संपूर्ण भारताचे गणेश हे आराध्यदैवत आहे. महाराष्ट्रात इसवी सनाच्या दुसऱ्या–तिसऱ्या शतकापासून गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा सुरू झाली. एका सातवाहन राजाचे नाव लंबोदर असे होते. गणेशपुराणात असलेली गणेशगीता ही तेराव्या शतकात जालन्याजवळील राजूर (प्राचीन राजसदन क्षेत्र) येथे रचली गेली. महाराष्ट्रात अष्टविनायकांची सर्व स्थाने मध्ययुगीन आहेत. ही स्थाने पुणे, नगर तसेच रायगड जिल्ह्यात आहेत. मराठवाड्यातील ज्या भाविकांना या तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे शक्य नाही, त्यांच्याकरीता छत्रपती संभाजीनगरमध्ये अष्टविनायकांचे मंदिर उभारण्यात आले आहे.
पन्नालाल नगर या वसाहतीत हे अष्टविनायक मंदिर असून ते चक्क मतदानातून उभे राहिले आहे. या मंदिराच्या उभारणीची कथा अशी सांगण्यात येते की १९६८ मध्ये या वसाहतीची स्थापना झाली. हळूहळू ती वसाहत वाढू लागल्यानंतर आपल्या परिसरात एक मंदिर असावे, असे तेथील रहिवाशांना वाटू लागले. या रहिवाशांनी मिळून एक विकास संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून मंदिराची उभारणी करावी असे ठरले. मात्र कोणत्या देवतेचे मंदिर उभारावे, याबाबत मतभिन्नता होती. त्यामुळे लोकशाही पद्धतीने मतदान घेण्याचे ठरले. तेव्हा गणेशाच्या मंदिरासाठी सर्वाधिक मते पडली व त्यानुसार येथे हे अष्टविनायक मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर लोकवर्गणीतून उभारण्यात आले आहे. त्यासाठीची जागा एका सभासदाने दानस्वरूपात दिली होती.
अष्टविनायकाचे हे मंदिर दुमजली आहे. एखाद्या जुन्या वाड्यासारखे त्याचे दर्शनी रूप आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. प्रवेशद्वार रुंद व उंच आहे. दाराच्या वरच्या बाजूस अर्धवर्तुळाकृती तीन खिडक्या आहेत. वरच्या मजल्याच्या दर्शनी भागातही जुन्या राजस्थानी वाड्यासारख्या खिडक्या आहेत. हे मंदिर गणेशाचे असले तरी मुख्य प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर लक्ष्मीची प्रतिमा आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराचा सभामंडप मोठा असून त्यातच प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. हे गर्भगृह काहीसे उंचावर असून त्याला लाकडी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या वरील भागात ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात एका संगमरवरी चौथऱ्यावर गणेशमूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती पाच फूट उंचीची आहे. राजस्थानातील जयपूर येथील कुशल मूर्तिकारांकडून ती तयार करून घेण्यात आली होती. डोक्यावर मुकुट, मोठे कान, दोन हातांत शस्त्रे व उरलेल्या दोन हातांपैकी एक हात आशीर्वाद देताना व दुसऱ्या हातात लाडू आहे. या मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या मखरामध्ये अष्टविनायकांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वरच्या बाजूला विघ्नेश्वर आणि गिरिजात्मक, उजव्या बाजूला महागणपती, सिद्धिविनायक व मयुरेश्वर, तर डाव्या बाजूला विनायक, बल्लाळेश्वर व चिंतामणी या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. गणेशाची मुख्य मूर्ती असलेल्या चौथऱ्याच्या खालच्या बाजूला एका लहानशा मखरात गणेशाची धातूची मूर्ती आहे.
या मंदिरात संकष्टी, तसेच अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचा सण या मंदिरातही अत्यंत उत्साहाने व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. त्यावेळी मंदिरास खास सजावट करण्यात येते. मंदिरात नित्यनेमाने पूजा–अर्चा, अभिषेक व अथर्वशीर्षांची आवर्तने केली जातात. या मंदिराच्या वतीने रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती असे अनेक उत्सव साजरे केले जातात. येथे कथा–कीर्तन, प्रवचन, संगीत महोत्सव, भक्तिगीत आदी कार्यक्रमही आयोजित केले जातात. मंदिराच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रमही राबविले जातात. गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी, या हेतूने मंदिराच्या वतीने त्यांचे पालकत्व स्वीकारले जाते व त्यांना आर्थिक मदत केली जाते. विद्या, कला व क्रीडा या क्षेत्रांतही मंदिरातर्फे कार्य केले जाते. येथे दरवर्षी अष्टविनायक शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित केला जातो. मंदिरातर्फे वाचनालय, तसेच व्याख्यानमाला हे उपक्रमही राबविण्यात येतात.