शैव संप्रदायात शिवपिंडी पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रोक्त ग्रंथांमध्ये शिवपिंडीचे सहा मुख्य प्रकार वर्णिले गेले आहेत. देवादिकांनी स्थापित केलेल्या ‘देवपिंडी’, असुरांनी स्थापन केलेल्या ‘असुरपिंडी’ आणि ऋषीमुनींनी प्रतिष्ठापित केलेल्या शिवपिंडीला ‘आर्षलिंग’ असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे पुराणकालीन पिंडी म्हणजे ‘पुराणलिंग’, राजा-महाराजांनी स्थापन केलेल्या पिंडीस ‘मानुषलिंग’ असे म्हणतात, तर निसर्गतः प्रकट झालेल्या पिंडीला ‘स्वयंभू शिवपिंडी’ असे ओळखले जाते. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे प्रत्यक्ष माता सतीने स्थापित केलेली एक प्राचीन शिवपिंडी आहे. हे मंदिर पिंपळाच्या (अश्वत्थ) वृक्षाखाली विराजमान असल्यामुळे याला ‘अश्वत्थलिंग’ महादेव म्हणतात, ज्याचा अपभ्रंश ‘अश्वलिंग’ असा झाला आहे. पुराणात वर्णित १०१ श्रेष्ठ शिवपिंडींपैकी ही एक असल्याचे मानले जाते.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की सतीने शंकराशी विवाह व्हावा यासाठी या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली शिवलिंगाची स्थापना करून तपश्चर्या केली होती. सतीच्या तपाने प्रसन्न होऊन महादेव येथे प्रकट झाले. सती आणि महादेवाची पहिली भेट याच ठिकाणी झाली होती, असे मानले जाते. काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर दशनामी संप्रदायातील शंकराचार्य चंद्रशेखर भारती यांनी बांधले आहे.
हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे आहे, असे येथील ग्रामस्थ सांगतात. मुख्य रस्त्यापासून पिंपळवंडी गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागत कमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे चार फूट उंच चौथरे आहेत व या चौथऱ्यांवर भव्य स्तंभ उभे आहेत. हे नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. दोन्ही चौथऱ्यांवर स्तंभांना लागून द्वारपालांची शिल्पे आहेत.
स्तंभांवर सज्जा आहे व त्यावर तीन मेघडंबरी आहेत. मधल्या मेघडंबरीत नंदीवर विराजमान महादेव व पार्वती यांच्या मूर्ती दिसतात. उजव्या बाजूच्या मेघडंबरीत गणपती व डाव्या बाजूच्या मेघडंबरीत कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. येथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मुख्य मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे दगडी मंदिर रस्त्यापेक्षा सुमारे वीस ते पंचवीस फूट खोल भागात असल्यामुळे खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराला भक्कम तटबंदी आहे व या तटबंदीत समोरील व मागील बाजूला प्रवेशद्वारे आहेत. ही दोन्ही प्रवेशद्वारे दुमजली आहेत. समोरील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ व दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वारावर अर्धचंद्राकार तोरण आहे. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत व त्यापुढे नक्षीदार स्तंभ आहेत. अष्टकोनी वितानावर चक्राकार नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. मागील प्रवेशद्वाराची रचना देखील तशीच आहे.
प्रवेशद्वारापेक्षा प्रांगण खोल असल्यामुळे प्रांगणात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत व पलीकडे चौथरे आहेत.
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला तटबंदीला लागून भक्तनिवासाची दुमजली इमारत आहे. पाषाणी फरसबंदी असलेल्या प्रांगणात एक प्राचीन विहीर आहे. विहिरीतील पाण्याचा साठा अक्षय आहे, असे सांगितले जाते.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. या स्तंभदंडावर चौकोन, षट्कोन, अष्टकोन व वर्तुळ असे विविध भौमितिक आकार कोरले आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपाला लागून दुसऱ्या बाजूला एक लहान मंदिर आहे, त्यात नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या मुखाखाली तीन मानवाकृती शिल्पे आहेत. त्याबाबत आख्यायिका अशी की माळ्याच्या शेतात शिरलेल्या नंदीला माळ्याने काठी मारली, तेव्हा तो नंदी धावत येऊन महादेवाच्या मंदिरात बसला. ही गोष्ट माळ्याच्या पत्नीला व मुलांना कळल्यावर त्यांना फार दुःख झाले. त्यामुळे माळ्याची पत्नी व मुलगा नंदीला चण्याची डाळ व गूळ अर्पण करण्यासाठी रोज मंदिरात येऊ लागले. ही गोष्ट माळ्याला समजल्यावर तो त्यांच्या मागोमाग मंदिरात आला.
