आर्यादुर्गा मंदिर

देवीहसोळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील आर्यादुर्गा मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी आणि नवमी, या दोन दिवसांत भरणारी यात्रा ही राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांपैकी एक असते. उत्सवात आर्यादुर्गा आणि तिची बहीण नवदुर्गा यांच्या भेटीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक येतात. देवीहसोळ गावची ग्रामदेवता असणाऱ्या या आर्यादुर्गा देवीची नवसाला पावणारी देवी, अशी ख्याती आहे.

आर्यादुर्गा देवीचे मूळ स्थान कर्नाटकमधील अंकोला येथे आहे. मंदिरची अख्यायिका अशी आहे की देवीहसोळनजीक असलेल्या पळसुले गावातील देसाई हे देवीचे भक्त दरवर्षी अंकोला येथील आर्यादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असत. अगदी उतारवयापर्यंत त्यांचा हा क्रम सुरू होता. एके दिवशी ते अंकोला येथील मंदिरात देवीचे दर्शन घेत असताना, ही आपली अखेरची वारी आहे, असे बोलून त्यांनी देवीचा निरोप घेतला आणि ते पळसुले येथे येण्यासाठी निघाले. वाटेत विश्रांतीसाठी थांबले असताना देवीने त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की तुला पुन्हा अंकोला येथे येण्याची गरज नाही. मी तुझ्या मागे येत आहे, पण तू मागे वळून पाहू नको. पळसुले गाव नजरेच्या टप्प्यात आल्यावर अनावधानाने त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा देवीने त्यांना दर्शन देले; परंतु आपला शब्द पाळला नाही म्हणून देवी तेथेच अदृश्य झाली तेथील कातळावर देवीची पावले उमटली.

देवी यापुढे येणार नाही हे लक्षात आल्यावर देसाई यांनी तेथेच छोटेसे मंदिर बांधले देवीच्या स्वयंभू पावलांची पूजा करू लागले. त्यानंतर वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला. १९७१ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. असे सांगितले जाते की हे मंदिर पांडवकालीन असून गावचे मूळ नाव हसोळ होते; परंतु भक्तांसाठी देवी गावात आली म्हणून देवीहसोळ हे नाव पडले.

मंदिराची रचना पारंपरिक कोकणी पद्धतीची आहे. हे कौलारू मंदिर जांभ्या दगडाने बांधलेले आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप अर्धमंडप प्रकारातील असून त्यामध्ये भाविकांना बसण्यासाठी दगडी बाकांची रचना आहे. अंतराळात असणारे दगडी खांब त्यावरील भागांवर कलाकुसर केलेली दिसते. गर्भगृहात एका दगडी चौथऱ्यावर आर्यादेवीची तीन फूट उंचीची संगमरवरी मूर्ती आहे. चतुर्भुज असलेली ही मूर्ती महिषासुरमर्दिनी स्वरूपातील आहे. मूर्तीच्या तीन हातांमध्ये त्रिशूळ, तलवार, ढाल एका हातात महिषासुराचे मस्तक आहे. सोनेरी मुकुट, नाकात नथ, गळ्यात विविध अलंकार, तसेच साडी परिधान केलेल्या या मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ असून त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. या मूर्तीच्या खालील बाजूला दगडी चौथऱ्यात असलेल्या लहानशा देवडीत देवीच्या स्वयंभू पादुका आहेत.

आर्यादुर्गा मंदिरानजीक जाकादेवीचे मंदिर आहे. आर्यादेवी जाकादेवी या देवीहसोळ गावच्या ग्रामदेवता. पुत्रपाप्तीसाठी जाकादेवीला नवस बोलले जातात. नवसांची पूर्ती झाल्यास उत्सवाच्या वेळी भाविकांकडून जाकादेवीला पाळणा अर्पण करण्याची प्रथा आहे. मंदिरात आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रोत्सव होतो. घटस्थापनेच्या दिवशी सर्व देवतांना रूपे (मुखवटे) लावली जातात त्यानंतर पूजाविधी पार पडतो. मार्गशीर्ष वद्य अष्टमी आणि नवमीला देवीची मोठी यात्रा भरते. यावेळी आर्यादुर्गा देवी तिची बहीण नवदुर्गा यांच्या भेटीचा सोहळा असतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार आर्यादुर्गा देवी मंदिरातून गावातील खेळे (विविध देवीदेवतांचे मुखवटे घालून काढण्यात येणारी सोंगे) नवदुर्गेचे माघारी म्हणून येथून काही अंतरावर असलेल्या भालावली येथे पाठवले जातात. हे खेळे प्रथेनुसार देवीला साडीचोळी, भेटवस्तू मानपानाचे साहित्य घेऊन जातात.

