आलमप्रभू मंदिर

आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

भारतातील प्राचीन साधू, संतांनी सनातन धर्मात शिरलेल्या कुप्रथा, कर्मकांडे, अनिती यांवर टीका करीत सातत्याने सामाजिक धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून सर्वांसाठी आत्मज्ञानाची कवाडे खुली केली. तत्पूर्वी बाराव्या शतकात असाच धर्मसुधारणेचा प्रयत्न दक्षिणेकडे आलमप्रभू यांनी केला. लिंगायत संत आणि कवी म्हणून पूजल्या जाणाऱ्या आलमप्रभू यांचे समाधी मंदिर आळते गावानजीक आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी झटणाऱ्या आलमप्रभूंचे समाधीस्थळ हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

कोल्हापूर गॅझेटियरमधील नोंदीनुसार, आळते गावास किमान ८०० वर्षांचा इतिहास आहे. अठराव्या शतकारंभी झालेल्या धामधुमीत वारणा खोऱ्यातील आळते गाव दोनदा जळून बेचिराख झाले होते. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे ते राखेतून पुन्हा उठले. आलमप्रभू यांच्या संजीवन समाधी मंदिरामुळे हे गाव लिंगायत आणि जैन धर्मीयांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. आलमप्रभू यांच्या समाधीतून प्रकट झालेली ज्योत येथे आजही अखंड तेवत आहे. या मंदिराबाबत असे सांगण्यात येते की मुघल सम्राट औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला होता, त्या काळात त्याने स्वतः या मंदिरास भेट दिली होती. त्यावेळी त्याने मंदिरास एक चरणपीठ दान केले होते. कालांतराने ते गहाळ झाल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये आहे

लिंगायत संत आलमप्रभू यांच्या जीवनचरित्राबद्दल आज ठोस अशा माहितीचा अभाव आहे. होयसाळ राजा नरसिंह पहिला याचा दरबारी कवी हरिहर याने लिहिलेल्या ग्रंथांतून आलमप्रभू यांच्या बालपणाविषयी काही माहिती मिळते. त्यानुसार, महात्मा बसवेश्वर आणि लिंगायत संत अक्का महादेवी यांचे समकालीन असलेल्या आलमप्रभूंचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नीरशंकर तर आईचे नाव सुजननी असे होते. आलमप्रभू हे उत्तम ढोलवादक होते गावातील मंदिरात ढोलवादनाची सेवा बजावत असत. लवकरच त्यांचा विवाह झाला. कमलाथे हे त्यांच्या पत्नीचे नाव. तिचे अकाली निधन झाल्यानंतर आलमप्रभू यांना वैराग्य आले. घरदार सोडून फिरत असताना एका गुंफामंदिरात त्यांची संत अनिमिष यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी तपस्या सुरू केली. आत्मसाक्षात्कारानंतर ते काव्यरचना करून धर्मप्रचार करू लागले. त्यांच्या काव्यात गूढार्थ भरलेले असल्याचे सांगण्यात येते. आंध्र प्रदेशातील श्रीशैल येथील कदलीवन येथे त्यांचे निर्वाण झाले

त्यांच्या आळते येथील समाधी मंदिराबाबतकोल्हापूर गॅझेटियरमध्ये अशी आख्यायिका देण्यात आली आहे की एकदा आलमप्रभू हे बसवकल्याणहून येथे आले. त्यानंतर काही काळाने त्यांचा आदिलिंग नावाचा शिष्यही येथे आला. परंतु त्याला आपले गुरू दिसले नाहीत. खूप शोध घेऊनही ते कुठेही आढळल्याने आदिलिंग यास वाटले की आलमप्रभूंनी येथे जीवंत समाधी घेतली. आपल्या गुरूभक्तीतून त्याने त्या ठिकाणी मंदिर बांधले आणि एक दीप लावला. आजही तो दिवा तेवत आहे त्याची पूजा केली जाते

हे समाधी मंदिर डोंगरावर आहे, परंतु मंदिरापर्यंत पक्की सडक असल्याने वाहनाने येथे पोहोचणे शक्य आहे. वाहनतळापासून काही अंतरावर मंदिरांचे दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस विविध वस्तू पुजा साहित्याची दुकाने आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला असलेल्या पहारेकरी कक्षाजवळून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जीना आहे.

मंदिरांचे प्रशस्त प्रांगण पेव्हर ब्लॉकने आच्छादित आहे. तेथे भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात असलेल्या अनेक वृक्षांना पार बांधलेले आहेत. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा त्यावर तीन थरांची दगडी दीपमाळा आहे. या दीपमाळेच्या पायाजवळ शिलालेख आहे. त्यानुसार ती .. १९२० मध्ये बांधलेली आहे. दीपमाळेत खालील बाजूला चारही कोनांवर गजराज शिल्पे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ त्यात दीपकोष्टके आहेत. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी पितळी कूर्मशिल्प आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा सूर्यप्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात उजव्या डाव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. पुढे अंतराळाच्या प्रवेशद्वारावर चार चौकोनी स्तंभ आहेत. हे स्तंभ अर्धचंद्राकार कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर आलमप्रभू, बसवेश्वर महाराज इतर महापुरुषांच्या पितळी उत्सवमूर्ती आहेत. वज्रपिठामागे अखंड तेवणारी ज्योत आहे.

मंदिराच्या बाह्य बाजूस वातायने प्रवेशद्वारे यावर सज्जा आहे. सभामंडपाच्या छतावर चहूबाजूने कठडा गर्भगृहाच्या छतावर सभोवतीने बाशिंगी कठडा आहे. छताच्या चारही कोनांवर वामनस्तंभ स्तंभावर शिखर आहेत. छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर त्यावर कळस आहे

या मंदिराच्या बाजूला शिदोबा मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर शिदोबा देवाची पाषाण मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर चारही कोनावर व्याघ्रशिल्पे मध्यभागी वर निमुळते होत गेलेले पिरॅमिडसारखे लहान लहान होत जाणाऱ्या चौकोनी पायऱ्यांचे शिखर आहे. त्यावर आमलक कळस आहे. शिदोबा मंदिराच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे. महादेव मंदिराच्या सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. येथे वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. समोरील गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. या मंदिराच्या बाजूला प्रांगणात लहान लहान सप्तऋषी मंदिरे आहेत. या सातही मंदिरांत शिवपिंडी आहेत. प्रांगणात ध्यान गूफा नावाने ओळखला जाणारा भुयारी मार्ग असलेला कक्ष आहे. मंदिरांत बसवेश्वर महाराज जयंती महाशिवरात्र हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्यावेळी परिसरातील शेकडो भाविक महादेवाचे आलमप्रभूंच्या निर्गुण ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, व्याख्यान, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

उपयुक्त माहिती

  • हातकणंगलेपासून किमीतर सांगलीपासून ३२ किमी अंतरावर
  • हातकणंगले येथून एसटीची सुविधा 
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : रामचंद्र वडेर, पुजारी, मो. ९५२७९९०६६५, ९२८४२१३३१०
Back To Home