बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर मराठवाड्याची काशी म्हणून ओळखले जाते. या पावन भूमीत अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक अत्यंत जागृत आणि सुंदर वास्तुशिल्पाचा नमुना म्हणजे आमलेश्वर मंदिर होय. हे मंदिर प्रामुख्याने हेमाडपंती शैलीतील आहे. ते १२व्या-१३व्या शतकातील असावे असा अंदाज आहे. काळ्या पाषाणात उभारलेले हे मंदिर आपल्या रेखीव कोरीव कामासाठी आणि भक्कम बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या भिंती, छत, स्तंभ आणि अधिष्ठान हे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सुशोभित आहेत.
संस्कृत भाषेमध्ये ‘मल’ या शब्दाचा अर्थ होतो घाण, पाप, विकार किंवा दोष. ज्यामध्ये कोणताही दोष नाही, जे अत्यंत शुभ्र आणि पवित्र आहे, त्याला ‘अमल’ असे म्हटले जाते. या अनुषंगाने ‘अमल’ आणि ‘ईश्वर’ यांच्या संयोगातून आमलेश्वर हे नाव तयार झाले आहे.
याचा अर्थ असा होतो की जो ईश्वर भक्तांच्या मनातील आणि आत्म्यावरील जन्मोजन्मीची पापे, दोष आणि मल धुऊन त्यांना निर्मळ करतो, तो म्हणजे आमलेश्वर. अंबाजोगाईच्या धार्मिक नकाशावर या मंदिराचे स्थान अढळ आहे. संतांचा सहवास आणि महादेवाचे सात्विक अस्तित्व यांचा संगम असलेले हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
अंबाजोगाई शहरातील अनेक प्रसिद्ध मंदिरांपैकी आमलेश्वर हे सर्वाधिक प्राचीन आहे. मंदिरावरील शिल्पकला, नक्षीकाम व मंदिराची स्थापत्यशैली या सर्वांचा विचार करता, ते बाराव्या शतकातील असल्याचे स्पष्ट होते, असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंदिराच्या बाजूलाच गोड्या पाण्याची मोठी बारव आहे. असे सांगितले जाते की या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड येथून काढल्यानंतर तयार झालेल्या जागेत ही बारव बांधली गेली.
हे मंदिर अंबाजोगाई शहरापासून दोन किमी अंतरावर आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वागतकमान आहे. या कमानीवर दास हनुमानाची शिल्पे, शीर्षभागी ध्वज सावरणारी वानर शिल्पे, सज्जावर मध्यभागी नंदीवर विराजमान महादेव, पार्वती व गणेश यांच्या मूर्ती आहेत. येथून सुमारे एक किमी अंतरावर असलेल्या मंदिरास दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत. डाव्या बाजूच्या देवकोष्ठकात नृत्य मोहिनी शिल्प व उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात सुरसुंदरी शिल्प आहे. प्रवेशद्वाराला लागून दोन चौथरे आहेत व त्यात हत्तीवर आरूढ माहूत आहेत. याशिवाय या परिसरात अनेक शिल्पे आहेत. देवकोष्ठकांच्या बाजूला उपद्वारे आहेत. या प्रवेशद्वारासमोर अर्धचंद्राकार पायरी आहे. येथून दर्शनमंडप व त्यापुढे चार पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या बाजूला, नव्या जुन्या शैलीचा संगम असलेला नंदी मंडप आहे. या मंडपात मध्यभागी नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंडपाच्या चारही कोनांवर गोलाकार नक्षीदार स्तंभ, स्तंभांवर शीर्षकमळ व त्यावर चौकोनी अर्धस्तंभ आहेत. छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. शिखराच्या चारही बाजूला वानर शिल्पे, स्तंभनक्षी व देवकोष्ठके आहेत. सर्व देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
नंदीमंडपापुढे सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात ते चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. स्तंभांच्या चौकोनी पटावर संयुक्त नक्षी व विविध देवी-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आहे आणि कणीवर हस्त आहेत. हस्तांवरील तुळईवर छत आहे. हस्त, तुळई व वितानावर चक्राकार नक्षी, कमळ फुलांची नक्षी व कीर्तीमुख शिल्पे आहेत. सभामंडपात मध्यभागी सहा स्तंभांच्या मधे रंगशिळा असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. हल्ली या ठिकाणी वज्रपीठावर नंदीची मूर्ती आहे.
सभामंडपापुढे अरुंद अंतराळ आहे. अंतराळात वज्रपीठावर कासव शिल्प आहे. अंतराळाच्या पुढे असलेल्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. त्याच्या खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका, गंगा, जमुना शिल्पे आहेत. प्रवेशद्वारास पुष्पशाखा, पर्णशाखा, वेलबुट्टीशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. मंडारकास चंद्रशिला आहे व त्यावर कीर्तीमुख आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे,
तर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे.
मंदिराच्या बाह्य बाजूला अधिष्ठानात गजथर आहे. यातील गजशिल्पात विविध भावमुद्रा दिसून येतात. अधिष्ठानाचा बराचसा भाग जमिनीत पुरला गेला आहे. वरील भागावर ऊंट व अश्व युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. मंडोवरावर स्तंभशिल्पे व सुरसुंदरी शिल्पे आहेत. यात नर्तकी, शुभगामिनी, मर्दला, शुकसारिका, पुत्रवल्लभा, नृत्यगणेश, उग्र नृसिंह आदी शिल्पे आहेत. मंडोवरावर पश्चिम, दक्षिण व उत्तर दिशेला रिकामी देवकोष्ठके आहेत. मंदिराच्या मागे असलेल्या बारवाकडे जाण्यासाठी अरुंद मार्ग आहे आणि आत उतरण्यासाठी कोरीव पायऱ्या आहेत. हा जलस्रोत अक्षय असल्याचे सांगितले जाते.
महाशिवरात्री व श्रावण मास हे येथील मुख्य वार्षिक उत्सव असून ते मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदी प्रसंगी मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते. दर महिन्याच्या पौर्णिमा व अमावास्या, प्रदोष, सोमवार आदी दिवशी भाविकांची विशेष गर्दी असते.