आर्यादुर्गेच्या भेटीसाठी आणण्यापूर्वी नवदुर्गेला तिच्या मंदिरात रूपे लावली जातात. पालखीतून आलेली देवी सायंकाळी नजीकच्या खांबेश्वर मंदिरात थांबते. तेथे नैवेद्य दाखवून गाऱ्हाणी घातल्यानंतर आर्यादुर्गेला भेटण्यासाठी पालखी पुढे येते. आर्यादुर्गा मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर अनेक कातळशिल्पे आहेत. त्यापैकी एका कातळशिल्पावर (स्थानिक भाषेत मांडावर) पालखी येते. असे सांगितले जाते की यात्रेदरम्यान या मांडाच्या मध्यभागी असलेल्या एका खळग्यात फुरसे वा तत्सम जातीचे साप येतात. परंपरेनुसार गावातील मानकरी या खळग्यात काय आहे हे पाहता थेट हात घालून त्यातील सापाला बाहेर काढून देवीवरून ओवाळून टाकतात. हे साप विषारी असले तरी अद्यापपर्यंत कोणालाही त्यांनी दंश केलेला नाही.

या विधीनंतर भालवलीचे ग्रामस्थ नवदुर्गेला देवीहसोळ ग्रामस्थांकडे सुपूर्द करतात. त्यानंतर ही पालखी आर्यादुर्गेच्या भेटीसाठी पुढे मार्गस्थ होते. आर्यादुर्गा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नवदुर्गेचे कुंकूमतिलकाने औक्षण झाल्यावर दोन्ही देवींची गळाभेट होते आणि नवदुर्गा आर्यादुर्गादेवीच्या शेजारी स्थानापन्न होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी नवदुर्गा पुन्हा भालवलीकडे मार्गस्थ होते. दोन बहिणींच्या भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातूनही हजारो भाविक येतात. दररोजच्या पूजेव्यतिरिक्त भाविकांना काही शुल्क भरून सप्तशती पाठ, नवचंडी होम, शतचंडी होम, देवी अभिषेक देवी एकादशणी अशा विधी करता येतात. (संपर्क : मंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष : ७०२१७३९९९२, सचिव : ९२२३१४७६८४, आत्माराम गुरव, पुजारी : ७५८८९१६३५७

देवीहसोळ येथील आर्यादुर्गा मंदिराशिवाय परिसरात अनेक कातळशिल्पे आहेत. अभ्यासकांच्या मते, ही कातळशिल्पे दहा हजार वर्षांपूर्वीची आहेत. मंदिरापासून काही अंतरावर जांभ्या दगडांतील सुमारे ४० फूट खोलीची विहीर आहे. ही विहीर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. त्यात बाराही महिने पाणी असते. शेकडो वर्षांपासून या विहिरीच्या पाण्याने आर्यादुर्गा देवीची पूजा केली जाते आजही तीच प्रथा कायम आहे. आर्यादुर्गा मंदिर परिसरात भक्त निवास असून तेथे भाविकांना राहण्याची भोजनाची सुविधा आहे. (संपर्क : महेंद्र विचारे, व्यवस्थापक : ९४०४१५१८८३)

उपयुक्त माहिती:

  • राजापूरपासून २५ किमी, तर रत्नागिरीपासून ५० किमी अंतरावर
  • राजापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • भक्त निवासाव्यतिरिक्त या परिसरात इतरत्र निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home