रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळेपासून काही अंतरावर असलेल्या नेवरे येथील आदित्यनाथाचे (सूर्यदेव) मंदिर कोकणातील प्रसिद्ध सूर्यमंदिरांपैकी एक आहे. निसर्गसमृद्ध परिसरात स्थित असलेले हे प्राचीन मंदिर येथील ग्रामदैवत व जागृत देवस्थान आहे. या मंदिरात इतर उत्सवांबरोबरच मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमगोत्सव तब्बल दीड महिना चालतो, हे येथील वैशिष्ट्य आहे. दरवर्षी येथील होळीत गावातील मुस्लिम बांधवांकडूनही नारळ अर्पण केला जात असल्याने येथे धार्मिक सलोख्याचेही दर्शन होते.
नेवरे गावापासून थोड्या अंतरावर मुख्य रस्त्यापासून काहीशा आतील भागात गर्द झाडींमध्ये वेढलेले हे मंदिर आहे. मंदिराभोवती जांभ्या दगडांची तटभिंती आहे. तटभिंतीमध्ये दिवे ठेवण्यासाठी अनेक कोनाडे (देवड्या) आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला येथे दिवे ठेवले जातात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर तटभिंतीलगत दोन लहान व एक मोठी अशा तीन दीपमाळा दिसतात. संपूर्ण मंदिर प्रांगणात जांभ्या दगडांची फरसबंदी आहे. येथे एक जुनी विहीर असून विहिरीपासून काही पावलांवर भाविकांच्या सोयीसाठी पक्की शेड बांधण्यात आलेली आहे. या शेडमध्ये काही जुन्या मूर्ती असून त्यांचीही नित्यपूजा केली जाते.
आदित्यनाथ मंदिराचे बांधकाम जांभ्या दगडाचे आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात लाकडी खांब असून गर्भगृहाच्या भिंतीला लागून वरदान व पावणाय देवीच्या प्राचीन मूर्ती आहेत. येथे देवी मानाई, देवी धरणकरीण यांच्याही मूर्ती आहेत. मागील बाजूस एक जुनी मूर्ती आहेत. ती आदित्यनाथांची असावी, असा अंदाज बांधता येऊ शकतो. गर्भगृहातील चौथऱ्यावर तळाशी असलेल्या गोलाकार नक्षीकामात एक गणेशशिल्प व दोन कमळे कोरलेली आहेत. चौथऱ्यावर आदित्यनाथांची काळ्या पाषाणात घडविलेली मूर्ती आहे. या मूर्तीला दोन हात असून उजव्या हातात शंख, तर डाव्या हातात चक्र धारण केलेले आहेत. मस्तकावर नक्षीदार मुकुट, कानात कुंडले, गळ्यात जाडसर माळ, छातीवर सूर्यकांत मणी, डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत, कमरेला गुडघ्यापर्यंत नेसलेले धोतर अशी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या खालील दोन्ही बाजूस चवऱ्या ढाळणाऱ्या स्त्रिया कोरण्यात आल्या आहेत.
मुख्य मूर्तीशिवाय गर्भगृहाबाहेर आणखी एक आदित्यनाथाची मूर्ती आहे. काळ्या दगडात कोरलेली ही मूर्ती खूपच प्राचीन असावी असे पाहिल्यावर जाणवते. महिरपी प्रभावळ, करंडमुकुट, गळ्यात माळ, खांद्यापर्यंत वर उंचावलेल्या दोन्ही हातांमध्ये कमळे, कमरेत तीनपदरी मेखला– त्यातील खालचे दोन पदर मांड्यांपर्यंत खाली आलेले आणि या आदित्यनाथाच्या पायाशी दोन्ही बाजूंना एका हातात कमळ किंवा चवरीसारखी वस्तू धारण केलेल्या बुटक्या स्त्रीप्रतिमा कोरलेल्या आहेत.
प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या मागील बाजूस गोमुख आहे. मंदिरातील मुख्य मूर्तीवर होणाऱ्या अभिषेकाचे तीर्थ येथून बाहेर पडते. मंदिर परिसरात जुनी विहीरही आहे. आदित्यनाथ हे येथील मूळ निवासी असलेल्या सोमण, दातार, महाजन, पेंडसे, वर्तक, कुंटे आदी कुटुंबांचे कुलदैवत आहे. या मंदिरात देवदिवाळीला मोठी यात्रा भरते. रथसप्तमीदरम्यान तीन दिवसांचा महोत्सव होतो. या दोन्ही उत्सवांना पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
शिमगोत्सव हा येथील प्रमुख उत्सव आहे. कोकणात फार तर १५ दिवस शिमगोत्सव चालतो; परंतु येथील शिमगोत्सव तब्बल दीड महिना चालतो. फाल्गुन पौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवाला रूपे लावली जातात. त्यानंतर त्याला पालखीत विराजमान केले जाते. ही पालखी नंतर होळी तोडण्याच्या जागी नेण्यात येते. पारंपरिक पद्धतीने होम लागल्यानंतर गावातील बारा वाड्यांमधील ६४० घरांमध्ये पालखी फिरते. पालखीला प्रत्येक वाडीत फिरण्यासाठी किमान तीन दिवस लागतात. यावेळी देवीला नवस केले जातात. प्रत्येक वाडीत देवीचा मांड होतो, हळदी–कुंकू, नमन आदी कार्यक्रमही होतात. दीड महिन्यांनी देवाची पालखी मंदिरात परतल्यानंतर या उत्सवाची सांगता होते. एवढा दीर्घकाळ चालणारा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव असण्याची शक्यता आहे. आदित्यनाथ हा जागृत देव असून अनेकांना त्याच्या सामर्थ्याची प्रचिती आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.