‘काळ्या सोन्याचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरमधील अंचलेश्वर महादेव मंदिर हे विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. झरपट नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिराचे चंद्रपूरच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, चंद्रपूर हे शहर याच मंदिराच्या महात्म्यामुळे वसले आणि ते पुढे विस्तारून आज एक मोठे शहर झाले आहे. येथील वैशिष्ट्य असे की मंदिराच्या सभोवती जे कोरीव काम आहे, त्यात कीर्तिमुखाच्या (एक शीवभक्त राक्षस) तब्बल १८० भावमुद्रा कोरलेल्या असून प्रत्येक मुद्रा ही वेगळी आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की चंद्रपूर शहर आज जेथे वसले आहे तेथे ५०० वर्षांपूर्वी सर्वत्र घनदाट जंगल होते. या भागात तेव्हा गोंड राजाची सत्ता होती. वर्धा नदीवरील बल्लारशाह म्हणजेच आजचे बल्लारपूर ही या राज्याची राजधानी होती. त्यावेळी राजा बल्लारशाह गादीवर होते. या राजाला त्वचारोग असल्याने त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत होत्या, ज्याला स्थानिक भाषेत खांडूक म्हणायचे. म्हणून या राजाला ‘खांडक्या बल्लारशाह’ असे नाव पडले. विविध उपचार करूनही अंगावरील जखमा कमी होत नव्हत्या. एके दिवशी राजा शिकारीसाठी येथील झरपट नदीच्या परिसरात आला असता त्याला या परिसरात एक पाण्याने भरलेले कुंड दिसले. राजाने या कुंडातील पाणी पिऊन ते चेहऱ्यालाही लावले. संध्याकाळी महालात गेल्यावर त्याची राणी हिरातानी हिच्या लक्षात आले की राजाच्या चेहऱ्यावरील जखमा बऱ्या झाल्य होत्या व अंगावरील जखमांचे प्रमाणही कमी झाले होते.
झरपट नदी किनाऱ्यावरील कुंडातील पाणी प्यायल्याने व ते अंगाला लावल्याने आपल्या जखमा बऱ्या झाल्या होत्या, हे राजाला समजले. दुसऱ्या दिवशी राणीसह तेथे जाऊन राजाने त्या कुंडात स्नान केले व तो पूर्णपणे बरा झाला. या पाण्यात काहीतरी चमत्कारिक गुण आहेत हे राजा–राणीने हेरले व येथील जंगल साफ करून घेतले. हिरातानी शिवभक्त असल्याने तिने राजाला सांगून या ठिकाणी लहानसे शिव मंदिर बांधले. या मंदिराचे बांधकाम सुरू असताना येथून काही अंतरावर महाकालीची मूर्ती सापडल्याने तेथे महाकाली मंदिरही बांधण्यात आले. त्यानंतर या परिसरात किल्ला बांधून बल्लारशाह राजाने येथे नगरी वसविण्याचे ठरविले व त्यानुसार या नगरीला ‘चांदा’ हे नाव देण्यात आले. हेच आजचे चंद्रपूर शहर होय व ही दोन्ही मंदिरे चंद्रपूरमधील महत्त्वाची तिर्थस्थाने आहेत.
काही वर्षांनंतर गादीवर आलेल्या राजा वीरशाह यांची पत्नी राणी हिराई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केले. आजचे अंचलेश्वर मंदिराचे बांधकाम हे राणी हिराई यांच्या काळातील आहे. मंदिराच्या बाह्य भागावर विविध प्रकारची आकर्षक शिल्पे आहेत. या मंदिराच्या शेजारीच राणी हिराई यांनी राजा वीरशाह यांची भव्य समाधी बांधली. १८ व्या शतकाच्या शेवटी गोंड साम्राज्य भोसले यांच्या ताब्यात गेले. भोसले यांच्या काळातही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मंदिराच्या समोरील भागात भोसले काळात सभामंडप बांधले गेले. आजही हे मंदिर उत्तम स्थितीत उभे आहे. चंद्रपूरमधील हजारो भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे.
हे मंदिर शिल्पमंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिराच्या सभोवती जी कोरीव शिल्पे आहेत, त्यामध्ये विविध शिल्पांसोबतच कीर्तिमुखाच्या शेकडो भावमुद्रा कोरण्यात आल्या आहेत. १५–१६ व्या शतकातील सुरेख आणि वैविध्यपूर्ण कलाकुसर येथे पाहायला मिळते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप नंतरच्या काळातील असला, तरी अंतराळ व गर्भगृहात प्राचीनत्वाच्या खुणा जागोजागी दिसतात. अंतराळात नंदीची मूर्ती असून अंतराळापासून ५ ते ६ फूट खोल असलेल्या गाभाऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी म्हणजे या गर्भगृहातील नैसर्गिक जलकुंड आहे. या पिंडीच्या आत जिवंत झरा असून त्यातून पाणी वाहत असते. या मंदिर परिसरात हनुमान मंदिर, संतोषी माता अशी मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला व श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.