अंबिका माता मंदिर

गुंजेवाही, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर

सिंदेवाही व सावली तालुक्याच्या सीमेवर असलेले गुंजेवाही येथील अंबिका माता मंदिर प्रसिद्ध असून हे जागृत स्थान येथील एका टेकडीवर स्थित आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हे मंदिर २०० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. येथे साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. याशिवाय मंगळवारी व शुक्रवारीही देवीच्या दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी असते. भाविकांच्या संख्येमुळे व या मंदिरावरील श्रद्धेमुळे महाराष्ट्र सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देऊन त्याचा गौरव केला आहे.

सिंदेवाही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर हे मंदिर आहे. येथे शेजारी–शेजारी २ मंदिरे असून मोठ्या मंदिरातील मुख्य देवता ही अंबिका देवी, तर लहान मंदिरात असलेली देवी यल्लमा देवी म्हणून प्रसिद्ध आहे. या दोघी बहिणी असल्याची मान्यता आहे. त्यामुळे या मंदिराला अंबिका–यल्लमा मंदिर असे म्हटले जाते. १९९३ मध्ये जीर्णोद्धार व नूतनीकरण केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. असे सांगितले जाते की १९६४ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या मंदिरात काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच अंबिका माता व यल्लमा माता यांची प्रतिष्ठापना परशुरामाच्या काळात झाल्याची आख्यायिकाही स्थानिकांकडून सांगितली जाते.

सिंदेवाही शहरातून सावलीकडे जाणाऱ्या मार्गावर हे मंदिर आहे. या मार्गाला लागून असलेल्या मोठ्या पटांगणात देवीचे सर्व उत्सव साजरे होत असतात. येथे पूजासाहित्याची अनेक दुकाने आहेत. मंदिरात जाण्यासाठी ४० ते ४५ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून गेल्यावर मंदिराच्या कमानीतून प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगण प्रशस्त असून सर्वत्र फरसबंदी करण्यात आलेली आहे. याशिवाय उंचावर असल्यामुळे त्याच्या बाजूने रेलिंग लावण्यात आले आहेत. मुख्य मंदिर हे मध्यम आकाराचे आहे. सभामंडप व तीन लहान गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील गर्भगृह हेच मूळ मंदिर असून त्यापुढील सभामंडप हा नव्याने बांधल्याचा जाणवतो.

देवीच्या गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर काहीसे नक्षीकाम असून आतमध्ये देवीची दोन फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती गंडकी पाषाणाची असून ती सिंहासनाधिष्ठित आहे. (महाराष्ट्रात आढळणारा काळा पाषाण आणि गंडकी पाषाण यात फरक आहे. साधारणतः गंडकी पाषाण हा भारत व नेपाळमधून वाहणाऱ्या गंडकी नदीत सापडतो. गंडकी पाषाण अतिशय टणक व गुळगुळीत असतो. या पाषाणाला हवा तसा आकार देणे मूर्तिकाराला तुलनेने सोपे जाते. तसेच शेकडो वर्षे या पाषाणावर किंवा मूर्तीवर बाह्य वातावरणाचा परिणाम होत नाही. महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही काळ्या पाषाणाची, तर तुळजापूर मंदिरातील तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी पाषाणातील आहे.) मूर्तीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र, तर डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेले आहेत. या देवीला आठ हात असून त्यामध्ये विविध आयुधे आहेत. मूर्तीच्या पाठीवर भाता व मुकुटाच्या मध्यभागी शिवलिंग आहे. मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट, त्यावर छत्र, गळ्यात व अंगावर विविध अलंकार व वैशिष्ट्यूर्ण नेसविलेली साडी यामुळे देवीचे रूप खुलून दिसते. करवीरवासिनी महालक्ष्मीचे हे रूप आहे, असे मानले जाते. येथील अन्य २ गर्भगृहांमध्ये शिवपिंडी व विठ्ठल–रुख्मिणी यांच्या मूर्ती आहेत.

या मंदिराच्या शेजारीच असलेल्या दुसऱ्या मंदिराचे बांधकामही जुने असून त्यामध्ये यल्लमा देवीची मूर्ती आहे. नवरात्रोत्सवात येथे देवस्थान कमिटीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना व इतर दिवशी योगिनी मिलन, देवीचा शृंगार, ललित पंचमीला उपवास, गोंधळ, घागर फुंकणे आदी विधी होतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे सुमारे दोन ते अडीच लाख भाविक दर्शासाठी येतात, अशी नोंद आहे. त्यामध्ये दर्शन घेण्यासाठी, नवस बोलण्यासाठी व नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांचा समावेश आहे.

हा परिसर जंगलव्याप्त असल्यामुळे अनेकदा नवरात्रीच्या काळात भाविकांना मंदिर परिसरात व्याघ्रदर्शन होते, असे येथील स्थानिकांकडून सांगण्यात येते. परंतु देवीच्या आशीर्वादाने येथे कधीही त्यांच्याकडून देवीभक्तांना इजा झालेली नाही. नवसाला पावणारी व मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी या परिसरातील अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. दररोज सकाळी ८.१० व सायंकाळी ६.३० वाजता देवीची आरती होते. सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ पर्यंत गर्भगृहात जाऊन अंबिका मातेचे दर्शन घेता येते. महाराष्ट्र सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिल्याने सरकारकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निधीतून भाविकांसाठी विविध सोयी–सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.

गुंजेवाही गाव हे पूर्वीपासून विदर्भात हातमागांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात पूर्वी १००० हून जास्त हातमाग चालत असत. या गावात व परिसरात अनेक मंदिरेही आहेत. गुंजेवाही गावात अंबिका देवी मंदिरापासून जवळच सुमारे २०० वर्षांपूर्वीचे एक शेषनारायण मंदिर आहे. येथे असलेली प्राचीन शेषशाही श्रीविष्णू मूर्ती ही शेंदूरचर्चित असून येथे लक्ष्मीचे स्थान हे विष्णूच्या पायापाशी नसून ते हातांपाशी आहे. याशिवाय या गावात असणारे श्रीविष्णू व महादेवांचे जोड मंदिरही प्रसिद्ध आहे.

उपयुक्त माहिती:

  • सिंदेवाही शहरापासून १६ किमी, तर चंद्रपूरपासून ८० किमी अंतरावर
  • सिंदेवाही व सावली शहरातून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home