाच्या गुहेपर्यंत पोहोचली. दिंडीतील सर्वांनी स्नान करून दर्शन घेतले, मात्र अंधत्वामुळे शिवाचे दर्शन न झाल्याने व्याकुळ झालेल्या आवजींनी देवाचा धावा सुरू केला आणि शेवटी जवळच असलेल्या खोल दरीत उडी घेतली. त्याच वेळी माता पार्वतीने प्रगट होऊन त्यांना वरच्यावर झेलले आणि त्यांना दृष्टी प्राप्त झाली. दिंडीतील सर्वांना जेव्हा हा चमत्कार समजली, तेव्हा त्यांनी महाराजांचा जयजयकार केला. मात्र आवजींनी आपल्या नवसाची आठवण करून देत परतण्यास नकार दिला. दिंडी माघारी फिरल्यानंतर आवजी महाराजांनी शिवलिंगाला पाच फेऱ्या मारल्या आणि तेथील एका वृक्षावरून पुन्हा दरीत उडी घेतली. यावेळी प्रत्यक्ष महादेवाने त्यांना आपल्या हातावर झेलले. देवाच्या दर्शनाने कृतार्थ झालेल्या आवजींनी त्यांच्या चरणी विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या महादेवांनी त्यांना ‘सिद्ध’ म्हणून घोषित केले आणि वर मागण्यास सांगितले. त्यावर आवजींनी विनंती केली की ‘हे ठिकाण भक्तांसाठी खूप दुर्गम आहे, त्यामुळे पंचमढीप्रमाणेच सुनगाव येथेही यात्रा भरावी आणि मला आपल्या चरणी स्थान मिळावे.’ देवाने तथास्तू म्हणताच आवजी महाराज शिवस्वरूपात विलीन झाले आणि त्याच क्षणी सुनगाव येथे मावशीच्या शेतात ठेवलेल्या सुपारीतून ते ‘बाण’ रूपात प्रगट झाले.

काही दिवसांनी दिंडीतील लोकांनी सुनगावात परतल्यावर अंबाबाईला ही सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून ती बेशुद्ध पडली आणि त्या अवस्थेत महाराजांनी तिला दृष्टांत देऊन आपण शेतात बाण रूपात प्रगटल्याचे सांगितले. शुद्धीवर आल्यावर तिने हे सर्वांना सांगितले, पण कुणीही विश्वास न ठेवल्याने दुःखी होऊन तिने प्राण सोडले. अंबाबाईच्या अंत्यविधीनंतर काही ग्रामस्थ शेतात गेले असता, त्यांना खरोखरच सुपारीतून बाण प्रगट झाल्याचे दिसले आणि तेव्हापासून हे स्थान भक्तीचे केंद्र बनले. कालौघात या ठिकाणी भव्य मंदिर उभारले गेले आहे आणि येथे आवजीसिद्ध महाराजांच्या पाठीशी शिवशक्ती शिवलिंगाच्या रूपात आहे. तसेच येथे भैरवनाथाचेही वास्तव्य असल्याचे मानले जाते. महाराजांच्या दृष्टांतानुसार मंदिरासमोर अंबामावशीचे मंदिरही बांधण्यात आले आहे. अलीकडे झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराला अत्यंत देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या मंदिराचा परिसर अत्यंत शांत व प्रसन्न आहे. मंदिराच्या बाहेरील भागात हनुमान, अंबामावशीचे मंदिर तसेच काही समाधी आहेत. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत आहे आणि त्यातील दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर द्वारपाल व दीपकोष्ठके आणि ललाटबिंबस्थानी ओम चिन्ह आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे तर मंदिराच्या अरुंद प्रांगणात उजवीकडे ओवऱ्या आहेत. मंदिराच्या समोर धातूचा उंच ध्वजस्तंभ आहे आणि मुखमंडप, सभामंडप व दोन गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.

मुखमंडपातील कमानीसदृश दरवाजातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपातील नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानींनी जोडलेले आहेत. याच सभामंडपात एका बाजूला लाकडी गर्भगृहात आवजीसिद्ध महाराजांची बाणरूपी शेंदूरचर्चित शिळा आहे, ज्यावर चांदीचे डोळे व लहान मुकुट आहे. या गर्भगृहाच्या मागच्या बाजूला बहिरम महाराजांचे गर्भगृह आहे आणि येथेही त्यांची शेंदूरचर्चित शिळा व चांदीचे डोळे आहेत. भगवान शंकरांच्या चरणी समर्पित होऊन सिद्धत्व प्राप्त केलेल्या आवजी महाराजांच्या आध्यात्मिक ऊर्जेचे आणि त्या जागृत स्थानाचे रक्षण करण्यासाठी साक्षात शिवाचे उग्र पण रक्षक रूप असलेले बहिरम महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी श्रद्धा आहे. सुनगावच्या या शक्तीपीठात आवजी महाराज हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे वात्सल्यमयी रूप आहेत तर बहिरम महाराज हे त्या क्षेत्राचे संरक्षण करणारे क्षेत्रपाळ म्हणून ओळखले जातात. मंदिराच्या मागील बाजूला शिवशंकरांचे स्थान आहे आणि तिथे चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व गर्भगृहात शिवपिंडी आहे. या गर्भगृहाच्या भिंतींवर असलेल्या देवकोष्ठकांमध्ये श्रीकृष्ण, हनुमान, गणेश, सीता माता, श्रीराम-सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरावर दोन आकर्षक शिखरे आहेत, त्यावर आमलक व कळस आहेत आणि दर्शनमंडपावर तीन घुमटाकार शिखरे आहेत. मंदिरासमोर असलेल्या दुमजली वास्तूच्या पहिल्या मजल्यावर भक्तनिवास तर तळमजल्यावर खुले सभागृह आहे.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम तसेच खानदेशातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. माघ वद्य षष्ठीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या यात्रा उत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला मंदिरात नारळ फोडून होते आणि त्यानंतर सात दिवस महाभंडाऱ्याची तयारी चालते. यात्रेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता गावातून मोठी मिरवणूक निघते. त्यात ग्रामस्थ आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर्समधून धान्य, पीठ आणि स्वयंपाकाचे साहित्य घेऊन सहभागी होतात. मंदिरासमोरील मोकळ्या जागेत गावच्या महिला एकत्रितपणे ज्वारीच्या भाकऱ्या थापतात, तर पुरुष मंडळी उडीद डाळीचे वरण बनवतात. सुमारे लाखभर भाविकांसाठी लागणारा हा महाप्रसाद अवघ्या काही तासांत तयार केला जातो, ज्यासाठी गावकऱ्यांकडून १०० क्विंटल ज्वारी आणि ३० क्विंटल डाळ दिली जाते. सायंकाळी सात वाजता सामूहिक आरतीनंतर या महाप्रसादाचे वाटप सुरू होते व मध्यरात्रीपर्यंत अखंड सुरू असते. या दिवशी संपूर्ण गाव आपल्या घरात स्वयंपाक न करता भंडाऱ्याच्या सेवेत मग्न असते.

उपयुक्त माहिती:

  • जळगाव जामोद येथून ८ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८७ किमी अंतरावर
  • जळगाव जामोद येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे

अवजीसिद्ध महाराज मंदिर

सुनगांव, ताल. जलगांव जामोद, जिला. बुलढाणा

Back To Home