महाराष्ट्रात जसे अष्टविनायक प्रसिद्ध आहेत, तशीच बीड जिल्ह्यात देखील आठ गणपतींची स्थाने प्रसिद्ध आहेत. यात भालचंद्र (लिंबागणेश), राजुरी नवगण येथील मंगलमूर्ती, गंगामसला येथील मोरेश्वर, राक्षसभुवन येथील विज्ञान गणेश, हिरापूरचा सिद्धिविनायक, अंबाजोगाई येथील चौभारा गणेश, पिंपळनेर येथील चिंतामणी गणेश आणि नामलगाव येथील आशापुरक गणेश यांचा समावेश होतो. हे बीड जिल्ह्यातील अष्टविनायक म्हणून ओळखले जातात. नामलगाव येथील आशापुरक गणेश मंदिरात गणेशाच्या विवाहाची अनोखी परंपरा आहे. या गणपतीबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. येथील जागृत गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. सन १७१२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख मंदिराच्या भिंतीवर आहे. मात्र, हे देवस्थान पुराणकाळातील असल्याचे येथील पुजारी सांगतात. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की नद्यांच्या त्रिवेणी संगमावर नामा नावाच्या कोळ्याने मुद्गल ऋषींच्या सांगण्यावरून गणेशाची तपश्चर्या केली. हजारो वर्षे तपात लीन झालेल्या नामाला मुद्गल ऋषींच्या कृपेने गणेशाचे दर्शन झाले, तेव्हा नामा स्वतःच गणेश रूपात विलीन झाला होता. नामा कोळ्याने स्थापन केलेला हा गणेश सर्व भक्तांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करतो, म्हणून गणेशाला आशापुरक गणेश व गावाला नामलगाव हे नाव पडले.
हिंदू धर्मात यमराज हे मृत्यूचे आणि न्यायाचे देव मानले जातात. मात्र, पुराणांनुसार, एकदा खुद्द यमराजालाच एका गंभीर संकटाचा सामना करावा लागला होता. एका विशिष्ट घटनेमुळे यमराजाला त्यांच्या मातेकडून शाप मिळाला होता. हा मातृशाप इतका कठोर होता की त्यामुळे यमराजाला असह्य शारीरिक आणि मानसिक पीडा सहन करावी लागत होती. व्याधींनी त्रस्त झालेले यमराज शापमुक्त होण्यासाठी पृथ्वीवरील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत होते, परंतु त्यांना कोठेही शांती मिळत नव्हती.
भ्रमण करत असताना यमराज बीड जिल्ह्यातील नामलगाव येथे आले. या ठिकाणी त्रिवेणी संगमावर त्यांनी स्नान केले आणि येथेच गणेशाची कठोर तपश्चर्या केली. या पवित्र स्नानामुळे आणि गणरायाच्या कृपेमुळे यमराजाचा तो दुर्धर शाप नष्ट झाला. त्यांना शापमुक्ती मिळाली आणि त्यांचे शरीर पुन्हा तेजस्वी झाले. या घटनेची साक्ष म्हणून ज्या ठिकाणी यमराजाची ‘आशा’ (शापमुक्तीची इच्छा) पूर्ण झाली, त्या ठिकाणी त्यांनी स्वतः गणेशाची स्थापना केली. यमराजाची आशा पूर्ण करणारा म्हणून या गणेशाला आशापूरक गणेश असे नामाभिधान प्राप्त झाले. संगमावरील ज्या कुंडाजवळ ही घटना घडली, त्यास आजही गणेशकुंड म्हणून ओळखले जाते.
मंदिरासमोरील वाहनतळावर पूजासाहित्याची व खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. मंदिरास भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. मंदिर उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. चौथऱ्यांच्या पलीकडे तटबंदीला लागून प्रशस्त ओसरी आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे, तर ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. तसेच, आतमध्ये घुमटाकार वितानावर कमळफुलाची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे.
मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात समोरील बाजूला तुलसी वृंदावन आहे. प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून करण्यात येतो.
पुढे सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले हे मंदिर आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. या चौथऱ्यांवर निमुळत्या होत गेलेल्या गोलाकार दीपमाळा आहेत. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. या सभामंडपात चार नक्षीदार स्तंभ व त्यांवरील तुळईवर छत आहे. पुढे मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला गजराजाची काष्ठशिल्पे आहेत. मुख्य सभामंडप इतर सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारात दोन पायऱ्या आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. मुख्य सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत.
मुख्य सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. मध्यभागी चार स्तंभांच्या मधील जागेत रंगशिळा आहे. त्यावर मध्यभागी कासवशिल्प आहे. घुमटाकार वितानावर चक्राकार नक्षी आहे.
अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतीत असलेल्या देवकोष्ठकांत गणेशमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे नक्षीदार सोनेरी प्रभावळ आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोपऱ्यांत मेघडंबरी आहेत. छतावर षटकोनी शिखर आहे. शिखरात एकावर एक अशी बारा रिंगणे आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या प्रांगणात सेवेकऱ्यांची व पुजाऱ्यांची निवासस्थाने, तसेच देवस्थानचे कार्यालय आहे. येथे थोर गणेशभक्त निरंजन स्वामी यांचे समाधीस्थळ आहे. प्रांगणातून मागील नदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे कर्पूरा, नारदा आणि बिंदुसरा या तीन नद्यांचा संगम आहे. संगमावर काही समाधी मंदिरे, तसेच भ्रुशुंडी ऋषींचे लहान मंदिर आणि सुबुद्धा तीर्थ आहे. या तीर्थात स्नान केल्यास व्याधी बऱ्या होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हा गणेशाच्या जन्माचा उत्सव व षष्ठीला गणेशाच्या विवाहाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचा विवाह रिद्धी-सिद्धी यांच्याशी लावला जातो. विवाहाच्या सर्व विधी वैदिक पद्धतीने पार पाडले जातात. देवाची वरात काढली जाते. महाप्रसादाच्या रूपात भक्तांना वऱ्हाडी जेवण वाढले जाते. या सोहळ्यास शेकडो भाविक उपस्थिती दर्शवतात. मंदिरात संकष्टी व विनायकी चतुर्थी, तसेच मंगळवारी भाविकांची गर्दी असते. भाद्रपदातील गणेशोत्सवात मंदिरात भाविकांची विशेष गर्दी होते.