तेव्हा पाषाणाचा नंदी प्रत्यक्ष डाळ-गूळ खात असल्याचे पाहून माळ्याने नंदीची क्षमा मागितली आणि ‘आम्हा तिघांना मोक्ष दे’ अशी प्रार्थना केली. तेव्हा नंदीने त्या तिघांना आपल्या छायेत घेतले आणि ते तिघेही पाषाणात रूपांतरित झाले.
मंदिराचे अंतराळ सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे अंतराळाच्या प्रवेशद्वाराला पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. अंतराळात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीमध्ये आहेत. स्तंभाची रचना सभामंडपातील स्तंभांप्रमाणेच आहे. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला दरवाजे आहेत. पुढे बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग असलेले गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला नक्षीदार स्तंभशाखा आहेत व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. गर्भगृहात जमिनीवर स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे व जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर उमा-महेश यांच्या वस्त्रालंकारांनी सुशोभित मूर्ती आहेत.
मूर्तींच्या बाजूला उत्सवकाळात वापरला जाणारा महादेवाचा पितळी मुखवटा आहे. वज्रपीठावर दोन्ही बाजूस पितळी समई आहेत. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे शिखर आहे. या शिखराच्या खालील चौकोनी थरात चारही बाजूंना देवकोष्टके आहेत. शिखराचा दुसरा, तिसरा व चौथा थर अष्टकोनी आहे व प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत व आमलकावर कळस व ध्वजपताका विराजमान आहे.
मंदिराच्या प्रांगणात मागील प्रवेशद्वारापाशी सतीचे लहान मंदिर आहे. याच ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली सतीने महादेवासाठी तप केले होते, असे पुजारी सांगतात. मागील प्रवेशद्वारातून सुमारे वीस पायऱ्या चढून वर आल्यावर काशी विश्वनाथ मंदिर व बळेश्वर मंदिर ही मंदिरे आहेत. या दोन्ही प्राचीन मंदिरांची रचना अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. या मंदिरात नक्षीदार स्तंभांवरील हस्तांवर भारवाहक यक्षशिल्पे आहेत. गर्भगृहात शिवपिंडी आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतींजवळ प्राचीन मूर्ती व शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. या मंदिरांच्या बाजूला वैष्णोदेवी मंदिर, पार्वती माता मंदिर, खंडोबा मंदिर इत्यादी मंदिरे आहेत.
येथून सुमारे पन्नास पायऱ्या चढून वर डोंगराच्या माथ्यावर आल्यावर पेव्हर ब्लॉकने आच्छादित पायवाट लागते. पायवाटेच्या बाजूला सुंदर वाटिका विकसित केली आहे, त्यात विविध प्रकारचे शोभिवंत वृक्ष आहेत. उद्यानात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
पायवाटेने पुढे आल्यावर लाल पाषाणात बांधलेला नक्षीदार धर्मध्वज पहावयास मिळतो. धर्मध्वजाच्या उजव्या बाजूला भारती बुवांचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला कार्तिकेय स्वामींचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला मयूर शिल्पे आहेत. हे मंदिर फक्त कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी खुले केले जाते. धर्मध्वजापुढे पाषाणी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर अर्धचंद्राकार तोरण आहे, ज्यामध्ये झुंबर शिल्पे आहेत. तोरणाच्या वर दोन्ही बाजूला सुंदरी शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराला नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वारातून आत जाताच मठाधिपतींची समाधी-मंदिरे दिसतात. यात धर्मभारती महाराज, रघुनाथभारती महाराज, गंगाधरभारती महाराज संजीवन समाधी आणि संतोषभारती महाराज आदी समाधी मंदिरांचा समावेश आहे. मंदिराच्या परिसरात ‘अमृत भारती विद्यालय’ कार्यरत आहे.
महाशिवरात्र व श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी मंदिरात मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. याशिवाय चैत्र पाडवा, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा आदी सण साजरे होतात. यावेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. सोमवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावस्या व प्रदोष आदी दिवशी भाविक दर्शनासाठी विशेषत्वाने येतात.